या वर्षीच्या पावसाळ्यात छोटेखानी का होईना पण एखादी तरी भटकंती व्हावी यासाठी कर्जत जवळील भिवगडला भेट द्यायचे ठरवले. कर्जत स्टेशन पासून पाच सहा किलोमीटर अंतरावर भिवगडाच्या पायथ्याशी वसलेली वदप आणि गौरकामत ही दोन गावे. या गावांमधून भिवगडाचा गडमाथा अर्ध्या पाऊण तासात अगदी सहज गाठता येतो.
भिवगड तसा छोटेखानी. समुद्र सपाटीपासून उंची जेमतेम अंदाजे ८२५ फुट (२५१ मीटर) पेक्षा जास्त नाही आणि वाट एकदम सोपी. याच्या बाजूलाच खेटुन अंदाजे शंभर फुटावरुन झेप घेणारा धबधबा म्हणजे पावसाळी भटकंतीसाठी उत्तम पर्याय. या सगळ्या जमेच्या बाजू लक्षात घेउन, कुणी सोबती असले तर ठीकच नाहीतर एकला चालो रे च्या धर्तीवर या गंडभेटीसाठी उद्या सकाळी निघायचेच असा मनाशी निच्छय केला. सोबती कुणी असेल तर उत्तमच म्हणून व्हॉट्सअँपवर वर मित्रांना माझ्या भिवगडाच्या प्लॅन बद्दल सांगितले. माझ्या सोबत संदेश आणि ॐकार यायला तयार झाले. पहाटे CST वरुन निघणाऱ्या ६:१६ च्या ट्रेन ने आम्ही तीघे कर्जत स्टेशनला पायउतार झालो.
कर्जत स्टेशन जवळील रिक्षा स्टॅण्ड जवळ रिक्षाची चौकशी केली असता आम्ही पहिलटकर असल्याचा गैरफायदा घेऊन गाव जणु खूप काही लांब असल्याचे बहाणा करत होते. ही सगळी अनोळखी प्रवाशांकडून अवास्तव भाडे वसुल करण्याची यांची शक्कल असते. तीनशे-पाचशे पासून सुरु होऊन काहीही भाडे सांगत शेवटी घासा-घिस करून दिडशे दोनशे रुपयांपर्यंत येऊन तयार व्हायचे हा यांचा साधारण फॉर्म्युला. वदप गाव ते कर्जत रेल्वेस्थानक अवघे पाच किलोमीटर अंतर. या अंतरासाठी इतके अवाजवी भाडे देण्यापेक्षा कर्जत स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उल्हास नदीवरील श्री राम पुलापर्यंत चालत यावे. येथील रिक्क्षा स्टॅंड वरील सहा आसनी रिक्क्षा प्रती व्यक्ती अवघ्या १५-२० रुपयात आपल्याला वदप गावी सोडतात.
वदप गावातुन तसेच त्याच्या अडीच किलोमीटर पुढील गौरकामत गावातून गडाकडे वाट जाते. गौरकामत गावातुन गडावर जाणे उत्तम पर्याय कारण ती गडाची मुख्य वाट आहे आणि गड उतार होताना मात्र वदप गावाच्या बाजूची वाट निवडावी म्हणजे ओढ्यावर आंघोळीचा आनंद घेता येतो.
आम्ही मात्र वदप गावातुन गडावर जाण्याचा निर्णय घेतला. वदपगावी येताच राजा छत्रपती परिवारातर्फे दिशादर्शक फलक लावलेला दिसतो. त्याच्याच समोर असलेल्या पवनी वडापाव सेंटर जवळून जाणाऱ्या उजव्या रस्त्याने चालत जाऊन पहिल्याच डावीकडे वळणाऱ्या वाटेने भिवगड आणि धबधब्याच्या दिशेने आम्ही मार्गस्थ झालो. झाडी झुडपातून, गवतातून जाणारी पठारावरील ही पायवाट बऱ्यापैकी मळलेली व प्रशस्त आहे.
धबधब्यावरुन पठारावर उतरणाऱ्या ओढ्याजवळ येताच खिंडीच्या खाली एक आंब्याचे झाड दिसते. हे झाड दिशादर्शक धरून खिंडीच्या दिशेने वरती जाणाऱ्या डाव्या बाजूच्या वाटेने चालत राहावे. आंब्याच्या झाडाखालुन जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर काही मिनिटामध्ये आपण खिंडीत येउन पोहोचतो.
खिंडीच्या माथ्यावर भिवगड आणि ढाकबहिरी गडाच्या वाटेचा नाम निर्देशक फलक लावला आहे. खिंडीतून डावीकडील वाट भिवगड तर उजवीकडील वाट ढाकच्या बहिरीकडे जाते. गावातून खिंडीत पोहचायला अंदाजे वीस मिनिटे पुरेशी होतात आणि खिंडीतून पुढे दहा मिनिटात गडमाथा गाठता येतो. एकंदरीत काय वदप गावातून अर्ध्या तासात आपण गडावर पोहोचतो.
खिंडीतून वर येताच गडाच्या प्रवेश द्वाराचे भग्नावशेष दिसतात तेथून डाव्या बाजूला चालत गेल्यावर एक पाण्याचे टाके दृष्टीस पडते. हे टाके पाहून झाल्यावर डाव्या बाजूने पुढे चालत गेल्यावर आपल्याला एक खांबटाक्याचे दर्शन घडते.
या खांबटाक्यावरुन भिवगडाची बांधणी सातवाहन काळत झाली असावी असा अंदाज आपल्याला बांधता येतो. खांबटाक्या जवळुन जाणारी वाट बालेकिल्याच्या गौरकामत गावाच्या दिशेने असलेल्या टोकाला गौरकामत गावातून येणाऱ्या वाटेला मिळते. या वाटा एकत्रित होऊन पुढे बालेकिल्ल्यावर जातात.
बालेकिल्ल्यावर प्रवेश केल्यावर आपल्याला घराच्या जोत्यांचे अवशेष दिसतात.
त्यापुढे छोटे पाण्याचे टाके आणी एक अपूर्ण खोदलेले टाके आहे.
बाजूलाच कड्यावर स्वराज्याचा दिमाखात फडकणारा भगवा ध्वज किल्ल्याची शोभा वाढवतो. उत्तर बाजुस एक मोठे पाण्याचे टाके असून त्याला बिलगुनच प्रशस्त असे वाड्याच्या जोत्याच्या अवशेषांचे दृष्टीस पडतात. एकूण आकारमानावरून एखादी सदर किंवा एकाद्या तालेवार सरदाराचा वाडा असवा किंवा कोणजाणे राहाळामधील महसूल गोळा करून ठेवायचे मोठे धान्य कोठार ही असू शकते. काही लिखित दस्तऐवजाचा पुरावा नसल्याने आपण फक्त अंदाजच बांधू शकतो.
बालेकिल्यावरुन दक्षिणेस लोणावळा-खंडाळा, राजमाची गडाची डोंगर रांग दृष्टीस पडत होती.
उत्तरेस कोथळीगड, भीमाशंकरची पर्वत रांग
तर पूर्वेस धुक्यात लपंडाव खेळणारी ढाकबहिरी डोंगररांग सह्यगिरिची शोभा वाढवत होती. सभोवताचा परिसर हिरव्या रंगांच्या विवीध छटानी रंगलेला होता तर सह्याद्रीचि शिखरे धुधुक्याच्या चादरीमध्ये लपंडाव खेळत होती.
पायथ्याची गौरकामत आणि वदप गावे एखाद्या निसर्गचित्रा प्रमाणे सुंदर व टुमदार दिसत होती. गड जरी छोटासा असला तरी तेथून दर्शन होणाऱ्या निसर्गाच्या सौदर्यात मात्र किंचितही उणे नव्हते.
इतिहासात डोकावू पाहता आपल्या स्वतःच्याच इतिहासाबद्दल मात्र हा गड काहीसा अबोलच आहे. या गडाचे बांधमक कोकणात उतरणाऱ्या गाळदेवी घाट वाटेवरिल व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी केले असावे. गाळदेवी घाटवाटेत घाटमाथ्यावर ढाक गावात बहिरीदुर्ग तर पायथ्याशी कोकणात वदपगावी भीमगड ऊर्फ भिवगडची बांधणी केली असावी जेणे करून संपूर्ण वाटेवर लक्ष ठेउन व्यापाऱ्यांचे व वाटसरूंनचे स्वरक्षण करता येईल. परंतु हा मात्र माझा एक अंदाज.
गडावर बऱ्यापैकी संवर्धनाचे काम झालेले दिसते. संतोष हसूरकर ने मानगड, सुरगड पासून दुर्गसवर्धनाची सुरुवात करुन "दुर्गवीरच" लावलेले रोपट आता महाराष्ट्रभर पसरून त्याचा वटवृक्ष झाला, त्यांचे दुर्गसवर्धनाचे काम भिवगडावर हि चालु आहे. त्याच प्रमाणे प्रमाणे राजा शिवछत्रपती परिवाराने ह्या गडाच्या सवर्धनाचे शिवधनुष्य उचलले दिसते. राजा शिवछत्रपती परिवाराने गडावरील अवशेषांजवळ नावाचे फलक, गडाची माहिती आणि दिशादर्शक फलक लावले आहेत. तसेच गडमाथ्यावर सावलीसाठी काही वृक्षारोपणाच्या कामाचीही सुरवात केली आहे. या दोन्ही संस्थाच्या या गांडसंवर्धन आणि निसर्गसंवर्धनाच्या कामासाठी मानाचा मुजरा.
बालेकिल्ल्यावर बसूनच घरून आणलेल्या खाऊवर ताव मारून झाल्यावर आम्ही गौराकामत गावाच्या दिशेने गड उत्तार होण्याचा निर्णय घेतला. आत्तापर्यंत आम्ही तीघेच गडावर होतो परंतु आता काही गृप गौराकामात गावाच्या वाटेने सहपरिवार येत होते. किल्याचा शांत परिसर आता गजबजु लागला होता. काही छोट्या मावळ्यांना गडावर येताना बघुन छान वाटले पुढे जाऊन यानांच आपले गड आणि गडांचा इतिहास जागता ठेवायचा आहे.
गौरकामत गावाच्या वाटेच्या दिशेने उतरण्यास सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे गुहा (भुयारी) टाके दिसते. गुहा (भुयारी) टाक पाहून गौरकामत गावाच्या दिशेने चालू लागलो.
गौरकामत गावात उतरणारी वाट कातळात कोरलेल्या सुबक बांधीव पायऱ्यांची आहे. या वाटेच्या बांधणी वरून हिच गडाची मुख्य वाट असावी असे वाटते. या पायऱ्याच्या वाटेवरील काही पायऱ्या काळाच्या ओघात तुटल्या झिजल्या असल्याने पावाळ्यातील शेवाळाने त्या निसरड्या झाल्या होत्या त्यामुळे पायऱ्या उत्तरताना जरा संभाळूनच चालावे लागात होते. पायऱ्यांजवळील कड्यावर दोन गुंफा कोरलेल्या आहेत. पायऱ्याची ही वाट भिवगडाच्या डोंगराच्या सोंडेने थेट गौरकामत गावात उतरते.
परंतु आम्ही मात्र धबधब्यावर जाण्यासाठी गडाच्या डोंगराला वळसा घालून धबधब्याच्या दिशेने मार्गस्थ झालो. पायथ्या पासून सुरुवात करून भिवगड संपूर्ण चढ उतार होऊन पाहाण्यासाठी दोनतास पुरेसे होतात.
आम्हाला मात्र आता काहीवेळ कड्यातून कोसळणाऱ्या जलधारांना अंगावर घ्यायची घाई झाली होती या शिवाय आमची हि निसर्ग भ्रमंती अपूर्ण राहिली असती.
विशेष सूचना :
जर तुम्हाला धबधब्यावर-ओढ्यावर पाण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर "गौरकामत गावातून भिवगड चढून वदपच्या वाटेने गड उतार होणे ". त्यामुळे वेळवाचेल आणि चालण्याचे कष्टही कमी होतील.
कर्जत रेल्वे स्टेशन ते भिवगड






















1 Comments
छान आणि झटपट भटकंती वर्णन. या खिंडीच्या मार्गाने वर ढाक गावाला जातो पण या भिवगडाला कधी गेलो नाही. ते आता जाईन. फोटोंमुळे उत्साह वाढला.
ReplyDelete