LATEST BLOGS

सोंडाई भटकंती: एक पावसाळी अनुभव


गडाची माहिती


गडाचे नाव: सोंडाई
प्रकार: गिरीदुर्ग
उंची: १२०० फूट (सुमारे ३६६ मीटर)
जिल्हा: रायगड

प्रवासासाठी जवळचे ठिकाण: कर्जत रेल्वे स्टेशन (गडाच्या तोंडापासून ११ कि.मी.)
जवळची गावे (पायथा): सोंडवाडी आणि वावर्ले
प्रवासाचा मार्ग: कर्जत स्टेशनवरून सोंडवाडी गावात जाण्यासाठी ऑटो-रिक्षा उपलब्ध.

ट्रेकचा प्रकार: सोपा, पण पावसात मध्यम स्वरूपाचा.
गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ: सोंडवाडीतून १ तास, तर वावर्ले गावातून २ ते ३ तास लागतात. सोंडवाडीतून जाण्याचा मार्ग सोपा व जवळचा आहे.
वाहतूक मार्ग (मुंबई-पुणे): मुंबई-पनवेल मार्गे चौक गाठावे. चौकपासून बोरगाव फाटा ६ कि.मी. आणि वावर्ले फाटा ८ कि.मी. अंतरावर आहे.

जेवण: गडावर जेवणाची सोय नाही. कर्जत किंवा पायथ्याच्या गावात आधी सांगितल्यास घरगुती जेवणाची सोय होऊ शकते. पावसाळ्या नंतर पर्यटकांची संख्या कमी असल्याने नाश्ता मिळणे कठीण असते.
पाणी: गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे, परंतु उन्हाळ्यात टाकीतील पाणी काढण्यासाठी दोर सोबत ठेवावा लागतो.
राहण्याची सोय: गडावर राहण्याची सोय नाही, पण वावर्ले किंवा सोंडवाडीतील शाळेत राहण्याची व्यवस्था होऊ शकते.

टीप: योग्य नियोजन केल्यास सोंडाई किल्ल्यासोबत सोनगिरी किंवा ईर्शाळगड एका दिवसात करता येतात.

किल्ल्यावरील प्राचीन अवशेष : तीन पाण्याची टाकी आणि सोंडाई देवीची मूर्ती.

भौगोलिक स्थान आणि ऐतिहासिक महत्त्व-:
सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडे अंतर राखून पश्चिम बाजूस कोकणात माथेरान डोंगर रांग आहे. माथेरान डोंगराभोवती प्रबळगड, ईर्शाळगड, पेब किल्ला आहेत. गारबेट पॉइंटच्या (Garbut Point) अगदी सोंडेच्या टोकाला, फक्त ८०० मीटर अंतरावर छोट्या डोंगरावर सोंडाई किल्ला आहे. ईर्शाळगड, माथेरान आणि सोंडाई किल्ल्याच्या मध्ये धवरी वाहते त्या नदीवर नवी मुंबईची तहान भागवणारे मोरबे धरण बांधले आहे. हा किल्ला छोटेखानी असल्याने इथे मोठ्या ऐतिहासिक लढायांच्या किंवा घटनांच्या नोंदी आढळत नाहीत. किल्ला असला तरी बुरुज, तटबंदी किंवा महादरवाजाचे अवशेष अस्तित्वात नाहीत. येथील पाण्याच्या टाक्यांच्या बांधणीवरून हा किल्ला शिवपूर्वकाळापासून अस्तित्वात असावा असे दिसते. बोरघाटातून (आताचा खंडाळा घाट) कोकणात होणाऱ्या कल्याण, सुपारक आणि पनवेल बंदरातील व्यापारी व लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असावा.

सोंडाई गड
सोंडाई गड


🌧️ गडभ्रमंती वृत्तांत-:


    पावसाळ्याची चाहूल मे महिन्याच्या मध्यावर लागल्याने, पावसाळी भटकंतीचा पहिला बेत आम्ही १५ जूनला कालदुर्गच्या दिशेने आखला. मात्र, पावसाच्या अभावी ती भटकंती कोरडी ठरली. काही कारणां मुळे दरम्यानच्या काळात दुसरी भटकंती जमली नाही. अखेर २१ सप्टेंबरला सगळे मित्र पुन्हा एकत्र जमले आणि २८ तारखेला कुठेतरी जाऊन येण्याचा निर्णय झाला. प्रत्येकाला संध्याकाळपर्यंत सुमारे पाच वाजेपर्यंत घरी पोहोचायचे असल्याने, दूरच्या ठिकाणी जाण्याचा विचार बाजूला पडला. त्यामुळे आसन गावाजवळ होणाऱ्या रानभाजी महोत्सवाला जाण्याचे ठरले. २७ तारखेला शनिवारी पुन्हा चर्चा झाली आणि रानभाजी महोत्सवाऐवजी गडभ्रमंतीचा विषय पुढे आला. मात्र, मित्र विलास याला चार वाजता ड्युटीवर रुजू व्हायचे असल्याने, साडेतीनपर्यंत मुंबईत पोहोचता येईल असा गड शोधणे आवश्यक होते. कोरीगड, सोनगिरी आणि सोंडाई या तिन्ही किल्ल्यांची नावे चर्चेत आली. २८ तारखेला हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ घोषित केला होता. त्यामुळे सोपा आणि अधिक सुरक्षित असलेला, गोरगावपासून सुमारे ८५ किलोमीटर  वर आसलेला, कर्जत–चौक फाट्याजवळील सोंडाई किल्ला निश्चित झाला. सकाळी साडेपाच सुमारास रवीने स्वतःच्या गाडीतून सर्वांना भ्रमंतीस  नेहण्याचे ठरवले. रविवारी सकाळी सोंडाईचा दिशेने मार्गस्थ झालो अशा प्रकारे आमच्या पावसाळी मोहिमेचा दुसरा अध्याय सुरू झाला.

    चौक फाट्यावरून चौक-कर्जत रोडवर येताच, एका हॉटेलमध्ये चहा-नाश्ता करून आम्ही पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. घरातून निघाल्यापासून पावसाची रिमझिम सुरू होती. गाडीतून मोबाईलद्वारे चित्रीकरण करत आम्ही कर्जतच्या दिशेने पुढे गेलो. गूगल मॅपमुळे आम्ही पुढे आलो आहोत हे लक्षात येताच, आम्ही गाडी वळवून सोंडाई गावाच्या दिशेने निघालो. रस्त्यातील बंगले संपल्यावर गावातील पाडे दिसू लागले. थोड्याच वेळाने डावीकडे मोरबे धरणाचे सुंदर दृश्य लक्ष वेधून घेऊ लागले. रिमझिम पाऊस, रस्त्याच्या बाजूला असलेली शेती आणि रानफुले यामुळे प्रवास अत्यंत आनंददायी होत होता. ​निसर्गाचा आनंद लुटत आम्ही सोंडाई गावात पोहोचलो. 



    गड वाटेच्या सुरुवातीला एक टपरी आहे; तेथील मालक गाडी पार्किंगचे पैसे घेतात. टपरीच्या बाजूला एक छोटासा ओढा वाहतो. तो ओढा ओलांडून सोंडाई गडाच्या दिशेने जाणारी वाट आहे.​आम्ही टपरीसमोर गाडी लावली आणि ओढा ओलांडून गडाच्या दिशेने निघालो. पाच मिनिटे चालल्यावर समोर एक आडवी वाट दिसली. ही वाट वावर्ले गावातून येणारी आहे. या दोन्ही वाटा एकत्र होऊन डाव्या बाजूला गडाच्या दिशेने जातात. आडव्या वाटेवर येताच गड माथ्याचे दर्शन झाले या वाटेवरून काही मिनिटांतच आम्ही एका पठारावर पोहोचलो. तिथे एक टपरी आणि टेहळणीसाठी लोखंडी उंच मनोरा बांधलेला आहे. वावर्ले गावातून आलेल्या वाटेवरून लहान मुलांना घेऊन गावातील वाटाड्यासोबत तीन-चार कुटुंबे आली होती. शांत वातावरणात मुलांचा किलबिलाट सुरू झाला. मुलानंमध्ये गडभ्रमंतीचा उत्साह आणि आनंद स्पष्ट दिसत होता.


    पठारावरून गडाच्या दिशेने चांगली मळलेली वाट जाते. त्या वाटेच्या सुरुवातीला झेंडा आणि एक घंटा लावलेली आहे. घंटा लावलेल्या वाटेवर आल्यावर आपण योग्य दिशेने आहोत हे समजते. पुढील वाट कातळ कड्यावरून जाणारी आहे. वाटेवर जागोजागी गावकऱ्यांनी नाश्त्याच्या टपऱ्या लावल्या आहेत. ​गडावर जाणारी वाट चढायला सोपी आहे, पण पावसाळ्यात ती मध्यम श्रेणीत मोडते; कारण कातळ कड्यावर असलेल्या शेवाळामुळे वाट निसरडी होते. पावसाळ्यात योग्य बूट घालूनच या किल्ल्याला भेट द्यावी. आम्ही पठारावरून किल्ल्याच्या दिशेने चढत गेलो, तसा पावसाने जोर धरला होता. संपूर्ण परिसरात धुक्याची चादर पसरली होती. मोबाईलने फोटो काढणे खूपच जिकिरीचे झाले होते, तरीही आम्ही वाटेत जमेल तसे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो. ​वाट नीसरडी असल्यामुळे लहान मुले घसरत होती. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही अवघड पॅचवर थांबलो. विलासला कामावर जायचे असल्याने आम्ही पुढे किल्ल्याच्या दिशेने गेलो आणि संतोष त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत थांबला, पायथ्यापासून गडमाथ्याच्या दिशेने अर्धा-पाऊण तास चालल्यावर डाव्या बाजूला एक पाण्याचे टाके दिसते, तर उजव्या बाजूला गडावर जाण्यासाठी एक शिडी आहे. 



    पाण्याचे टाके पाहून झाल्यावर शिडीचढून गडमाथ्याच्या दिशेने जावे. पहिली शिडी चढल्यावर उजव्या बाजूला दोन मोठी पाण्याचे टाके आहेत; एक उघडे आहे, तर दुसरे गुहेमध्ये असून त्याला ग्रील लावून बंदिस्त केले आहे. टाक्यांजवळून दुसरी शिडी सुरू होते. तिने आपण गडमाथ्याच्या पायथ्याशी पोहोचतो. तिथे ग्रामस्थांनी फलक लावला असून ‘पदत्राणे काढावीत ’ असे लिहिलेले आहे.​येथून अंदाजे तीन-चार मीटरचा चढ चढून आम्ही गड माथा गाठला. गडमाथा छोटा असून, झाडाखाली उघड्यावर सोंडाई देवीची मूर्ती आहे. बाजूला अन्य चार देवतांच्या झिजलेल्या आणि तांदळा मूर्ती दिसतात. गडमाथा पूर्णतः धुक्याने वेढला होता आणि वारा व पावसाचा मारा चालू होता.​आम्ही देवीचे दर्शन घेईपर्यंत संतोष लहान मुलांच्या ग्रुपला सुखरूप गडमाथ्यावर घेऊन आला होता.


    गडमाथा पाहता, याचा उपयोग फक्त टेहळणीसाठी केला जात असावा असे दिसते. बोरघाटातून पनवेल-कल्याण-सुपारक बंदराच्या दिशेने होणारा व्यापार आणि लष्करी हालचालींवर नजर ठेवण्यात याचा उपयोग होत असावा. तसेच, गडावर सोंडाई देवीचे स्थान असल्यामुळे गडाभोवती राहणाऱ्या लोकांसाठी हे एक श्रद्धेचे स्थान आहे. गडमाथा पाहून आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. गडाच्या पायथ्याकडील टपरीवर चहा आणि भजी खाण्यास थांबलो. एका गावातील जोडप्याने ही टपरी चालवली होती. त्यांची भजी आणि ठेचा उत्तम होता. भजी कुरकुरीत आणि चविष्ट होती; विशेष म्हणजे ती जराही तेलकट नव्हती. ठेचा तिखट असला तरी तेवढाच चवदार होता. सुरुवातीला एकच प्लेट घेणार होतो, पण आम्ही तीन प्लेट भजी संपवली. भजीवर ताव मारून आम्ही पुन्हा सोंडाई गावाच्या दिशेने चालू लागलो. 



वाटेतील ओढ्यात मस्ती करत आम्ही गाडी पार्क केलेल्या टपरीजवळ पोहोचलो. इथूनच पुढे दहा मिनिटांच्या अंतरावर एक जुळा धबधबा प्रसिद्ध आहे. “पुन्हा पार्किंगला शंभर रुपये देण्यापेक्षा गाडी इथेच लावा आणि धबधबा बघून या,” असे टपरी मालकाने सांगितल्यामुळे आम्ही चालत धबधब्याच्या दिशेने गेलो. 'दहा मिनिटांत धबधबा येईल का?' याची आम्हाला सुरुवातीला खात्री वाटत नव्हती, कारण गावकऱ्यांची दहा मिनिटे कधीकधी अर्धा तास पण असू शकतात. पण खरंच दहा मिनिटांनंतर एक अत्यंत सुखवणारे दृश्य दिसले. कड्यावरून वाहणाऱ्या धबधब्याचे दर्शन होताच मनमोहून गेले आणि त्याखाली भिजण्याची आमची इच्छा आणखीनच तीव्र झाली. आम्ही धबधब्याखाली भिजायला गेलो. संपूर्ण भटकंतीत वाऱ्यासह रिमझिम पाऊस आणि त्यातून जलप्रपातात भिजण्याचा मनसोक्त आनंद मिळाल्याने आमची भटकंती आणखी समृद्ध झाली. एक वाजत आल्या मुळे जास्त वेळ येथे घालवता येणार नव्हता. विलासला साडेतीनपर्यंत ड्युटी जॉईन करायची होती. त्यामुळे आम्ही मनाला आवर घालून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

    परतीच्या प्रवासची मोरबे धरणाच्या सोबतिने भटकंतीची झालेली सांगता आणखी सुखदायक होत होती. ओथंबून वाहणारे निळेशार मोरबे धरण आणि पलीकडे धुक्यात हरवलेली हिरवीगार माथेरानची डोंगररांग हे निसर्गचित्र डोळ्यांचे पारणे फेडत होते. परतीचा प्रवासही सुखाचा होता; कुठेही ट्रॅफिक नसल्याने नियोजित वेळी आम्ही मुंबईत दाखल झालो. छोटी भटकंती, पण अविस्मरणीय. पावसाची साथ, धरणाची शांत निळाई, धबधब्यातले भिजणे, गरमागरम भजी-चहा… सगळे परफेक्ट!

    मुंबईकरांना असा सुखाचा परतीचा प्रवास क्वचितच मिळतो. सोंडाई छोटी, पण हृदयात कायमची कोरलेली



Comments

Popular posts from this blog

मुंबईतील दुर्लक्षित आदिवासी आणि त्यांची समृद्ध वारली चित्रकला परंपरा

देवदार गुहा आणि मंदाकिनी डोंगर | Devdar Caves and Mandakini Hill | भ्रमर

सहकुटुंब भटकंती आनंददायी करणारा छोटेखाणी भिवगड | भ्रमर