कल्याण दुर्गाडी ते शिवजन्मभुमी शिवनेरी सायकल रायडींग !
शिवजयंतीनिमित्त शनिवार दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी कल्याण येथिल किल्ले दुर्गाडी ते किल्ले शिवनेरी अशी १२० किलोमीटर अंतराच्या सायकल मोहिमेची आखणी केली होती
या मोहिमेची बिजे रोवली ती प्रत्येक रविवारी आमच्या आरे कॉलनी येथे होणाऱ्या मॉर्निंग राईडमध्ये !
या मोहिमेची आखणी करताना आमचा छोटा सायकल रायडर ऋग्वेद याला केंद्रस्थानी ठेऊनच हि मोहीम ठरवण्यात आली होती.
साधारण मध्यरात्री १२.3० वाजता कल्याण येथील किल्ले दुर्गाडीपासून सुरुवात करून शिवजन्मस्थान असलेल्या जुन्नर मधील शिवनेरी गडावर या मोहिमेची सांगता करण्याचा मानस होता. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण मोहीम ऋग्वेद नॉन गियर सायकल वरून पूर्ण करणार होता. सुरवातीपासून अगदी शिवनेरी गाठेपर्यंत संपूर्ण चढावाचा सामना करावा लागणार हा मार्ग नॉन गियर सायकलने पार करणं हे सर्वात कठीण आव्हान त्याच्यासमोर होतं. मोहिमेत त्याला शूभेच्छा देण्यासाठी त्याचा मित्र आर्यन बराटे हाही त्यांच्यासोबत सायकलिंग करणार होता. साथीला संदेश राणे, अरुण बराटे आणि ऋग्वेदाचे बाबा संतोष गावडे हे सपोर्ट टीमची जबाबदारी सांभाळणार अशी ढोबळमानाने आखणी आम्ही केली होती.
कोरोना काळात वर्ष-दिढ वर्ष आरेमध्ये आमची रविवारची सायकलिंग सुरू होती.वर्षभराच्या लॉकडाऊमध्ये याला नियमित व्यायामाचं स्वरूप येत गेलं त्यामुळे आरे मध्ये सायकलिंग करणे हा आमचा दिनक्रम झाला होता. माझा सायकल मित्र रवी आणि मी रवीवारी मात्र आरेच्या बाहेर पडून लॉंग रूट करत असू. आरेमधील या सायकलिंग ने मन आणि शरीर निरोगी राहाण्यास भरपूर मदत तर केलीच सोबत क्षमतेपलीकडे जाऊन काही नवीन करू पाहण्याची ऊर्मीही दिली. दरम्यानच्या काळात संतोषचं जॉगिंग, आणि त्यासोबत त्याचा नऊ वर्षाचा मुलगा ऋग्वेद याचं सायकलिंगही आरेमध्ये नियमित सुरु होतं. ऋग्वेद हा मागील कित्येक वर्षांपासून गोरेगाव जिमखान्यात मल्लखांब आणि योगाचा नियमित सराव करतो. या लॉकडाऊनमुळे त्याच्यासमोरही फिटनेस राखण्याचा प्रश्न उभा राहिला होता. आरेमध्ये रोज काही तास सायकलिंग सुरु करून त्याने आपलं फिटनेस टिकवण्यासाठी आपल्या परीने मार्ग काढला होता.
एकत्र दुर्ग भटकंती करणारे आम्ही डोंगरमित्र तेव्हा मात्र या व्यायामाच्या निमित्ताने आरेमध्येच भटेत होतो. मूळ राहायला कल्याणला असणारा अरुण त्याकाळात कामानिमित्त मुंबईतच मुक्कामी असायचा. त्यामुळे तोही एखाद्या रविवारी आम्हाला या मॉर्निंग वॉकला जॉईन्ड होत असे. अश्याच एका भेटीत सायकलिंग करताना संतोषने ऋग्वेदला घेऊन एखादी सायकलिंग मोहीम आखावी का असा विचार मांडला. आजूबाजूला असलेलया कोरोनाच्या डिप्रेसिंग वातावरणात अशी काही संधी मिळत असेल तर ती सोडणं मला तरी शक्य न्हवत. त्यामुळे संतोषची हि कल्पना आम्ही ताबडतोब उचलून धरली आणि त्यावर आमाचे काम सुरु झाले.
काही आठवड्यांवरचं शिवजयंती असल्याने तेच औचित्य साधून मुंबई ते शिवनेरी मोहिमेचा विचार पुढे आला. मोहिमेच्या तयारीसाठी साधारण दोन महिने मिळणार होते. आमच्या सरावा दरम्यान आम्हाला मुंबईच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे आणि ट्राफिक, यामुळे मोहीम पूर्ण करणं जिकीरीचं होऊ शकतं याची कल्पना आली. त्यामुळे मुंबईचं ट्रॅफिक पूर्णतः वगळून कल्याण ते शिवनेरी अशी मोहिमेची फेररचना केली.
मल्लखांबाचा खेळाडू असलेला ऋग्वेद नियमित सायकलिंग आणि योगाचाही सराव करत असल्यामुळे शरीराने आणि मनानेही या आव्हानात्मक मोहीमेसाठी तयार होता. फक्त गरज होती ती लांब पल्ल्याच्या घाटमाथ्यावरील सायकलिंग सरावाची. लांब पल्याचा सायकलिंगसाठी पायाच्या मसल्स प्रमाणेच शोल्डर मसल्स, कोर मसल्स, हिप मसल्सच्या एन्ड्युरन्स ( endurance ) आणि स्ट्रेंथ वाढवायची गरज असते.
ऋग्वेदला मोहिमेदरम्यान लांब पल्ल्याच्या प्रवासाची आणि रहदारीच्या रस्त्यांची सवय व्हावी म्हणून आम्ही तीस किलोमीटरची गोरेगाव ते जुहू, सत्तर किलोमीटरची गोरेगांव ते उत्तन, शंभर किलोमीटरची मुंबई कोस्टल, अशा टप्प्या-टप्प्याने वाढत्या अंतराच्या सायकल राईडस केल्या.
एखादया मोहिमेची डिफिकल्टी लेवल हे त्याचं अंतर किती आहे यामुळे ठरत नसून त्या मार्गातील वेगवेगळ्या आव्हनांवर ते अवलंबून असते. परंतु शंभर किलोमीटरची मुंबई कोस्टल सायकल राईड ऋग्वेदने ज्या सहजतेने पार पाडली त्याअर्थि १३५ किलोमीटर हे आव्हान त्याच्या टप्प्यात आहे याची आम्हला कल्पना आली होती.
या रूटमध्ये आम्हाला कल्याण ते माळशेज घाटा पर्यंतचा स्टडीली चढतं जाणारा चढ रात्रीच्या अंधारात पार करायचा होता. तो पल्ला गाठून माळशेज घाटाचे अंगावर येणारे चढ आणि तो संपतो नं संपतो तोच ताबडतोब सुरु होणारा वेळघाट ही पार करायचे होते. हे संपवून लगेचच सुरु होणार गणेश घाट दुपारच्या रणरणत्या उन्हात पार करून शिवनेरीची उभी चढण सायकलिंगने चढवायची अशी शारिरिक क्षमतेची कस पाहणारी अनेक आव्हाने या मार्गावर होती. कल्याण-नगर रस्त्यावरून रात्री प्रवास करताना समोरून येणारी वाहने आणि त्यांची थेट डोळ्यात येणारी हेडलाईट्स चुकवत साधारण ८० किलोमीटरचा प्रवास करणे हेही एक आव्हान होतं ज्याचा अनुभव ऋग्वेद पहिल्यांदाच घेणार होता.
त्यातचं लॉकडाऊनमुळे सायकलचे इमर्जनसी रिपेअर किट आणि इतर ऍक्सेसेरीज मिळणेही त्याकाळात दुरापास्त झाले होते. अनेक प्रयत्न करूनही जुन्नरमध्ये रात्रीच्या निवासाची न होऊ शकलेली व्यवस्था, गर्दी टाळण्यासाठी शिवनेरी परिसरात शासनाने लावलेले १४४ कलम इत्यादी आव्हानेही होतीच. शेवटच्या दिवसापर्यंत सरकारी नियम आणि वादळी पावसाच्या शक्यतेमुळे मोहिमेवरही अनिश्चितेचे सावट होते. अश्या अनेक समस्याचे डोंगर पार करून ही मोहीम आम्हाला पूर्ण करायची होती.
अरुण आणि संतोषने मोहिमेच्या आखणीची आणि आयोजनाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली होती. मला फक्त मोहिमे दरम्यान येणाऱ्या घाटमाथ्यांच्या आव्हांनांसाठी ऋग्वेदला तयार करायचे होते. सलग १२-१४ तासांची रायडींग, घाटांचा अंगावर येणारा चढ, गणेशघाटाच्या चढावात भाजून काढणारं रणरणतं ऊन हे सारं डोक्यात ठेवूनच प्रक्टीससाठी आरेतील घाट भर दुपारी सलग बारा-चौदा वेळा आम्ही चढवत होतो.
आम्ही सायकलिंग करणार असलो तरी अरुण व स्नेहल वाहिनी या मोहिमेचे खऱ्याअर्थाने बॅकबोन होते. अनिश्चिततेचे कितीही सावट असले तरी आपण मोहीम successful पूर्ण करायचीच असा त्याचा शेवटपर्यंत आग्रह होता. गाडीला लागणारे सायकल स्टॅन्ड, सायकल लाइट, जेवणाची व्यवस्था या सर्व आघाड्यांचे नियोजन त्यांनी केले होते.
या सायकल मोहिमेसाठी सपोर्ट टीममध्ये आमचा मित्र संदेश येण्यास तयार झाल्यामुळे बॅकपच्या सगळ्या आघाड्यांवर एक भक्कम आधार मिळाला होता . संतोष आणि अरुणवरचा बॅकअपचा शारीरिक आणि मानसीक ताण त्यांच्या येण्याने निश्चितच कमी होणार होता जी आमच्या मोहिमेसाठी जमेची बाजु ठरणार होती.
ठरल्या प्रमाणे 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी संध्याकाळी सायकल रायडिंग मोहिमेसाठी आम्ही अरुणच्या घरी कल्याणला दाखल झालो. आमच्या सायकली अरुण सोबत सकाळीच कल्याणमध्ये पोहोचल्या होत्या. रात्री साधारण साडेअकराच्या सुमारास अरुणच्या घरातून साडेचार किलोमीटरवर असलेल्या दुर्गाडी किल्ल्याला जाण्यासाठी आम्ही सायकलवर स्वार होऊन निघालो. संदेश आमची वाट पाहत तिथे आधीच पोहोचला होता.
मोहिमेचे केंद्रबिंदू होते नऊ वर्षाचा ऋग्वेद आणि बारा वर्षाचा आर्यन. ऋग्वेद आपल्या नॉन गियर सायकलने मोहीम पूर्ण करणार आणि आर्यन जमेल तशी सायकलिंग करून त्याला साथ देणार. मी शेवटपर्यंत सायकलिंग करत दोघांना लीड करणार आणि अरुण, संदेश आणि संतोष आम्हाला बॅकअप व्हेहिकल सपोर्ट देणार अशी सर्वसाधारण मोहिमेची आखणी होती.
कल्याणच्या खाडी किनारी लहानशा टेकडीवर दुर्गाडी किल्ला आहे. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे, पण त्याला लागुन असलेले बुरुज मात्र शाबूत आहेत. ह्या प्रवेशद्वाराचे नाव गणेश दरवाजा असून समोरच गणरायाची मूर्ती आहे. टेकडीच्या माथ्यावर वर दुर्गाडी देवीचे मंदिर आहे.
दिनांक २४ ऑक्टोबर १६५४ रोजी शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी ही ठाणी आदीलशहाकडून जिंकून घेतली. त्यानंतर कल्याणच्या भुईकोटाशेजारी खाडी किनारी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायला घेतला. किल्ल्याचा पाया खोदताना अमाप संपत्ती सापडली. ही सर्व दुर्गा देवीची कृपा म्हणून या किल्ल्याचे नाव दुर्गाडी असे ठेवले. किल्ल्याबरोबर शिवरायांनी आरमारी गोदी बांधून लढाऊ जहाजांची निर्मिती सुरु केली.
आमची मोहीम निर्विघ्न पार पडावी यासाठी मंदिराच्या बंद दाराबाहेरूनचं आम्ही दुर्गादेवीचे दर्शन घेतले. गणेश दरवाजासमोरील गणेशासमोर श्रीफळ वाढवून मोहीम यशस्वी होण्यासाठी गणरायाकडे साकडे घातले आणि दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आम्ही मोहिमेला सुरुवात केली.
शहरात बऱ्यापैकी स्ट्रीट लाईट असल्यामुळे सायकल चालवायला त्रास होत नव्हता. एव्हाना साडेबारा वाजून गेल्यामुळे कल्याण शहरातील रस्त्यावर गाड्यांची वाहतूकही कमी झाली होती. बेधुंद गाडी चालकांपासून सायकलींना संरक्षण मिळावे म्हणून अरुणने पुढे फोर व्हीलर ठेवली होती आणि सायकलींच्या मागे एक्टिवावर संतोष आणि संदेश होते.
कल्याण शहर मागे पडताच स्ट्रीट लाईटनेही साथ सोडली, आता मुख्य रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य होते. समोरून येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशझोतामुळे डोळे दिपून जात होते आणि आम्ही सायकलला लावलेल्या टॉर्चचा प्रकाश अपुरा पडत होता. पुढे असलेल्या फोर व्हीलरची बॅकलाईट आणि मागून सपोर्ट करणाऱ्या एक्टिवाची फ्रंट लाईट यामुळे सायकलींना बर्यापैकी प्रकाशाची व्यवस्था झाली होती. ज्यामुळे रस्त्यावर सायकल चालवणे सुसह्य झाले होते.
आमच्या दोन्ही छोट्या सायकलस्वरांची खेळीमेळीने रायडींग सुरु होती. रात्रीच्या सिच्युएशनला दोघांनीही बऱ्यापैकी जुळवून घेतले होते. मोहिमेचा हा पहिला टप्पा दुर्गाडी किल्ल्यापासून मुरबाड बस स्थानकापर्यंत होता. सुरुवातीच्या उत्साहाचा आणि सरळ रसत्याचा फायदा घेण्यासाठी आम्ही कल्याण ते मुरबाड पहिला विश्रांती थांबा बत्तीस किलोमीटर अंतरावर ठेवला होता. त्यापुढील सरळगाव, टोकावडे, नाणेघाट पायथा, माळशेज घाटाच्या पायथ्या खालील सरवणे गावापर्यंत साधारण पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतराने पांच-दहा मिनिटांच्या विश्रांती पडावाची आम्ही आखणी केली होती. घाटाच्या पायथ्याकडे लवकर पोहोचलो तरी आम्ही घाटातील सायकलींची सुरुवात सकाळी सातनंतरच करणार होतो. कारण घाट चढतना आम्हाला कुठल्याही प्रकारची जोखीम घ्यायची नव्हती.
ऋग्वेदची ही पहिलीच नाईट रायडिंग होती. सभोवती अंधाराचं साम्राज्य आणि न संपणारा हा लांबलचक रास्ता. हे कमी म्हणून कि काय समोरून येणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईटचा थेट डोळ्यात येणार प्रकाश. ऋग्वेद या सगळ्याला पहिल्यांदा सामोरा जात असल्याने थोडा त्रासिक झाला होता. त्यामुळे पावणेसहाला नाणेघाटाच्या पायथ्याशी पोहोचताच सूर्योदय होईपर्यंत तिथेच विश्रांती करण्याचा निर्णय आम्ही घेतला. नाणेघाटाच्या पायथ्याशी संदेशने आणलेला तंबू अंथरून त्याच्यावरच आम्ही आडवे झालो. दोन दिवस झालेले जागरण आणि गाड्यांच्या हेडलाईटमुळे डोळ्यांना बराच त्रास झाला होता. डोळे मिटून काही वेळ विश्रांती घेतल्यामुळे शरीराला काही प्रमाणात नक्कीच आराम मिळाला.
डोंगररांगांमध्ये सूर्यदर्शन उशिरा होते त्यात फेब्रुवारी महिना असल्यामुळे आम्हाला आराम करायला दीड तास मिळाला. साडेसात वाजता आम्ही पुन्हा आमच्या मोहिमेसाठी सज्ज झालो. काहीवेळ विश्रांती मिळाल्यामुळे रात्रीचा सर्व थकवा निघून गेला होता. नाणेघाटाच्या पायथ्या जवळून सह्याद्रीच्या रांगाच्या पूर्व बाजुस नानाच्या अंगठ्याचे दर्शन होत होते. आमची टीम सुर्योदयाबरोबरच मोहिमेसाठी सज्ज झाली होती.
सकाळचे आल्हाददायक वातावरण, डोंगररांग कवेतघेऊन जाणारा वळणावळणाचा रस्ता, दोन्ही बाजूने पानझडीचे वृक्ष असा एखाद्या युरोपियन निसर्गचित्रात शोभण्यासारखा सभोवतालचा नजारा होता. उजव्या बाजूला सह्यरांगांमधून दिसणारा नानाचा अंगठा आणि मोरोशीच्या भैरवगडासारखे आकाशाला भिडणारे रौद्र कातळ सुळके. तर समोर आव्हान देणारा माळशेज घाट आणि त्याचा सोबती हरिश्चंद्रगड.
भटक्यांची पंढरी असलेल्या आणि आपल्या अजस्त्र कोकणकड्यासह आकाशाच्या उंचीशी स्पर्धा करणाऱ्या हरिश्चंद्रगडाच्या परिसरात सायकलिंग करताना एक वेगळीच मजा येत होती. सकाळच्या झोपेने रिफ्रेश झालेला ऋग्वेदही आता राईड मस्त एन्जॉय करीत होता. "सरावने" गावानंतर माळशेज घाटाच्या वळणावळणाचे आंगावर येणारे तीव्रचढ सुरू झाले. घाटाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोइसाठी शासनाने घाटात विविध ठिकाणी पार्किंग आणि फोटोग्राफीसाठी पॉईंट बनवले आहेत. या प्रत्येक पॉइंटला भेट देउन घाटातील प्रवास आनंददायी करायचा हे आम्ही आधीच ठरवले होते. त्यामुळे शरीराला थोडी विश्रांतीही मिळणार होती आणि आमाच्या छोटया रायडरांचा प्रवासातील आनंद द्विगुणित होणार होता.
माळशेजघाटात सुसाट हवा सुटली होती सायकलस्वरासकट सायकलला ही हवा जोरकस पणे मागे ढकलत होती. त्यामुळे घाटामधील सायकलिंगला वेगळाच थ्रील येत होता. ऋग्वेद आपली नॉन गेअर सायकल घाटामध्ये लीलाया चालवत होता. आरे मधले छोटे घाट सलगपणे न थांबता चढवण्याच्या प्रॅक्टिसमुळे माळशेज घाटातली ही राइडिंग त्याला सोपी जात होती आणि घाटातील सौंदर्याचा आणि रायडींगचा पुरेपूर आनंद तो घेत होता. आमच्या आरे मधील प्रॅक्टिसचे एक प्रकारे चीज होताना दिसत होते.
आर्यनने घाटाच्या मध्यावर आपली सायकल पुन्हा चालवायला सुरुवात केली. त्याची प्रॅक्टिस पूर्ण झालेली नसल्यामुळे त्याला आम्ही टप्प्या-टप्प्याने सायकल चालवायला देत होतो. घाटातील प्रत्येक सौंदर्यस्थळाचा आस्वाद घेत आमची रायडिंग सुरु होती. माळशेज घाटातील प्रसिद्ध बोगद्याच्या पुढील, 'थंब पॉईंटवर' आमचा घाटातील शेवटचा थांबा होता. येथून हरिश्चंद्रगड आणि माळशेज घाट यामधील कोकणातील काळू नदीच्या खोऱ्यातील विहंगम दृश्य न्याहाळता येते. 'थंब पॉइंटवर' काहीवेळ एन्जॉय केल्यानंतर आम्ही माळशेज घाटातून पुढे निघालो. ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या खाडीच्या समुद्रसपाटीपासून सुरू झालेला सायकल प्रवास आता घाटमाथ्यावरील जुन्नर तालुक्यात सातशे ( ७०० ) मीटर म्हणजे दोन हजार दोनशे सत्त्याण्णव (२२९७) फुटावर येउन पोचला होता. आणि आमचा नव्वद किलोमीटरहून जास्त प्रवास झाला होता.
माळशेज घाट संपल्यानंतर 'खुबी' फाट्याजवळ आपल्याला हरिश्चंद्रगडावर उगम पावणाऱ्या पुष्पावती नदीवर बांधलेले जोगा धरण दृष्टिस पडते, तिथे आमचा जेवणाचा नियोजित थांबा होता. खुभी फाट्याजवळील खिरेश्वर गावातील धरणाच्या भंतीवरून 'टोलारखिंडी' मार्गे हरिश्चंद्रगडावर जाता येते. खुबीफाट्यापासून खिरेश्वर गावात दोन किलोमीटरवर पुरातन नागेश्वर शिवमंदिर आहे. शिलाहार वंशातील शिवभक्त झंज नावाचा राजाने पुष्पावती नदीच्या शेजारी बांधलेले हे शिवमंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
धरण क्षेत्रातून उत्तरेस हरिश्चंद्र गड आणि कारकाईच्या अजस्त्र कड्याची डोंगर रांग दिसते तर दक्षिणेस सिंदोळा सारख्या गडाचे दर्शन होते. थंडीत येथे फ्लेमिंगो सारखे अनेक स्थलांतरित पक्षी भेट देतात त्यामुळेच गडप्रेमी आणि पक्षीप्रेमींसाठी हे धरण आवडती जागा बनली आहे.
धरणा काठी आम्ही जेवणाचा आनंद घेतला आणि भरपूर फोटोग्राफी केली. जोग धरणा पुढील २४ किलोमीटरचां प्रवास नॉन स्टॉप करायचा असल्याने मी आणि ऋग्वेद दोघेच सायकलिंग करणार होतो. पुढचा प्रवास फक्त चोवीस किलोमीटरचा असला तरी कठीण श्रेणीतील होता. रखरखीत उन्हात वाटेतील दोन खिंडी पार करून शिवनेरीच्या पायथ्यापर्यंतची थेट उभी चढणं सायकलने गाठायची होती.
धरणाजवळून आम्ही कल्याण-नगर रोडवर येऊन सायकल चालवायला सुरुवात केली. खुबीफाटा सोडताच 'वेळ'खिंडीच्या घाटाच्या चढाईला सुरुवात झाली. खिंडीच्या माथ्यावर एक छोटे मंदिर आहे. 'वेळ'खिंड पार करून पठारावरील 'पारगाव मेढ त्रफ' गावत आपण पोहोचतो.
'मेढ त्रफ' गावात डोंगराला वळसा घालून जोग धरणाचे पाणी बॅकवॉटर स्वरूपात आलेले दिसते. बॅकवॉटवरचा पूल पार करून पुढे गेल्यावर लगेचच उजव्या बाजूने गणेश खिंडीकडे जाणारा रस्ता लागतो. शिवनेरीकडे जाण्यासाठी कल्याण-नगर रस्ता सोडून आम्ही गणेश खिंडीच्या कल्याण-जुन्नर रस्त्याकडे वळलो. एव्हाना डोक्यावर आलेल्या उन्हाने अंग भाजून निघत होतं.
गणेश खिंडीच्या रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे चारचाकी गाड्यांसाठी खिंड बंद होती. त्यामुळे अरुणने फोर व्हीलर घेऊन कल्याण-नगर रोडने २५ किलोमीटरचा घाटाला वळसा घेऊन शिवनेरीला जाण्याचा नर्णय घेतला. ॲक्टिव्हा आणि सायकल जाऊ शकत असल्यामुळे आम्ही आमाच्या नियोजित मार्गात बद्दल न कराता गणेश खिंडीतून जुन्नरला उतरण्याचा निर्णय घेतला.
एव्हाना शंभर किलोमीटरचा प्रवास करून भर उन्हात आम्ही गणेश खिंडीत पोहोचत होतो गणेश खिंडीची उभी चढाई त्रासदायक ठरणार याची जाणीव आम्हाला मोहिमेची आखणी करताना होतीच. त्यामानाने माळशेज घाटाची तेवढी चिंता नव्हती.
माळशेज घाटात आम्ही सकाळी रायडिंगला सुरुवात केल्यामुळे सकाळच्या आल्हाददायक वातावरणाचा फायदा झाला. तसेच रायडर्सही सकाळी फ्रेश होते आणि उन्हाच्या झळाही बसल्या नव्हत्या. राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहतूक सुलभ व्हावी यासाठी रस्ते रुंद केलेले असतात त्याची चढाईची तीव्रता शक्य तेवढी कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्रीय महामार्गावरील घाटांपेक्षा हे अंतर्गत मार्गांचे घाट लहान असले तरी तीव्र चढणीचे आणि सायकलिंगचा कस पाहणारे असतात.
गणेश घाटात सुरवातीलाच त्याचा प्रत्यय यायला लागला. गणेश खिंड घाटातील सरळ तीव्र उभी चढाई आणि त्यात सुर्य डोक्यावर असल्यामुळे उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली होती. सायकलचे पायंडल मारायला जड जात होते. या परिस्थितीतही ऋग्वेद आपली नॉन गिअर सायाकल संपूर्ण क्षमतेने नॉन स्टॉप चढवत होता. त्याला पाहून मला सायकलचे गिअर टाकायचा झालेला मोह मी टाळला व टाकलेले गिअर पुन्हा जागेवर आणले.
३बाय ९ गिअर कॉम्बिनेशन असलेली माझी सायकल मी पुढे दोन व मागे ५ किंवा ६ असे कॉम्बिनेशन ठेवून संपूर्ण मोहिमेत चालवत होतो. गिअर्समुळे मला ईझी सायकलिंग करताना बघून ऋग्वेदचे मनोधैर्य कमी व्हायला नको म्हणून संपूर्ण घाटात मी गियरची जवळ जवळ ४०% ही क्षमता वापरलीच नव्हती.
आता पर्यंत माळशेज घाटासह १०० किलोमीट पेक्षा जास्त प्रवास रायडिंग एन्जॉय करत झाला होता. गणेशखिंडीचा घाट मात्र भरदुपरी आमच्या क्षमतेची परीक्षा पाहात होता. गणेशखिंडीच्या घाट माथ्यावर गणेश मंदिर असून तिथे घाट संपून जुन्नरच्या दिशेने उताराला सुरावात होते. गणेश मंदिराकडून आमचे लक्ष फक्त तेरा किलोमीटर अंतरावर राहिले होते. गणेश खिंडीच्या उतारावर मात्र आमच्या समोर वेगळेच आव्हान उभे होते. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संपूर्ण उतारावर खडी टाकली होती. ह्या तीव्रउतारावरील सुट्या खडीवरुन सायकल चालवणे हे एक प्रकारे आव्हानच होते. एक चुकीचा ब्रेक किंवा जरा जरी बॉडीचा बॅलन्स बिघडला तरी सायकल आडवी व्हायला काही सेकंद पुरेसे होते. गणेश खिंड उत्तरताना ऑफ़ रोड डाउन हिल सायकलिंगचा थरारक अनुभव आम्ही घेत होतो. मला घाट उतरे पर्यंत मागाहून येणाऱ्या ऋग्वेदची काळजी लागून राहिली होती. पण तिथे सायकल उतरवताना या लाहान वयात त्याने दाखवलेले कसब त्याच्या माईंड आणि बॉडी कंट्रोलची झलक दाखवून गेले. त्याने दाखवली ती maturity एखाद्या प्रोफेशनल सायकलपटुच्या तोडीचीच होती.
गणेश खिंडन उतरून आम्ही संपन्न अशा कुकडी नदीच्या खोऱ्यात प्रवेश केला. जुन्नर तालुका लेणी, गडकोटांप्रमाणेच बागायती शेतीसाठीही प्रसिद्ध आहे. जीवधन नाणेघाटा जवळ उगम पावणाऱ्या कूकडी नदीने हा प्रदेश सुजलाम-सुफलाम केलेला आहे. आता रस्त्याच्या दुतर्फा शेतमळे आणि जागोजागी जुन्नर द्राक्षमहोत्सवाची फलक आम्हाला दिसत होते. गणेश खिंडीच्य माथ्यापासून दृष्टीस पडणारा शिवनेरीगड आणि गडाच्या पायथ्याशी असलेले जुन्नर शहर आता टप्प्यात दिसू लागले होते.
"जुन्नर" वैभव संपन्न भारतीय प्राचीन शहरा पैकी एक! 'जीर्णनगर’, ’जुन्नेर’ हि याची प्राचीन नावे. इसवीसन पूर्व २०० वर्षांपेक्षाही जुनं शहर. सुरवातीपासून सातवाहनांची व्यापारी राजधानी. या शहरातून अनेक घाटवाटांमार्गे कोकणातील बंदरातुन ग्रिक, रोमन, इजिप्त, आखाती देशात व्यापार होई.
अशा वैभवसंपन्न शहरावर परकीय शक राजा 'नाहापान' याने आक्रमण करून संपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात आणला. सातवाहन राजा गौतमी पुत्र 'सातकर्णी' याने परकीय शकराजा 'नाहापानाचा' संपूर्ण पराभव करून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. कोकणात उतरणाऱ्या घाटवाटांवर दुर्गांची आणि लेण्यांची निर्मिती केली. शिवनेरीगड त्या पैकीच एक. जुन्नरशहरातील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि सौंरक्षणासाठी त्याची निर्मिती केली गेली. आमच्या मोहिमे दरम्यान लागलली गणेशखिंड, वेळखिंड येथे असलेली विघ्नहर्त्या गणेशाची मंदीर त्यांच्या जुन्या कल्याण-जुन्नर व्यापारी मार्गाच्या अस्तित्त्वाच्या खुणा दर्शवितात.
आता रस्त्याच्या दुतर्फा असलेले शेतीचे मळे संपून आम्ही जुन्नर शहरात प्रवेश करून महाराजांच्या पुतळा असलेल्या जुन्नरच्या चौकात पोहचलो. छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूला गडाच्या दिशेने असलेल्या डांबरी रस्ताने आमची रायडिंग सुरु होती. चौका पासून पायऱ्यांपर्यंत एक किलोमीटरचा डांबरी रस्ता उभ्या तीव्र चढाईचा आहे. जसजसं आमचं लक्ष टप्प्यात येत होते तस तसे आमची शिवजन्मभूमीच्या भेटीची आस वाढतच होती. रस्त्यावरील उभ्या चढाई आणि वाढत्या आतुरते मुळे एक किलोमीटरचे लक्षही आता मोठे भासु लागले होते.
काही वेळात आम्ही पायर्यार्यांपाशी येऊन पोहोचलो. दुर्गाडीहून जवळ जवळ समुद्र सपाटीपासून सुरू केलेली सायकल मोहीम आता साव्वातीन हजार फुट उंचीवर शिवनेरी गडाच्या पायर्यार्यांपाशी पूर्ण झाली होती. या मोहिमेत सायकलवरून आम्ही जवळजवळ सव्वा तीन हजार फुट चढाई केली होती. सायकलिंगने येवढी उंची गाठताना ऋग्वेदने आपल्या नॉन गिअर्स सायकलवर स्वार होऊनच संपूर्ण प्रवास केला. संपूर्ण प्रवासात कुठेही हातात सायकल घेऊन प्रवास न करता जिथे थकला तिथे थांबून पुन्हा सायकल वर स्वार होऊनच त्याने ही सफर पूर्ण केली. त्याच्या या लहान वयातील जिद्दीला सलाम.
गडाच्या पायर्यार्यांपाशी अरुण आमची वाट पाहतच होता. पायथ्याशी थोडी विश्रांती घेऊन आणि लिंबू सरबत पिऊन आम्ही रिफ्रेश झालो. रात्रीची जागरण आणि हा लांब पल्ल्याचा प्रवास करूनही मुलांचा उत्साह कमी झाला नव्हता त्यांना गड पाहाण्याची ओढ लागली होती. मुलांनी पटापट पायऱ्या चढत गड चढाईला सुरुवात केली.
या पायऱ्याच्या वाटेने गडावर जाताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या वाटेला सात दरवाजाची वाट असेही म्हणतात.
ऋग्वेद आणि आर्यन मस्त मजा करत गड चढत होते त्यांच्या अंगामध्ये कुठलाही थकवा जाणवत नव्हता उलट मोहीम फत्ते झाल्याने ते आणखीनच एनर्जेटिक वाटत होते.
सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर चालत आम्ही पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केला आणि वाट सोडून उजव्या बाजूने पूढे ‘शिवाई देवीच्या’ मंदिराकडे गेलो.
मंदिराच्या मागे असणार्या कड्यात ६ ते ७ सातवाहन कालिन बुद्धिज गुंफा आहेत. मुख्य द्वारातून मंदिरात प्रवेश केल्यावर समोरचं शिवाई देवीची सुबक मूर्ती आहे. याच 'शिवाईदेवीच्या' नावावरून जिजाऊंनी महाराजांचं नाव' शिवाजी' ठेवले. महाराजांवर देवीने आयुष्यभर वेगवेगळ्या स्वरूपात कृपादृष्टी ठेवली. अफजलखानाचा वध असो की दुर्गाडी किल्ला बांधणीच्या वेळी प्राप्त झालेले धन असो, असे अनेक प्रसंग महराजांनच्या आयुष्यात येउन गेले. जिथे महाराजांना देवीचा आशीर्वाद मिळाला.
आम्ही एकाच मोहीमेत महाराजांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या दोन वेगवेगळ्या स्वरूपातिल देवींचे दर्शन घेतले. एक मोहीमेच्या आरंभी दुर्गाडी गडावर वसलेली 'दुर्गाडी देवी' आणि एक मोहिमेचा समारोप करताना शिवनेरी गडावरची 'शिवाई देवी'. देवीचा आशीर्वाद घेउन पुढे आम्ही गड पाहाण्यासाठी निघालो.
शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश करून समोरच असलेल्या अंबरखान्याकडे पोहचलो. आजमितिस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे.
अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात, एक वाट समोर असणार्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगाह आहे. आम्ही दुसऱ्या वाटेने शिवकुंजाच्या दिशेने निघालो, वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. शिवकुंज मध्ये बाळराजे शिवबा आणि मासाहेब जिजाऊचा पुतळा आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला, तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी पाण्याचे टाकं’ आहे. येथून पुढे जाणारा रस्ता दिड हजार फुट उंचीचा कडेलोट टोकावर घेऊन जातो.
शिवजन्मस्थानाच्या इमारतीला भेट देण्यासाठी गेलो असता तिथे नगरचा सायाकल गृप शिवनेरीस भेट देण्यासाठी आला होता त्यांची भेट झाली. आमच्या राहण्याची काहीच व्यवस्था झाली नाही हे कळताच त्यांनी आम्हाला आपल्या सोबत राहण्याचा आग्रह केला. अजून एकदा प्रयत्न करून कुठे काही राहाण्याची व्यवस्था नाही झाली तर आम्हीही त्यांनी जॉइंट होण्याचे ठरवले होते.
सूर्य मावळतीला चाला होता आम्ही गड उतारण्यास सुरुवात केली. रात्रीच्या राहाण्याची व्यवस्थाही पाहायची असल्याने, इच्छा असूनही गडावर जास्तवेळ थांबणे जमणार नव्हते. आता आम्ही आमचा मोर्चा 'श्री क्षेत्र लेण्याद्री'च्या दिशेने वळवला.
शिवनेरीची पासून ओझर १४ किलोमीटर तर लेण्याद्री साडे आठ किलोमीटरवर अष्टविनायकाचे क्षेत्र आहेत. तेथे राहाण्याची सोय होते. ओझरचे भक्त निवास उत्तम दर्जाचे असल्याने आधीच फुल झाले आहे हे आम्हाला माहित होते त्यामुळे आम्ही लेण्याद्रीकडे जाण्याचा निर्णय घेतला. नगरचा गृप पण तेथेच राहाणार असल्यामुळे कुठे राहाण्याची सोय झाली नाही तर त्यांची मदत होणार होती.
लेण्याद्री जवळ येताच तिथे ही एक किलोमीटरच्या उभ्या चढाईची सुरुवात झाली. आज काही केल्या या उभ्या चढाया आमची पाठ सोडत नव्हत्या. लेण्याद्रीत पोहोचे पर्यंत जवळ जवळ 130 किलोमीटरची सायकल रायडींग झाली होती.
भक्त निवास मध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही नगराच्या गृपला जॉइंट झालो. त्यांनीही आम्हाला एखादी जुनी ओळख असल्या प्रमाणे सामाऊन घेउन चांगले सहकार्य केले. ऋग्वेद आणि आर्यनच्या छोट्या वयातील सायकल मोहीमेचे ही कौतुक केल.
सकाळी नास्ता करून आम्ही लेण्याद्रीच्या गिरीजात्मज गणेशाच्या दर्शनासाठी गेलो. जुन्नर जवळील एका कातळकड्यात कोरून काडलेल्या लेण्यामध्ये गिरीजात्मज गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. लेणींचे मूळ नाव "कपिचित बुद्ध लेणीं" असे होते. ‘कपिचित’ म्हणजेच माकडांचे आवडते ठिकाण. त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय! पाली भाषेत कपि म्हणजे वानर किंवा माकड. आताही येथे माकडांचा भरपुर प्रमाणत वावर असून हातातील वस्तू जपून ठेवाव्या लागातत एखादा कपि आपली वस्तू कधी लंपास करेल हे कळणार देखील नाही त्याचा प्रत्यय संतोषने लागेचच घेतला.
गिरीजात्मज गणेशाचं दर्शन घेऊन आम्ही ओझरच्या दिशेने निघालो. श्री क्षेत्र ओझर येथील अष्टविनायकातील सातवा गणपती 'विघ्नेश्वर' म्हणून ओळखला जातो. बाजीराव पेशव्याचें भाऊ नरवीर चिमाजी आप्पा यांनी या मंदिराचे बांधकाम केले असे म्हटले जाते. अष्टविनायकापैकी सर्वात सुखसोयींनी सुसज्ज असलेले हे मंदिर कुकडी नदीच्या काठावर वसलेले आहे. आमची मोहीम निर्विघ्न पार पाडल्याबद्दल विघ्नेश्वराचे दर्शन घेउन आम्ही कल्याणच्या दिशेने निघालो.
आई भवानीचा आशीर्वादाने आणि शिवछत्रपतींच्या प्रेरणेने आमची आजची ही मोहीम यशस्वी झाली होती. हा एक सांघीक विजय होता. मोहीम यशस्वी करण्यात आमाच्या गृपच्या प्रत्येक सदस्याचा मोलाचा वाटा होता. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडली होती.
खास कौतुक करावे लागेल ते ऋग्वेदाचे. या लहानग्या वयातही हि अशी डोंगराएवढी आव्हानं घेऊन ती पार करण्याचं या कोवळ्या वयाच्या मुलाने दाखवलेले धाडस खरंच अनुकरण्यासारखं आहे. योग्य व्यायाम, योग्य आहार, योग्य मार्गदर्शन, प्रबळ इच्छाशक्ति आणि सरावात सातत्य असेल तर ध्येय नक्कीच गाठता येतं !
आपल्या मुलांमधील पोटेन्शिअल वेळीच ओळखून मुलांची ऊर्जा योग्य दिशेने वळवणे ही पालकांची जबाबदारी असते. त्यासाठी आपल्या रोजच्या व्यस्त दिनक्रमातून थोडासा वेळ मुलांसाठी काढण्याची तयारी मात्र हवी. ही तयारी अरुणचे आणि संतोषचे कुटुंबीय दाखवतात याचे खरेच कौतुक वाटते.
विदेशातील मुलांचे साहसी खेळ बघून आपल्या येथे का नाही? असे प्रश्न अनेकवेळा आपल्यापैके अनेकांना पडतात. तेव्हा आपण स्वतःपालकांनी आपल्या मुलांना अशा खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याची गरज असते. ते जर आपण करू शकलो तर आपल्या मुलांसाठीही असाध्य असे काहीच नसेल.
0 Comments