LATEST BLOGS

कोकणातील दुर्लक्षित रानमेवा – #चाराबोरा - #चारा (#चारोळी)

#कोकणातील दुर्लक्षित रानमेवा – #चाराबोरा  - #चारा (#चारोळी)https://www.instagram.com/reel/DI0eMlQsjYO/?igsh=aWp1bWdudm42dWR6
कोकणातील दुर्लक्षित रानमेवा – चाराबोरा  - चारा (चारोळी)
हापूस आंबा आणि काजू ही कोकणातील सर्वश्रुत फळं, त्यांच्या प्रसिद्धीच्या झगमगाटात हरवलेला एक मौल्यवान रानमेवा म्हणजे चाराबोरा – ज्याला आपण चारोळी म्हणून ओळखतो. आंबा-काजूपेक्षा अधिक महाग असलेल्या या अस्सल रानमेव्याकडे व्यावसायिक लागवडीच्या दृष्टीने अद्यापही फारसं लक्ष दिलं गेलेलं नाही. एप्रिल २०२५ मध्ये चारोळीचा सर्वसाधारण बाजारभाव प्रति किलो ₹२३०० इतका आहे – यावरूनच या फळाच्या आर्थिक मूल्यातील ताकद स्पष्ट होते.

चारोळीचं शास्त्रीय नाव Buchanania lanzan (बुचणाणिया लॅन्झन) असून तिचं झाड मध्यम उंचीचं असतं. पानं लांबट आणि मोठ्या आकाराची असतात. उन्हाळ्याच्या अखेरीस या झाडाला फळधारणा होते. फळं लहान, गोलसर असतात. कच्चं फळ हिरव्या रंगाचं असून पिकल्यावर त्याचा रंग गडद तपकिरी किंवा काळसर होतो.

या फळांवर एक पातळ मावसर आवरण असतं. त्याची चव सौम्य मधुर व किंचित आंबटसर लागते – थोडक्यात, सुकलेल्या मनुकांसारखी. या आवरणाखाली एक टणक बी असते; ती फोडल्यावर आतून दिसणारा गर म्हणजेच आपल्याला सुक्या मेव्याच्या स्वरूपात मिळणारी चारोळी.
ही बी काढणं श्रमसाध्य असलं तरी तिचं पौष्टिक मूल्य अफाट आहे. प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेली चारोळी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते.
आंबा किंवा काजूच्या बागेमध्ये अंतरपीक म्हणून चारोळीची लागवड केल्यास बागायतदारांना दुहेरी आर्थिक फायदा होऊ शकतो. यामुळे उत्पन्नवाढ तर होईलच, पण स्थानिक जैवविविधतेचंही संरक्षण आणि संवर्धन साधता येईल.

फोटो स्थळ -:कसला, सिंधुदुर्ग जिल्हा 

Comments

Popular posts from this blog

देवदार गुहा आणि मंदाकिनी डोंगर | Devdar Caves and Mandakini Hill | भ्रमर

मुंबईतील दुर्लक्षित आदिवासी आणि त्यांची समृद्ध वारली चित्रकला परंपरा

कोस्टल राईड - मुरुड जंजिरा आणि चौल - भाग २