दुसरा दिवस
काल आमचा मुंबई ते दिवेआगार असा जवळपास ३०० किलोमीटरचा प्रवास झाला होता. आज मात्र त्याच्या तुलनेत अगदीच कमी – केवळ १२५ किलोमीटरचा, घरापर्यंतचा प्रवास बाकी होता. दिघीपर्यंतचा हा टप्पा अत्यंत सुखद गेला. कुठे खड्डे नव्हते, ना कुठलाही अडथळा. अगदी आनंददायी प्रवास झाला. मुंबईच्या रस्त्यांपेक्षा कितीतरी पटीने येथील रस्ते चांगले वाटले. रमतगमत आम्ही गाडी चालवत दिघी गावात पोहोचलो. गावात प्रवेश करताच शांतता जाणवली , पण ही शांतता काही वर्षांत हरवेल असं वाटतं. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर प्रकल्पांतर्गत दिघी बंदर आता ग्रीनफिल्ड औद्योगिक कॉरिडोरचा हिस्सा बनलंय. अडाणी इंटरनॅशनल पोर्टमुळे दिघी आता जगाच्या नकाशावर झळकतंय. मोठमोठ्या कंटेनरच्या वाहतुकीमुळे या शांत गावाचा कायापालट होणार, आणि कदाचित शांतताही हरवेल. दिघी जेट्टी आणि फेरीचा प्रवास - सकाळी पावणे आठच्या सुमारास आम्ही दिघी जेट्टीवर पोहोचलो. समोर आगारदांडा जेट्टी दिसत होती, आणि पश्चिमेला अडाणी पोर्टच्या हालचाली जाणवत होत्या. आगारदांड्याच्या पश्चिमेला भर समुद्रात अजिंक्य जंजिरा किल्ला आपलं वैभव मिरवत होता. दिघी ते आगरदांडा ही फेरी सेवा कोकणातील प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. ही सेवा सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस Pvt. Ltd. तर्फे चालवली जाते.
फेरी वेळापत्रक व माहिती:
सेवा वेळा: सकाळी ८:०० ते सायंकाळी ६:००, दर तासाला एक फेरी उपलब्ध
प्रवासाचा कालावधी: सुमारे २० मिनिटे (समुद्राच्या स्थितीवर अवलंबून)
ही सेवा स्थानिकांसह पर्यटकांनाही उपयोगी ठरते, विशेषतः मुरुड-जंजिरा, काशीद बीच, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनसारख्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. त्यामुळे येथील पर्यटन उद्योगालाही चांगली चालना मिळू शकते. आमची भटकंती पूर्णपणे अनियोजित होती. बोटीत चढेपर्यंत पुढे कुठे जायचं हे ठरलं नव्हतं. अलिबागचा किल्ला, चौलचं दत्त मंदिर, कोरलाई किल्ला, फणसाड अभयारण्य असे पर्याय मनात घोळत होते. अलिबाग परिसरात तीन-चार वेळा येऊनही जंजिरा किल्ला पाहायचा योग आला नव्हता. अखेर बोटीतच निर्णय घेतला—आधी जंजिरा, मग वेळेनुसार पुढचं नियोजन!
बरोबर ८ वाजता, ऑन टाइम, दिघीहून आगरदांड्याला जाणारी बोट आली. दिघी वरून २० मिनिटांत आम्ही आगारदांडा जेट्टीवर पोहोचलो.आगारदांडा जेट्टीवरून जंजिरा किल्ल्या वर जाणाऱ्या राजपुरी जेट्टीचं अंतर फक्त ७ किलोमीटर आहे.
या रस्त्यावर खोकरी गावाजवळ इंडो-सारासेनिक शैलीत बांधलेली तीन भव्य दगडी थडगी लक्ष वेधून घेतात. सर्वात मोठं थडगं सिदी सुरुल खानचं आहे, जो १७०७ ते १७३४ दरम्यान जंजिरा राज्याचा प्रमुख होता. त्याचं थडगं त्याच्या हयातीत बांधण्यात आलं. उर्वरित दोन थडग्यांपैकी एक सिदी कासिम (याकूत खान) याचं असून, तो १६७०-१७०७ दरम्यान जंजिरा आणि मुगल ताफ्यात सेनापती होता. तिसरं थडगं त्याचा भाऊ खैरियत खान याचं आहे. खोकरी येथून आगारदांडा सुमारे ४ किलोमीटर तर राजपुरी जेट्टी ३ किलोमीटर अंतरावर आहे. येथे रस्ता दोन फाट्यांत विभागतो – उजवव्या दिशेकडे, आणि डावीकडचा राजपुरी जंजिरा जेट्टीकडे. आम्ही डाव्या फाट्यावरून जेट्टीपर्यंत पोहोचलो.
जंजिरा जेट्टी आणि होडीचा प्रवास जेट्टीच्या पार्किंगमध्ये गाडी लावून आम्ही न्याहारीसाठी हॉटेल गाठलं.न्याहारी करून बॅगा हॉटेलात ठेवल्या, फक्त पाण्याची बाटली सोबत घेतली. किल्ल्यावर पाण्यासह काहीच मिळत नाही, त्यामुळे पाणी बाळगणं गरजेचं होतं. एका-दोन तासाच्या प्रवासासाठी खाण्याची गरज वाटली नाही. न्याहारीनंतर जेट्टीच्या तिकीट काउंटरवर गेलो. तिथे एक मोठा ग्रुप आल्याने त्यांना प्राधान्य देत पहिल्या होडीत बसवलं गेलं, आणि आम्हाला दुसऱ्या होडीसाठी १५-२० मिनिटे थांबावं लागलं. सव्वा नऊनंतर पर्यटकांची गर्दी वाढली. इथली पद्धत अशी—तिकीट काढा, होडी भरली की सोडा. तिकीटाचा दर प्रति व्यक्ती १०० रुपये. पुरेशी प्रवासी नसल्यास होडी सोडली जात नाही. पण आता गर्दी वाढल्याने होड्या पटापट सुटू लागल्या.
जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी जुन्या शैलीच्या शिडीच्या होड्या वापरल्या जातात. अशाच एका होडीत बसून आमचा प्रवास जंजिरा किल्ल्याकडे निघाला. समुद्राच्या मधोमध होडी येताच एक तरुण नाविक उभा राहून बोलू लागला. त्याचं बोलणं ऐकताच त्याचा हेतू पैशांचा आणि इतिहासाची मोडतोड समजायला वेळ लागला नाही.
‘इतिहास’ सांगणंनाविकाने सांगितले, “किल्ल्यावर आम्हाला आत जाण्याची परवानगी नाही. पूर्वी गाइड असायचे, ते इतिहास सांगायचे, किल्ला दाखवायचे. ते ५००-८०० रुपये घ्यायचे. मी तुम्हाला इथूनच किल्ल्याचा इतिहास आणि पाहण्याच्या गोष्टी सांगतो. तुम्ही दोघे असाल तर १०० रुपये द्या, दोन पेक्षा जास्त असाल तर २०० दया. आम्ही दिवसभर होड्या चालवतो, महिन्याला ७-८ हजार कमावतो. एवढी मदत करा, आम्ही पैसे वाटून घेतो.”मग त्याने आपला ‘इतिहास’ सुरू केला: “या किल्ल्याचं खरं नाव जजीरे मेहरुब. जजिरा म्हणजे पाण्याने वेढलेलं बेट, आणि मेहरुब म्हणजे चंद्रकोर. १२व्या शतकात इथे बेट होतं, त्यावर पिराचा दर्गा होता. मसाल्याच्या व्यापारासाठी आलेले अरब व्यापारी दर्ग्याला भेट द्यायचे. सिद्दी हलालला दर्ग्याला भेट दयायची होती, पण कोळ्यांचा नेता राम पाटील याने मज्जाव केला. रागावलेल्या सिद्दी हलालने राम पाटीलला हरवून बेट ताब्यात घेतलं आणि किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. संभाजी महाराजांनी समोरच्या जागी भराव टाकून सेतू बांधायचा प्रयत्न केला, पण पाणी जास्त असल्याने ते जमलं नाही. हा किल्ला अजिंक्य राहिला. जंजिरा जिकंकण्या संभाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्गही सिद्दींनी जिंकला.
किल्यावर आजही काही गोष्टी पाहण्यासारखे आहेत. किल्ल्यावर भारतात दुसऱ्या क्रमांकाची ‘कलाल बांगडी’, ‘लांडाकासम’ आणि ‘चावरी गायमुख’ तोफा आहेत. किल्यावर वाडा, पिराचा दर्गा, मंदिर आणि गोड्या पाण्याचा तलाव आहे. पूर्वी तिथे तलावा जवळ काचेचा शीशमहाल होता,त्या मधून सप्तरंगी प्रकाश पडायचा. ४५ मिनीटात किल्ला किल्ला पाहून दरवाज्यावर या, आम्ही तुमची वाट पाहू.आम्ही तुम्हाला किल्ल्यावर सोडून ४५ मिनिटांनी परत येऊ. आम्ही समुद्राच्या खवळलेल्या लाटांवर डोलत, होडीने जंजिऱ्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो.जंजिरा, २२ बुरुजांचा, २२ वर्षांत बांधलेला आणि ३५० वर्षांहून अधिक काळ अजिंक्य राहिलेला किल्ला! ४० फूट उंच तटबंदी, वाळू, चुनखडी, गूळ आणि वितळलेल्या शिशाने जोडलेले दगड, जोड इतके भक्कम की, लाटांच्या माऱ्याने दगड झिजले तरी जोड शाबूत आहेत. जंजिरा किल्ल्याचा दरवाजा पूरवामुखी आहे, पण तो बुरुजात लपलेला असल्याने बाहेरून दिसत नाही. लाटा किल्ल्याच्या पायथ्याशी जोरात आदळत असल्याने होडीतून उतरणे खडतर बनते. ४५ मिनिटांच्या वेळेत यातच १० मिनिटे निघून जातात.होडीने प्रवेशद्वारापाशी पोहोचल्यावर, आत एक उपद्वार दिसते.
मुख द्वाराच्या उजव्या भिंतीवर शरभाचे अप्रतिम शिल्प आहे. या काल्पनिक प्राण्याने चार पायांत चार हत्ती आणि शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे. शरभ म्हणजे, सिंहाची ताकद आणि गरुडाचे पंख यांचे मिश्रण, हत्ती व सिंहापेक्षा बलवान पौराणिक प्राणी आहे.
शैव ग्रंथांनुसार, विष्णूच्या नृसिंह अवताराला शांत करण्यासाठी शंकराने शरभरूप घेतले, तर बौद्ध कथांनुसार, शरभ हा बुद्धाचा पूर्वजन्म आहे. भारतीय राजसत्तांनी आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी अशी शिल्पे किल्ले आणि मंदिरांवर कोरली; विदेशी आक्रमकांनीही ही परंपरा पुढे चालवली. शरभ शिल्पाच्या वरच्या बाजूला एक शिलालेख कोरलेला आहे. डाव्या भिंतीवर दोन हत्तींची साठमारीच शिल्प असून त्याचा वरती वाघ आणि शरभ अशी रचना आहे. हत्ती हे सामर्थ्य, संपत्ती आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. वाघ राज्यासतेच्या सामर्थ्याचं.
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर पुरातत्व खात्याची तिकीट खिडकी दिसते. तिथे 100 रुपये प्रवेश शुल्क भरून किल्ल्यात प्रवेश मिळतो. तिकीट घेई पर्यंत 15 मिनिटे निघून जातात, आणि हाती उरतो फक्त अर्धा तास. 22 एकरांत पसरलेला हा प्रचंड किल्ला,आणि त्यातील अवशेष पाहण्यासाठी दोन-तीन तास लागतात.अर्ध्या तासात किल्ला पाहणे अशक्य आहे. आम्ही पूर्वेकडील बुरुजावरील ‘कलाल बांगडी’ तोफेपासून किल्ल्याला प्रदक्षिणा घालायचे ठरवले.
जंजिरा किल्ल्यालाच ‘किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा’ अशी नावे होती. इ.स. १५०८ मध्ये मलिक अहमद निजामशाहा मरण पावला. त्याचा ७ वर्षाचा अल्पवयीन मुलगा बुर्हाण निजामशाहा गादीवर आला. मिर्झाअल्ली आणि कलबअल्ली हे दोन निजामशाही सरदार उत्तर कोकणातील दंडाराजपुरास आले.त्या काळात समुद्री चाचे आणि लुटारूंपासून बचाव करण्यासाठी स्थानिक कोळी समाजाने एका प्रचंड खडकावर लाकडी किल्ला बांधला. रामपाटील या कोळ्याचा अंमल त्यावेळी त्या सर्व परिसरावर होता.
निजामशाहाने पिरमखान नावाच्या सरदाराला रामपाटीलचा काटा काढण्यासाठी पाठवलं. पीरमखान सुभेदार हा वंशाने सिद्दी होता सिद्दींचे पूर्वज हे पूर्व आफ्रिकेतील ‘बांतू’ जमातीतले. अरब व्यापाऱ्यांसोबत गुलाम म्हणून सिद्दी भारतात आले.अहमदनगरच्या निजामशाहच्या पदरीही सिद्दी होते, त्यांपैकी सुभेदार पीरमखान. पिरमखानाने व्यापारी बनून मेढेकोटच्या आजुबाजूला गलबते लावली आणि रामपाटीलाला दारू पाजून बेहोष केले व मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला. रामपाटीलला निजामशाहाकडे पाठवून त्याचे धर्मांतर केले. इ.स १५२६ ते १५३२ च्या कारकिर्दीनंतर इ.स १५३२ मध्ये पिरामखान मरण पावला. पुढे १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार लाकडी मेढेकोटा ऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात झाली. हे काम इ.स १५७१ पर्यंत पूर्ण झाले आणि हा दगडी कोट ’किल्ले मेहरुब’ नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे १५५७ मध्ये अलर्गखान याची येथे नेमाणुक झाली. १६१२ मध्ये याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहीमखान याची नेमणूक झाली. याच्या मृत्यूनंतर १६१८ ते १६२० च्या कालावधीत सिध्दी सुरुदखान हा ठाणेदार झाला. यानंतर सुमारे १९४७ पर्यंत २० सिध्दी नवाबांनी जंजिरा किल्ल्यावर हक्क गाजवला. मुरुड परिसरातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांची सांगड बसत नसल्याने मलिक अंबरने हा मुलूख तोडून देऊन याठिकाणी नवीन जहागीरदारी स्थापन केली आणि सिध्दी अंबरसानक या मुलूखाची जबाबदारी पाहू लागला. अर्थात या जंजिरा संस्थानाचा संस्थापक सिध्दी अंबरसानकच ठरला. इ.स १६२५ मध्ये मलिक अंबर मरण पावला जंजिरेकर स्वतंत्र सत्ताधीश झाले होते. २० सिध्दी सत्ताधिशांनी मिळून ३३० वर्षे राज्य केले.आणि १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.
इ.स १६४८ मध्ये शिवरायांनी तळेगड, घोसाळगड आणि रायगड परिसरातील मुलूख जिंकला. १६५७ मध्ये जावळी जिंकली आणि त्यांनी आपली नजर उत्तर कोकणावर वळवली. किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तर कोकणावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही, हे सत्य शिवरायांना उमगले होते. १६५९ मध्ये शिवरायांनी शामराजपंत व त्यांच्या सोबत बाजी घोलपला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण, हा पहिला प्रयत्न फसला. पुन्हा १६५९ मध्ये निळोजीपंत रघुनाथ मुजुमदार ,मायाजी भाटकर यांनी जंजिराच्या सिध्दीची कोंडी केली. पण पुन्हा हा प्रयत्न फसला. १६७८ च्या जुलै मध्ये शिवरायांनी जंजिर्यावर स्वारी करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. जंजिर्यावर लक्ष ठेवण्यासाठी व खुष्कीच्या मार्गाने वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्याचा समोरील टेकडीवर ‘सामराजगड’ उर्फ ‘दंडा राजापूरी गडाची उभारणी केली होती. जंजिर्यावरील मोहिमांसाठी मराठ्यांचा तळ या किल्ल्यावर पडत असे.
शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनीही १६८२ मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला.ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी सेतू बांधला होता. तीनशे गलबते घेऊन राजांनी जंजिऱ्यावर आक्रमण केले. किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरू झाला. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. यावेळी जंजिऱ्यावर सिद्धी खैरात खान, सिद्धी कासम खान होते. हे ही शंभूराजांना रोखू शकले नाही. आता जंजिरा हातात येणार त्याचवेळी औरंगजेबाने हसन अली या सरदाराला ४० हजारांची फौज देऊन स्वराज्यावर पाठवलं. संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडावी लागेली. कोंडाजी फर्जंद यांनी सांभाजी महाराजांशी फितुरीचे नाटक केले आणी सुद्दीला जाऊन मिळाले. जंजिरा किल्ल्यात प्रवेश केला.त्यांचे हे कारस्थान सिद्दीच्या लक्षात आले, आणि .कोंडाजी फर्जंद आणि त्यांच्या साथीदार मावळ्यांना पकडून त्यांच्या शिरच्छेद करण्यात आला. स्वराज्याच्या ह्या महान योद्धाचे जंजिरा घेण्याच्या प्रयत्नात बलिदान गेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला हस्तगत करण्यासाठी व सिद्दीला वचक बसवण्यासाठी जंजिरा किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला. मराठ्यांच्या दोन छत्रपतीनि किल्ला स्वराज्यात दाखल करण्यात यश आले नाही परंतु त्यांनी या परिसरात दोन किल्ल्यांची नवनिर्मिती केली गिरीदुर्ग सामराजगड दुसरा जलदुर्ग पद्मा दुर्ग . संस्थानाचा विसावा आणी शेवटचा अधिपती म्हणजे सिध्दी मुहंमदखान याच्याच कारकिर्दीत जंजिरा संस्थान ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले.सवातंत्र्य मिळाल्यानंतर सिद्दींनी हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात दिला आणि स्वतः मध्य प्रदेशात इंदूरला स्थायिक झाले.देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी या किल्ल्यात ५५० कुटुंबीयांचं वास्तव्य होतं. १९८० पर्यंत येथील सर्वच नागरिक किल्ल्यावरून मुख्य भूमीतील विविध गावांमध्ये स्थायिक झाले.
जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही आणखी एक दरवाजा आहे. २२ बुलंद बुरूज असून दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर ५९२ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलाल बांगडी, लांडाकासम व चावरी गायमुख या तोफा आजही पाहायला मिळतात. कालाल बांगडी ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तोफ आहे असे सांगितले जाते. किल्ल्याच्या मध्यभागी सुरूलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. ३ मजली पडकी परंतू भक्कम बांधणीची इमारत दिसते, यालाच "सुरुलखानाचा वाडा" असे म्हणतात .या वाड्याच्या उत्तरेस सुंदर बांधकाम केलेला शोडषट्कोनी गोड्या पाण्याचा तलाव आहे. हा तलाव सुमारे २० मीटर व्यासाचा आहे. तलावाच्या चार कोपयात चार हौद आहेत.बालेकिल्ल्याच्या मागे चुनेगच्ची इमारत आहे, यालाच सदर असे म्हणतात. तलावाच्या बाजूने बांधीव पायर्यांनी थोडे वर गेल्यावर किल्ल्यातील सर्वात उंच भाग दिसतो त्याला बालेकिल्ला म्हणतात या येथून किल्ल्यातील सर्व भागावर लक्ष ठेवता येते.गडाच्या पश्चिमेला तटाखाली, तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे, यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत होता. दरवाजाच्या वरच्या भागातच तटबंदीच्या जवळ कैदखाना होता. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.
दर्या दरवाजाकडे आता सरकारकडून एक नवीन जेट्टी बांधण्याचे काम सुरू झाले आहे. बहुधा भविष्यात इथे दिघी जेट्टीहून फेरी बोट येण्याची व्यवस्था होईल. सध्या समुद्रात भराव टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आत्तापर्यंत आपण राजापुरी येथील जुन्या जेट्टीवरून शिडीच्या होडीने जंजिरा किल्ल्यात प्रवेश करतो. मात्र, ही नवी जेट्टी उभारली गेल्यास पर्यटकांना एक सुलभ व सुरक्षित पर्याय उपलब्ध होईल. शिवाय, स्थानिकांची मनमानीही यामुळे थांबेल अशी अपेक्षा आहे.
संपूर्ण किल्ला नीट पाहण्यासाठी किमान दोन ते तीन तास हवेत. मात्र, फेरी होडीसाठी दिलेल्या ४५ मिनिटांपैकी प्रत्यक्ष किल्ला पाहण्यासाठी फक्त अर्धा तासच मिळतो जो पूर्णतः अपुरा वाटतो. आम्ही तटबंदीवरून किल्ल्याची प्रदक्षिणा करत असतानाच वेळ संपलाच. अजून बरेच काही पाहायचे होते, पण मनात इच्छा असतानाही आम्हाला मुख्य दरवाजाकडे परत जावे लागले, कारण होडीची वेळ झाली होती.
जंजिरा किल्ल्यात होडीने चढणे उतरणे जिकिरीचे काम असते. खासकरुन मार्च नंतर समुद्र लाटांचा जोर जास्त असतो मुरुड-जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सर्वात उत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो हे आम्हाला येथील नाविकाने सांगितले. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि समुद्र शांत राहतो, त्यामुळे बोटीतून किल्ल्यापर्यंतचा प्रवास सुखकर होतो. किल्ला दर्शनासाठी वयस्कर आणि लहान मुलांबाळांना घेऊन आलेल्या पर्यटकांना उतरताना न आल्यामुळे किल्ला न पाहता परतीच्या प्रवासाला जावे लागले. लहान मुलं आणि वयस्कर लोकांना घेऊन येत असाल तर मार्च एप्रिल मे मद्ये येणे टाळावे. पावसाळ्यात किल्ला बंद असतो. होडीत बसण्याचा ‘टास्क’ पार पाडून आम्ही पुन्हा राजापुरीच्या दिशेने निघालो. प्रवाशांची अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून होडीने आम्हाला मुख्य जेट्टीऐवजी दुसऱ्या एका छोट्या जेट्टीवर उतरवले. तिथून बाहेर पडताच, मुख्य रस्त्यावर येऊन आम्ही सामराजगडाचा रस्ता कुठून जातो हे विचारले. दर्ग्याच्या बाजूने जाणारी एक वाट गडावर जाते, असे स्थानिकांकडून समजले. गडावर चढण्याची इच्छा होती खरी, पण भर दुपारची रखरखीत ऊन आणि तापलेले अंग यामुळे आम्ही हा बेत अखेर रद्द केला आणि मुरुडमार्गे अलिबागच्या दिशेने प्रस्थान केले.
मुरुडमध्ये प्रवेश करताच बाजारपेठेत गजबज जाणवू लागली. हिंदू घरांमध्ये गुढ्या उभारलेल्या दिसत होत्या, तर मुस्लिम वस्त्यांमध्ये ईदच्या तयारीची लगबग होती. रस्त्यावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा निघालेली दिसली वातावरणात एक उत्सवी रंग भरून राहिला होता. मुरुड मध्ये एक्टिवाची पेट्रोल टाकी फुल करून मार्गस्थ झालो. रेवदंडा येतात आम्ही रेवदंडा किल्ल्याच्या आतील रस्त्या मध्ये गाडी वळवली. रेवदंडा किल्ल्यामध्ये महादेवाच्या मंदिरातील शिकारीचे कास्ट शिल्प पाहण्याची इच्छा होती. पण हाती निराशा आली, मंदिराचा जीर्णोद्धार होऊन तेथील काष्ट शिल्प दुसरीकडे हलवल्या गेल्याचे कळल. रेवदंडा किल्ल्यातुन आम्ही चौलच्या दिशेने निघालो. रेवदंडा-चौल रस्त्यावर एक भव्य पुष्करणी आणि तिच्या बाजूलाच वसलेलं चौल गावचं रामेश्वर शिवमंदिर लक्ष वेधून घेत होतं. या आधीही या रस्त्यावरून जाताना आम्ही गाडीतून मंदिर पाहिलं होतं, पण प्रत्यक्षात जाता आलं नव्हतं. यावेळी मात्र या ऐतिहासिक मंदिराला भेट द्यायचंच ठरवलं.
मंदिरासमोर भव्य अशी पुष्कर्णी त्याच्यासमोर सुंदर कौलारू कोकणी पद्धतीचे सुंदर मंदिर आणि ह्या दोघांच्या मध्ये नंदीपंड आणि दोन दीपमाळ एकूणच संपूर्ण परिसर चित्रवत वाटतो. मंदिरात चौल रेवदंडा रस्त्या जवळील स्वागत कामानीतू प्रवेश केल्यावर प्रथम गणेश मंदिर लागते. गणेश मंदिरात श्री गणेशाच्या मूर्ती स्वबत श्रीदत्त मूर्ती आहे. गणेश मंदिराच्या पूर्व दिशेस दोन दीपा माळा आणि नंदी मंडप आहे. नंदीमंडपा कडून पायऱ्या पुष्करणीमध्ये उतरतात. पुष्करणीमध्ये हात पाय धुऊन नंतर मंदिरात प्रवेश करावा असा इथला जुना प्रघात आहे. नंदी मंडपातून सभामंडपात प्रवेश केल्यास रामेश्वर महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते. रामेश्वर मंदिराच्या पाठीमागे हनुमंताचे मंदिर आहे. मंदिराच्या उत्तर दिशेला विठ्ठल रखुमाईचे मंदिर असून त्यात विठ्ठल रखुमाई बरोबर दोन गणेश मूर्ती आहेत. मंदिराबाहेर पश्चिम बाजूस उघड्यावर एका मंचावर नवग्रहांची मांडणी केलेली दिसते आणी पूजा केली जाते.
चौल हे जागतिक कीर्तीचे प्राचीन ऐतिहासिक बंदर होते. ३६० मंदिरं, ३६० तळी होती आणि ते १६ पाखाड्यात विभागलं गेलं होतं. सातवाहान,शिलाहार ते मध्ययुगात निजामशाही पोर्तुगीज मराठेशाही या शहरानं अनेक राजवटी पाहिल्या . त्यामुळे इथल्या मंदिरांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्यापैकी हे रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिर बांधलं कोणी याचा उल्लेख सापडत नाही. मात्र मंदिराची दुरुस्ती अनेकदा झाल्याचे दाखले मिळतात. ऑक्टोबर १७४१ मध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर श्रीनिवास दीक्षितबाबा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासाठी लागणारा निधी नानासाहेब पेशवे आणि मानाजी आंग्रे यांनी दिला. त्यानंतर विसाजीपंत सरसुभेदारांनी अपूर्ण काम पूर्ण केलं. नंदीजवळ दीपमाळ, तुळशीवृंदावन बांधले. १८१६ मध्ये मंदिराचा नगारखाना आणि १८३८ मध्ये पुष्करणीची दुरुस्ती करण्यात आली. या पुष्करिणीच्या दुरुस्तीसाठी ७५० रुपये खर्च ग्रामस्थांनी मिळून केला. नंदीजवळ असलेली दीपमाळ लाडो भावजी प्रभू पाताणे यांनी १७८४ मध्ये बांधली तर पुष्करिणीजवळ असलेली दीपमाळ बाबाजी लोहार यांनी बांधली. सध्या मंदिर परिसरात सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. मंदिराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या कामामुळे भविष्यात हे स्थळ आणखी रमणीय होईल, यात शंका नाही. संतोषला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईत पोहोचायचं असल्यामुळे अलिबाग किल्ल्यावर जाण्याचा विचार आम्ही रद्द केला आणि रामेश्वर मंदिर परिसरातच आमची भटकंती समाप्त करण्याचा निर्णय घेतला.
![]() |
| नवग्रहांचा चौथरा |
रामेश्वर मंदिर येथून अलिबाग अवघं १६ किलोमीटर अंतरावर आहे, तर रेवस जेट्टी ३६ किलोमीटरवर. मुंबईला परतण्यासाठी आम्ही रेवस जेट्टीच्या दिशेने मार्गस्थ झालो...




.jpeg)


.jpeg)





.jpeg)




0 Comments