
दोन दीपमाळांमधून प्रवेश करताच कोकणी पद्धतीचं कौलारू, टुमदार मंदिर दिसतं. बदलत्या काळात अनेक कोकणातील मंदिरे आधुनिक स्वरूपात रूपांतरित होत असताना, हरिहरेश्वर मंदिराने आपलं पारंपरिक सौंदर्य आणि साधेपणा टिकवून ठेवलाय – यासाठी ट्रस्टचे आभार मानावे लागतील. भाविकांच्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी मंदिराला प्रदक्षिणा घालत आत प्रवेश करण्यासाठी रेलिंगचा मार्ग बनवला आहे. या मार्गातून प्रथम काळभैरव मंदिरात प्रवेश होतो. हरिहरेश्वर लिंगाचे दर्शन घेण्यापूर्वी काळभैरव आणि योगेश्वरीचे दर्शन घेऊन मग नंदी, गणपती, हरिहरेश्वर आणि पुन्हा काळभैरव-योगेश्वरी असे दर्शन घेण्याची प्रथा आहे. काळभैरवाच्या चार हातांत डमरू, तलवार, त्रिशूळ आणि शीर दिसते, तर गळ्यात मुंडमाला आहे. येथे काळभैरवाला जागृत देवस्थान मानले जाते. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भक्तमंडळी येथे धार्मिक अनुष्ठाने आणि कौल लावताना दिसतात. काळभैरव मंदिरातून हरिहरेश्वर मंदिरात प्रवेश केला. मंदिराचे गर्भगृह दगडी असून त्यावर लाकडी कोकणी पद्धतीचे बांधकाम आहे. सभामंडपातील लाकडी बांधकामावर कोरीव काम असून विविध मूर्त्या आणि आकृत्या कोरल्या आहेत. मंदिराच्या पारंपारिक स्थापत्य शैलीमुळे बाहेर उष्णता जाणवत असली तरी मंदिराच्या आत मात्र गारवा जाणवत होता. मंदिराच्या आवारात काही वेळ विश्रांती घेऊन आम्ही प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मंदिराला खेटून एक टेकडी आहे. या टेकडीच्या दिशेने पायऱ्या जातात, हाच तो प्रदक्षिणा मार्ग. हा मार्ग एक कोसाचा असल्याने त्याला ‘कोसाचे प्रदक्षिणा मार्ग’ म्हणतात. पायऱ्यांच्या वाटेने टेकडीवर चढताना अथांग समुद्रकिनारा आणि हरिहरेश्वर मंदिर परिसर दिसू लागतो. टेकडीवरून कौलारू मंदिराचे सौंदर्य आणखी खुलून दिसते.टेकडी चढून वर गेल्यावर घळीतून खाली उतरणारी पायऱ्यांची वाट दिसते; पण तिथे न जाता टेकडीच्या माथ्याकडे चालत राहावे....


माथ्यावरून हरिहरेश्वर परिसराचे निसर्गसौंदर्य नेहाळता येते.टेकडीवरून मंदिर परिसराला तीन बाजूंनी वेढलेल्या डोंगररांगा, एका बाजूस अथांग पसरलेला समुद्र आणि किनाऱ्यावर वसलेले हरिहरेश्वर मंदिर दिसते. टेकडी ही जवळजवळ तिन्ही बाजूंनी समुद्रकिनाऱ्यांनी वेढलेली आहे. टेकडीवरून सागर किनाऱ्याची तीन वेगळी वेगळी रुप पाहायला मिळतात पश्चिमेचा किनारा गर्जना करणाऱ्या फेसाळ लाटांचा मारा झेलणारा खडकाळ आहे, उत्तरेला लाटांचे संगीतमय तरंग निर्माण करणारा वालुकामय किनारा आहे, तर दक्षिणेला डोंगररांगांना साथ देत दूरवर पसरलेला समुद्रकिनारा दिसतो. बर्ड्स आय व्ह्यूमधून हे निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवून घळीच्या दिशेने वळावे.
घळीजवळ येताच सागराला भिडणाऱ्या लाटांचे दर्शन होते. टेकडीच्या कातळातून सागरात उतरणारी ही घळ हरिहर तीर्थक्षेत्राचे आयकॉनिक प्रतीक आहे. हरिहरेश्वर म्हटले की ही घळ डोळ्यासमोर येते. घळीच्या पायऱ्यांवरून सागराकडे उतरताना उजव्या बाजूस भग्न अवस्थेत व्याघ्राजवळ उभी असलेली चतुर्भुज
देवीची मूर्ती दिसते. घळीच्या दोन्ही बाजूंना खडकांवर सागराच्या लाटांनी नैसर्गिक कातळशिल्पे कोरली आहेत. काही ठिकाणी सह्याद्री वरील लेण्यांचा भास होतो. सागरदेवतेने साकारलेल्या या कातळ कड्यावरील कॅनव्हासवर वेगवेगळ्या आकृत्यांचा आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावत निसर्गकृतीचा आनंद घ्यावा.
"समुद्र देवतेने काळाच्या प्रवाहात घडवलेल एक नैसर्गिक कातळशिल्पं जणू मला एखाद्या मंदिरातील कीर्तीमुखाप्रमाणे भासत होत... संतोषला त्यात गणपतीचं दर्शन झालं, माझ्या नजरेने त्या कातळांमध्ये अनेक रूपं, आकार घेत होती. जसं आपण आकाशातले ढग न्याहाळताना कल्पनेच्या पंखांनी विविध आकृत्यांचा मागोवा घेतो, तशीच ही कातळसृष्टीही माझ्या मनात कल्पनांचं विश्व उभं करू लागली... या अद्भुत अनुभवात एक अनोखीच मजा सामावलेली होती."
हा किनारा सुंदर असला तरी तितकाच धोकादायक आहे, हे विसरता कामा नये. भरतीच्या वेळी पाणी पायऱ्यांपर्यंत येत असेल तर किनाऱ्याजवळ येणे टाळावे. शेवाळामुळे किनारा निसरडा असतो, त्यामुळे सावध पणेचालावे. सागराच्या लाटांपासून शक्य तितके दूर राहावे. दरवर्षी येथे अपघात होतात. पाय घसरून पाण्यात पडल्यास किंवा लाटेच्या प्रवाहाने खेचले गेल्यास वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. आम्ही येण्याच्या एक आठवड्यापूर्वी एका तरुणीचा लाटेच्या प्रवाहात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. काळजी घेतल्यास हा किनारा नितांत सुंदर आहे.
हरिहरेश्वरचं पौराणिक ऐतिहासिक धार्मिक महत्त्व
हरिहरेश्वरला ‘दक्षिण काशी’ असंही म्हणतात. अगस्ती ऋषींनी इथे तपश्चर्या केली आणि चार स्वयंभू लिंगांचं दर्शन घेऊन मनःशांती अनुभवली, अशी कथा सांगितली जाते. त्यांनीच येथे काळभैरव आणि योगेश्वरी देवीची स्थापना केली.
हरिहरेश्वराचे मंदिर पुरातन आहे. परंतु, बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही
इसवीसन १६७४ मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दर्शनाला आले होते असं इतिहासकार सांगतात. मंदिराच्या गणेशपट्टीच्या बाजूला दोन कोरीव लेख आहेत ज्यातून इथली ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडते.
ईश्वाब्धी शोडशे शाके शोभकृत वैशाख शुद्ध वत्सरे प्रभू:
माधवैके शुक्ले प्रारंभे देवतालयम्
श्रीवर्धन देशाधिकृत बाळाजी विश्वनाथाभिदं
सूत विश्वनाथानत जीर्णोद्धार कृतः
थोरले बाजीराव पेशवे यांनी मंदिराचा इसवीसन १७२३ साली जीर्णोद्धार केला असे या लेखातून दिसते. सरखेल कान्होजी आंगरेंनी एक हजार रुपये देणगी दिली. मंदिराच्या पश्चिमेला टेकडीवर जाणाऱ्या पायऱ्या चंद्रराव मोरेंनी बांधल्या तर माधवराव पेशवेंची पत्नी रमाबाईंनी १६६७ साली इथं चौघडा वादनासाठी बांधकाम केले आणि ४ एप्रिल १७७२ रोजी माधवरावांच्या प्रकृती साठी त्या स्वतः इथं आल्या अशा नोंदी आहेत.
हरिहरेश्वर मंदिराला इसवीसन १७९३ साली आग लागली आणि १७९५ मध्ये मंदिर पुन्हा बांधले गेले. पेशवेकाळात मंदिराला खर्चासाठी ११५२ रुपये दिले जात असत, १९८१ मध्ये ही रक्कम वाढवून ३००० केली गेली आणि चौघडा वादनासाठी रायगड जिल्हा परिषदेने पाच हजार रुपये अनुदान निश्चित केले.
हरिहरेश्वर हे कोकणातील अनेक कुटुंबांचे कुलदैवता आहे तसेंच इतिहास प्रसिद्ध पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्रावण महिन्यात, शिवरात्रीला आणि मे महिन्यात इथे भाविक व पर्यटकांची गर्दी असते. अस्तिविसर्जनासाठीही अनेकजण कोकण आणि मुंबईहून येथे येतात. हरिहरेश्वर मध्ये सागराच्या लाटण बरोबर खेळण्याचा मन मुराद अनुभव घ्यायचा असेल तर मंदिराच्या उत्तर दिशेच्या समुद्रकिनारी जावे.
मंदिराच्या उत्तर दिशेला असलेला रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा – नारळ-पोफळीच्या झाडांनी सजलेला – हा अगदी सुरक्षित आणि शांत आहे. इथे तुम्ही स्थानिकांच्या मार्गदर्शनाखाली समुद्र स्नानाचा मुक्तपणे आनंद घेऊ शकता.
हरिहरेश्वर पाहून झाल्यावर आम्ही शेखाडी मार्गे आर्वी बिच करत दिवेआगारातला जायचे ठरवले
हरिहरेश्वर ते दिवेआगार – निसर्ग, इतिहास आणि सूर्यास्ताचा साक्षात्कार
शेखाडी मार्गे आमची भटकंती सुरू
हरिहरेश्वर पाहून झाल्यावर आम्ही दिवेआगारला जायचं ठरवलं. दिवेआगाराला जायचे दोन मार्ग होते – एक थेट आणि एक शेखाडी मार्गे श्रीवर्धन, आर्वी किनारा करत. हरिहरेश्वर बीच वरील नारळपाणी विकणाऱ्या काकांनी आग्रहाने सांगितलं , "शेखाडी मार्गे जा आणी कड्यावरून सूर्यास्त बघणं विसरू नका!" त्यांचा प्रेमळ सल्ला स्वीकारून आम्ही प्रवास सुरू केला. हरिहरेश्वर ते श्रीवर्धन २१ किलोमीटर, तर हरिहरेश्वर ते दिवेआगार ३६ किलोमीटर अंतर आहे..२१ किलोमीटरचा वळणा वळणाचा कोकणाचा रस्ता पार करताच श्रीवर्धन बीच दिसू लागले. समुद्र किनारी प्रवेश करताच उजवीकडे मत्स्याहाऱ्यांच्या तोंडाची चव वाढवणाऱ्या कोलंबीचं (झिंगा) एक सुंदर शिल्प दिसलं – संपूर्ण शिल्प जुन्या मेकॅनिकल पार्ट्सपासून बनवलेलं होतं . टाकावू मधून सुंदर शिल्प बनवण्याची त्याची कल्पकता पाहून थांबावं लागलं.

थोडा वेळ शिल्पाचे निरीक्षण करून कलाकाराच्या कल्पकतेला सलाम करत आम्ही बीचच्या दिशेने चालू लागलो. समुद्रकिनाऱ्याभोवती गार्डन आणि वॉकिंग ट्रॅक बनवलेले आहे. श्रीवर्धनच्या बीचमध्ये प्रवेश करताच अथांग पसरलेला समुद्रकिनारा दृष्टीस पडतो. या सागरकिनाऱ्याला तीन किलोमीटरची वालुकामय, स्वच्छ आणि सुरक्षित किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे येथे विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स खेळले जातात. सीझनमध्ये हा सागरी किनारा पर्यटकांनी भरून जातो. मार्च हा परीक्षांचा महिना असल्यामुळे आज बीच तसा खाली होता.
श्रीवर्धन हे श्रीवर्धन तालुक्यातील गाव. ऐतिहासिक काळापासून कोकणातील एक महत्त्वाचे बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. सोळाव्या-सतराव्या शतकात श्रीवर्धन प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते, नंतर विजापूरच्या आदिलशहाकडे गेले. त्यानंतर हबशी म्हणजे जंजिऱ्याच्या सिद्दीकडे होते. मराठा साम्राज्याचे छत्रपती, साताऱ्याचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे.
श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिराजवळच बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचे जन्मस्थान आहे.श्रीवर्धनमध्ये समुद्रकिनाऱ्याशिवाय आवर्जून पाहण्याच्या गोष्टी म्हणजे ग्रामदेवता सोमजाई मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहेत. आम्हाला वेळ नसल्यामुळे ही मंदिरे पाहण्याची राहून गेली. काही वेळात सूर्यास्त होणार होता. आम्हाला आर्वी किनाऱ्याचा सूर्यास्त पाहायचा होता आणि लवकरात लवकर दिवेआगारला जाऊन राहण्याची सोय बघायची होती. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये जास्त वेळ न राहता, थोडा वेळ सागरकिनारी लाटांशी खेळून आम्ही आर्वी बीचच्या दिशेने निघालो.
आर्वी बीच श्रीवर्धनपासून साडेसात किलोमीटर, तर दिवेआगारपासून १४ किलोमीटर अंतरावर आहे.
आर्वी बीचजवळ येताच रस्त्याला लागून पार्किंगमध्ये गाड्या दिसू लागल्या. येथे श्रीवर्धनच्या तुलनेत पर्यटकांच्या गाड्या जास्त प्रमाणात होत्या. पर्यटकही इतर बीचपेक्षा किंचित जास्त दिसत होते. येथील वालुकामय किनारपट्टी मोठी असून, येथेही विविध वॉटर स्पोर्ट्स चालतात. खास करून सूर्यास्त बघण्यासाठी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. आर्वी समुद्राच्या चौपाटीवर थोडा वेळ गाडी थांबवून आम्ही समुद्राचे दर्शन घेतले.आर्वीचा समुद्रकिनारा एका टेकडीच्या कड्याला खेटून आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे समुद्राला समांतर चिकटून कड्यावर जाणारा वळणावळणाचा रस्ता आणि तिथून दिसणारे सूर्यास्ताचे विहंगम दृश्य. ते दृश्य पाहण्यासाठी आम्ही कड्याच्या पठारावर गेलो.

कड्यावर जाणाऱ्या रस्त्यावर गाडी चालवताना वेगळीच मजा येते - एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला समुद्र. कड्याच्या टोकावरील पठारावर आम्ही गाडी पार्क करून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायला गेलो. या पठारावरून समुद्रतटाच्या कड्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या पाहताना आपण एखाद्या चित्रपटातील दृश्य बघत आहोत असे वाटते. एका बाजूला कड्यावरून जाणारा रस्ता, दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला समुद्रर, किनाऱ्यावर दूरवर पसरलेल्या डोंगररांगा, कड्याखाली नारळी-पोफळीच्या बागेतील कोळीवाडा आणि क्षितिजावर मावळतीला जाणारा सूर्यनारायण - हा समोर मांडलेला निसर्गपट पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो.इच्छा असूनही संपूर्ण सूर्यास्त पाहता आला नाही. दिवेआगारला जाऊन राहण्याची आणि जेवणाची सोय करायची होती. इच्छेला आवर घालून आम्ही आर्वीवरून दिवेआगारच्या दिशेने निघालो. वाटेत कडा, समुद्रकिनारा आणि कोकणातील निसर्गाची साथ लाभतच होती. दिवेआगारात पोहोचताच नारळा - पोफळीच्या वाडीतील चिरांच्या लाल दगडाने साकारलेले सुंदर मंदिर दृष्टीस पडले. मंदिराची रचना इतकी सुंदर होती की, ते पाहण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. नकळत आम्ही सम्मोहित होऊन तिकडे वळलो. तिथे गेल्यावर कळले की हे दिवेआगारातील सुप्रसिद्ध रूपनारायण मंदिर आहे.

पूर्वी इथे कोकणी पद्धतीचे कौलारू लाकडी मंदिर होते. आता त्या जागि अंदाजे बारा-पंधरा वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करून चिरांच्या दगडाने नागर शैलीमध्ये हे मंदिर बांधले आहे. मंदिराच्या समोरील प्रांगणात दीपमाळ असून मंदिराच्या प्रवेशासमोर एक तुळशी वृंदावन आहे.
तुळशी वृंदावनाजवळून तुम्ही मुख्य मंदिरात प्रवेश करता. सभागृहात प्रवेश करताच गर्भगृहातील श्री विष्णूची सुंदर मूर्ती दिसून येते.ही मूर्ती म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. चक्र, गदा, शंख, पद्म धारण केलेल्या चतुर्भुजांनी अलंकृत मूर्तीभोवती दशावतार कोरलेले आहेत. प्रभावळीवर नक्षी, यक्ष-यक्षिणी कोरलेल्या आहेत. शरीरातील प्रत्येक अवयव आणि त्यावरील अलंकार उत्कृष्ट रीतीने कोरले आहेत. विष्णूच्या बाजूला कोरलेल्या दशावतारांच्या आणि प्रभावळीच्या नक्षीकामातील बारकावे जपले गेले आहेत.
मूर्तीच्या शंखधारी हाताच्या वरती कूर्म अवतार आणि कासव कोरलेले असून त्याच्याच बाजूला प्रभावळीजवळ बुद्ध अवतार आणि त्यावरती कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण आहे. शंखधारी हाताखाली नरसिंह अवतार कोरलेला आहे. नरसिंहाच्या खाली परशुराम आणि पायाशेजारी गरुडाची मूर्ती कोरली आहे. परशुराम आणि गरुडाच्या पायाखाली छोटीशी घोड्यावर स्वार कल्की अवताराची मूर्ती कोरलेली आहे. श्री विष्णू आणि गरुडाच्या पायाखाली एक पूजा करताना ब्राह्मण कोरलेला आहे.

चक्रधारी हाताजवळ मत्स्य अवतार आणि एक मासा कोरलेला आहे. चक्र धरलेल्या हाताखाली छोटीशी वामन मूर्ती आहे, त्याच्याच बाजूला वराह मूर्ती आहे. श्री विष्णूच्या पायाजवळ श्री लक्ष्मी किंवा सीता माई असावी आणि तिच्या बाजूला कोदंडधारी श्रीराम आहेत. श्रीरामाच्या पायाखाली भक्तीमध्ये तल्लीन रामभक्त हनुमान आहे . मूर्तीच्या प्रभावळीभोवती काही छोट्या-छोट्या मूर्ती आहेत, त्या कोणाच्या आहेत याचा अंदाज बांधता येत नाही.एवढ्या कमी जागेत एवढी नाजूक कलाकृती पाहताना कलाकाराचे कौशल्य निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. या सुरेख मूर्तीला पाहून रूपनारायण हे नाव समर्पक ठरते. सभामंडपात रूपनारायण मंदिराचा इतिहास लिहिला गेला आहे पुढे प्रमाणे

इ.स. ८०० ते १२६५ या कालावधीत शिलाहारांच्या उत्तर कोकण शाखेचे या प्रदेशावर अधिपत्य होते. रूपनारायणाची ही मूर्ती मधुमाला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी दगडात कोरलेली आहे. मूर्तीचे हात, नाक आणि चक्र भंगलेले असून, याबाबत एक कथा प्रचलित आहे. फिरंग्यानी (बहुधा ‘’ म्हणजे पोर्तुगीजांनी) ही मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथील भक्तांनी त्यांना रोखले. तरी मूर्ती जहाजात चढवली गेली, पण समुद्रात जहाज भरकटल्याने ती पुन्हा मूळ जागी स्थापन करण्यात आली. दिवेआगार गावाला प्राचीन इतिहास आहे. येथे दीड हजार वर्षांपूर्वीचे, म्हणजेच पाचव्या शतकातील ताम्रपट सापडले आहेत. शिलाहार नृपती मुंम्मुणीराज यांच्या ताम्रपटात ‘दीपकगर’ असा उल्लेख आहे. तसेच, मराठीतील सर्वात प्राचीन ताम्रपटात, शके ९८२ शर्वरी संवत्सर, मार्गशीर्ष पौर्णिमा, शुक्रवार, १० नोव्हेंबर १०६० रोजी ‘दिवेआगार’ असा उल्लेख आढळतो. मुसलमान आणि पोर्तुगीजांच्या वारंवारच्या हल्ल्यांमुळे हे गाव उद्ध्वस्त झाले.
इ.स. १७३२ मध्ये श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी या मंदिराला भेट दिल्याचा उल्लेख आहे. पेशवाईपासून मंदिराला वर्षासन मिळत होते, जे नंतर बंद पडले. रूपनारायणाच्या बाजूला सुंदर नारायण मंदिर बांधले आहे. सुंदर नारायणाच्या या विष्णुस्वरूपात डोक्यावर मुकुट, खांद्यावर रुळणारा केशसंभार, गोंडस बालकासारखा हसरा चेहरा आणि चतुर्भुज रूप आहे. दोन हातांत चक्र आणि , उर्वरित दोन हातांत पद्म आणी शंख धारण केलेली अशी सुंदर मूर्ती गर्भगृहात विराजमान आहे.
मंदिराबाहेर एक प्रशस्त खोल पुष्करणी आहे, ज्यामुळे मंदिराच्या प्राचीनतेला आणखी पुष्टी मिळते. पुष्करणीत उतरण्यासाठी पूर्वेकडून पायऱ्या असून, मार्च महिन्याच्या शेवटीही त्यात बऱ्यापैकी पाणी होते.
स्थानिकांशी संवाद साधताना एक नवीन माहिती समोर आली की, रूपनारायण मंदिरासमोरील ढिगाऱ्याखाली खोदकाम करताना आणखी एक प्राचीन पुष्करणी सापडली आहे. सध्या तिथे उत्खननाचे काम सुरू आहे.
काळोख पडत आला होता आणि आमच्या मोबाइलच्या बॅटऱ्या संपत आल्या होत्या. रूपनारायण मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही सुवर्ण गणपतीच्या दर्शनासाठी निघालो. तिथे गेल्यावर परिसरात घरगुती खानावळ शोधून राहण्याची सोय पाहयची होती
सुवर्ण गणपती आणि दिवेआगारचा अनुभव
सुवर्ण गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही परिसरात घरगुती खानावळ शोधली आणि तिथे रात्री राहण्याची सोय केली. खोलीत पोहोचल्यावर आम्ही मोबाईल चार्जिंगला लावले, आंघोळ करून ताजेतवाने झालो. मग गरमागरम, चविष्ट जेवण घेतलं आणि दिवसभराच्या प्रवासानंतर थकलेल्या शरीराला विश्रांती मिळाली. सकाळी सहा वाजता उठून आवराआवरी करून सात वाजता सुवर्ण गणपतीच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. सकाळी सात वाजता मंदिर बंद होतं आणि दिघीहून आगरदांडा जेट्टीकडे जाणारी पहिली फेरी आठ वाजता होती, त्यामुळे आमच्याकडे भरपूर वेळ होता. म्हणून दिवेआगार गावात फेरफटका मारायचे ठरवले. गाव अतिशय निसर्गरम्य वाटत होतं. दोन्ही बाजूंनी नारळा, पोफळीच्या बागा आणि त्यात वसलेली कोकणी शैलीतील घरं – अगदी चित्रासारखा देखावा! पक्षांची किलबिल, आणि सकाळची गार हवा, याचा अनुभव घेत घेत आम्ही हळूहळू गाडी चालवत दिघीच्या दिशेने निघालो. सुवर्ण गणपती मंदिराचा इतिहासही अलीकडचाच आहे . पूर्वी हे मंदिर पारंपरिक कोकणी पद्धतीचं कौलारू होतं. आता त्याचा जीर्णोद्धार करून लाल चिरांपासून भव्य आणि देखणं मंदिर उभारलं गेलं आहे.
१७ नोव्हेंबर १९९७ रोजी, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत सुपारीचे रोप लावत असताना, जमिनीत एक तांब्याची पेटी सापडली. गावकऱ्यांच्या उपस्थितीत ती पेटी उघडल्यावर आत एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणेशमूर्ती आणि एक ताम्रपट सापडला. ही सुवर्ण मूर्ती पुढील काही वर्षे – १९९८ ते २०१२ – मंदिरात विधिवत स्थापित होती. परंतु २०१२ मध्ये दुर्दैवाने ही मूर्ती चोरीला गेली. चोरट्यांनी मूर्ती वितळवून टाकल्याने, सध्या मंदिरात तिची सुवर्णाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे.
0 Comments