प्रचतीगड


   
अठरा मे रोजी बुध्द पोर्णिमेच्या दिवशी शिवदुर्ग ट्रेकर्स पन्हाळाने आयोजित केलेली प्रचतीगड भटकंती आमच्यासाठी दुग्धशर्करा योग घेऊन आली . 

आमच्या बकेट लिस्ट मधील प्रचतगड त्यातही बौद्धपौर्णिमेच्या दिवशी त्या गडावर वास्तव्य करायला मिळणे आणि शंभुराजांच्या वास्तव्याचा साक्षीदार असलेल्या शृंगारपूरास भेट देणे एकप्रकारे आमच्यासाठी ही पर्वणीच होती .

अठरा मे ला प्रचतीगडावर जाण्यासाठी मुंबईवरुन संतोष, अरुण आणि मी सकाळी सात वाजता कोकण रेल्वेने संगमेश्वर रेल्वेस्थानकात पोहोलो आणि तेथून रिक्षाने संगमेश्वर बसस्थानकाजवळ दाखल झालो.

कोडोली पन्हाळ्यावरुन आंबा घाटा मार्गे येणारे आमचे सहकारी आम्हाला तिथेच आपल्या गाडीतून पिक-अप करणार होते. 
शिवदुर्ग ट्रेकर्सचे आधारस्थंभ असलेल्या भाईंचे नियोजन चोख असणार आणि आमची भटकंती निसंशय यादगीर होणार यांची आम्हाला पूर्ण खात्री होती. बस आता फक्त आम्हाला  संगमेश्वरला त्यांना जॉइंट व्हायचे होते.

संगमेश्वरजवळ येताना कर्णेश्वर मंदिर, तेथून पंधरा किलोमीटरवर असलेली तुरळ गावाची गरम पाण्याची कुंड त्या गावाजवळील भवानीगड, संगमेश्वर जवळुन बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेले प्रसिद्ध मार्लेश्वर मंदिर ह्या सर्वांची लिस्ट घेऊन आपण शृंगारपूर प्रचितगडाच्या भटकंतीसाठी येतो. 
आपल्याला माहित असते हे सर्व दीड दिवसाच्या भटकंतीत साध्य होणाऱ्यातल नाही. जमल्यास आल्या पावाली ह्या पैकी एकदोन ठिकाणाची भेट घडून आली तर भटकंतीचा अनुभव आणखीनच समृद्ध होईल हीच माफक अपेक्षा असते.
हीच अपेक्षा घेऊन शिवदुर्ग ट्रेकर्स बरोबर संगमेश्वर बसस्थानकाजवळून एकोणीस किलोमीटरवर असलेल्या प्रचितगडाच्या पायथ्याखालील शृंगारपूर गावाच्या दिशेने रवाना झालो.

मुंबई गोवा हायवे ने मुंबईच्या दिशेने जाताना शास्त्री नदीवरील पुलाच्या जरा आधी उजव्या बाजूला एक फाटा फुटतो, तोच रस्ता शास्त्री नदीच्या खोऱ्यातून शृंगारपूर गावात थेट जातो.
शृंगारपूर हे छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी महाराजांच्या आयुष्यातील मह्त्वाच्या घटनांचा साक्षीदार,  तसेच आपल्या युवराज्ञी यसु बाईंचे माहेर.

शृंगारपूर हे सुर्व्यांचे वर्षोनुवर्षे चालत असलेले वतन. जव्हारचे मुकणे, पालीचे दळवी, शिर्कांडातील शिर्के, जावाळीचे मोरे, वाडीचे सावंत भोसले जसे कोकण पट्यातील विविध प्रदेशात आदिलशाहीच्या वतीने कोकणातील स्वतःला राजा समजून वर्षानुवर्षे राज्य करत होते, तसेच सुर्वे ही आदिलशाहीच्या वतीने प्रभावळी सुभ्यात शृंगारपूर राजधानी करून आजूबाजूच्या छोट्या प्रदेशावर राज्य करत. 

छत्रपती शिवाजी महाराजांशी सुर्व्यांनी घेतलेले वैर, तसेच शत्रूशी केलेली हातमिळवणी ह्यामुळे जावळीच्या मोऱ्यांप्रमाणे सुर्व्यांनाही स्वराज्याच्या झंझावाच्या तडाख्याने आपले वतन सोडून परागंदा व्हावे लागले. त्याची कारणे "राजा शिवछत्रपती" पुस्तकामध्ये पुढीलप्रमाणे आढळतात.

पन्हाळगडाला जेव्हा वेढा दिला तेव्हा सिध्दी जोहरने पालीचा जैसिंगराव दळवी व शृंगारपूरचा सुर्यराव सुर्वे ह्यांच्या आधीच विशाळगड जिंकण्यासाठी विशाळगडाच्या पायथ्याशी चौक्या बसवल्या होत्या. 
महाराज जेव्हा पन्हाळगडचा वेढ्यातून घोडखिंडी मार्गे विशाळगडाच्या पायथ्याशी दाखल झाले. तेव्हा सुर्यराव आणि जैसिंगराव यांच्या सैनीकांनी त्यांची वाट अडवली, त्यांना हरवून महाराज विशाळगडी पोहोचले.

पुढे उंबरखिंडीत कारतालाब खानाचा पराभव करून महाराज कोकणात उतरले, तेव्हा इंग्रज आणि ज्या ज्या सरदारांनी पन्हाळगडच्या वेढ्यात सिध्दि जोहराला साथ दिली त्याचे हिशोब चुकते करण्यासाठी राजे स्वतः दक्षिणेस कोकणच्या दिशेने गेले. तर स्वराज्याचे सेनापती नेताजी पालकरांनी उत्तर कोकणातील कल्याण-भिवंडी बंदरांवर स्वारी केली. 

महाराज कोकणातील दाभोळपर्यंत मुलूख मारत येताच, पालीचे जयसिंगराव पळून शृंगारपूरी सुर्यराव सुर्व्यांच्या आश्रयाला गेले.
महाराज संगमेश्वरला आल्यावर शृंगारपूरी वकील पाठवून सुर्व्यांना स्वाराज्यात सामील होण्यास सांगितले. आम्ही आमचे काही सैन्य संगमेश्वरी ठेवले आहे त्यांची चांगली देखरेख ठेवावी. त्याप्रमाणे सुर्यराव तयार ही झाले.

सुर्यराव स्वराज्यात सामिल झाले हे कळताच विजापूरच्या बादशहास राग आला आणि त्यांने सुर्यरावास पत्र लिहिले. आमचा उघड शत्रु दाट जंगलातून दक्षिण कोकणात जात असताना अडवलेस का नाही. झाले ते झाले पुन्हा येताना त्याची कोंडी कर. 

बादशहाचा आदेश येताच सूर्यराव घाबरुन स्वराज्याच्या विरूध्द गेला. महाराजांनी संगमेश्वरला तानाजी मालुसरे आणि पिलाजी नीलकंठराव सरनाईक यांस सैन्य देऊन तेथील रस्ते दुरुस्ती करण्यास ठेवले होते. त्यांच्या सैन्यावर रात्री अचानक पणे सुर्यराव सुर्वेंनी आक्रमण केल. अचानक झालेल्या हल्याने पिलाजी पळू लागला तानाजीने त्याला एका दगडावर बांधले आणि सुर्यरावाच्या सैन्यावर तुटून पडून त्यांना पळून लावले.

महाराज परत येताच सर्व हकीगत त्यांना समजली, तरी सुध्दा महाराजांनी मोठ्या मनाने सुर्यरावास माफ करून स्वराज्यात सामील होण्याचा निरोप देण्यासाठी आपला वकील सुर्यरावांकडे पाठविला.
सुर्यरावांचे स्वराज्यास अनुकूलतेचे चिन्ह न दिसताच, शिवाजी महाराज २९ मे, १६६१ रोजी पंधरा हजार सैन्यानिशी शृंगारपूरमध्ये दाखल झाले. सुर्यराव आधीच घाबरून पळाला होता. महाराजांनी त्याच्या राजवाड्यात घुसून रागाने त्याची गादी लाथे ने उडून दिली.

सुर्व्यांचे कारभारी आणि दाभोळचे देशमुख पिलाजीराव शिर्के यांस स्वराज्याच्या बाजूने वाळवून त्यांच्या जिजाऊबाई ऊर्फ राजसबाई या मुलीचे लग्न युवराज संभाजी महराजांशी लाऊन दिले, याश्या तरेने राजसबाई शृंगारपूरी लग्न होऊन स्वराज्याचा युवराज्ञी यसुबाई झाल्या. आणि त्याच बरोबर महाराजांनी आपली मुलगी राजकुवर बाईच लग्न पिलाजीराव शिर्क्यांचा मुलगा गणोजी शिर्क्यांशी लाऊन दिले.

महाराजांनी प्राभावळी सुर्व्यांकडून जिंकल्यावर त्रिंबक भास्करची सुभेदारपदी नेमणूक केली. पुढे पिलाजी नीळकंठराव देशमुख त्यांच्या नंतर बल्लाळ अत्रे सुभेदार होते.

शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेस जाताना रायगडावरील कारभारी आणि संभाजी महाराज यांतील वाद विकोपाला जाऊ नये म्हणून संभाजी महराजांना प्रभावळीची सुभेदारी देउन शृंगारपुरी पाठवले. संभाजी महराजांनचा शृंगारपूरी मुक्काम ऑक्टोबर १६७६ ते पावसामुळे अखेर १६७८ पर्यंत असावा असे मानला जातो. बुधभूषणम् हा संस्कृत तर नायिकाभेद, नखशिख आणि सातसतक हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ त्यांनी याच कालावधीत लिहिले असा समज आहे. त्यावेळी त्यांना कवी कलश यांची चांगली साथ लाभली. संभाजी महराजांनी स्वतःचा कलशाभिषेक याच ठिकाणी करून घेतला होता. शृंगारपूर परिसरात दुष्काळ पडल्यामुळे, रयतेकडून एक वर्ष करवसुली न करण्याचा संभाजीराजेंनी निर्णय घेतला. पण अष्टप्रधानांनी संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास नकार दिला होता, त्यामुळे अष्टप्रधानमंडळ व संभाजी महाराजांमध्ये आणखी दुरावा निर्माण झाला.

निश्चलपुरी गोसाव्याने पहिल्या राज्याभिषेकातील त्रुटी सांगून त्याचे दुष्परिणाम होतील हे पटवले. परिणामी शिवछत्रपतींनी शाक्तपध्दती नुसार तांत्रिक पद्धतीचा दुसरा राज्याभिषेक करवून घेतला. 
इथेच तंत्र आणि शक्तीच्या उपासनेची बीजे रोवली गेली. आणि या बदलत्या धार्मिक वातावरणाचा मुळात संस्कृत प्रवीण असणाऱ्या शंभूराजांच्या अध्यात्मिक बैठकीवर मोठा परिणाम झाला. त्यांचे परम मित्र कविकलश हे पहिल्या पासून शाक्त पंथाचे उपासक होते. त्याकाळी शक्तीची / कालीची / तंत्राची पूजा करणारे उपासक बंगाल व बनारस प्रांती होते. या उपासनेतून जारण-मारण, वशीकरण आदी प्रकार चालत असत. महाराष्ट्रातील शिवयोगी नामक एका तांत्रिक मार्गाच्या उपासकाने या विद्येचा अभ्यास करून शृंगारपुर येथे आपला मठ स्थापन केला. त्यांना गणेश अनंत जांभेकर व केशव भट्ट हे शिष्य लाभले. हाच शिवयोगी शंभूराजांचा शाक्तपंथीय गुरु बनला. शृंगारपूर परिसरातील कराडे ब्राह्मण शाक्त उपासक होते. त्याकाळी शृंगारपूर महाराष्ट्रातील शाक्त पंथाचे मुख्य केन्द्र बनले होते.

"देसाई-सावंत" आणि "गणोजी शिर्के" यांचे खटले कवी कलशापुढं आले. कवी कलशांनी सावंतांच्या बाजूनं निकाल दिला आणि गणोजी शिर्केंना वाटले कवी कलश आपला  विरोधक आहे. रागाने गणोजी शिर्के सरळ कवी कलशांवर चालून गेले त्यामुळे कवी कलश पळून "खेळण्यावर" म्हणजे "विशाळगडावर" आले.
संभाजी महराजांना हे कळताच ते गणोजी शिर्क्यांवर चाल करुन गेले. गणोजी शिर्के घाबरून राजापुरी सिद्धिच्या आश्रयाला गेले. अशा तरेने शिर्क्यांनाही सुर्व्यां पाठोपाठ शृंगारपूरातून परागंदा व्हावे लागले. 
 
अश्या असंख्य एतिहासिक गोष्टींचा साक्षीदार असणारे शृंगारपूर आता एक दुर्लक्षित खेडे आहे. अशा इतिहासिक गावात पोहोचल्यावर मनात जे ह्या गावाचं चित्र उभं करुन आलो होतो तसे काही न दिसता ह्या इतिहास प्रसिद्ध गावाचं एक दुर्लक्षित खेड्यातील रूपांतर बघून फार निराशा झाली .
 

शृंगारपूर परिसरातून परागंदा होऊन विखुरलेल्या सुर्व्यांनी आता साडेतीनशे वर्षांनी शृंगारपूरात एकत्र येऊन त्यांची कुलस्वामिनी असलेली भैरी भवानीचे सुंदर मंदिर बांधले आहे.

आम्ही शृंगारपूरास सकाळी दाखल झालो. गावात सुर्व्यांनी बांधलेल्या भैरीभवनी मंदिराच्या वर्धापनदिनाची लगबग चालु होती. वाटाड्या सतीश यांनी दुपारी दोनची वेळ दिली असल्याने अप्पा गायकवाड यांच्या घरी आम्ही घरून आणलेल्या जेवणावर ताव मारुन हनुमान मंदिरामध्ये वामकुक्षी घेतली.

गावातील एका शेतात हनुमान मूर्ती मिळाली त्याचे गावतील लोकांनी हे सुंदर मंदिर बांधले आहे. श्री गणेशाची मूर्ती, ही अशीच गावात उत्खननात सापडलेली असून ती ह्या मंदिरात स्थापन केलेली आहे. आशा अनेक प्राचीन गोष्टींचा ठेवा गावात असण्याची शक्यता आहे, तसेच गावात नवीन बांधलेल्या भैरी भवानी मंदिराच्या बाजूला सुर्व्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. गावाच्या दोन बाजूला असलेल्या टेकड्यांवर बुरूज सदृश्य  वास्तू आहेत. मंदिरात आलेला गावातील हौशी तरुण शृंगारपूर गावाबद्दल भरभरून माहिती सांगत होता.
सतीश आल्यावर अडीच्या सुमारास गडाच्या वाटेने निघालो. मे महिना अर्धा उलटून गेला असल्याने उकाड्याने आपला  उच्चांक गाठला होता. बसल्या बसल्या अंगातून घामाच्या धाराच धारा वाहत होत्या, त्यात कोकणातील आद्रतेमुळे  शक्तीपात झाल्या सारखी शरीराची अवस्था होती. अशा परिस्थितीत प्रचतिगडा सारखा अवघड गड सर करायला निघालो तेही दुपारी पुढे काय वाढून ठेवले आहे, याची प्रचति आम्हाला होतीच. आता मागे फिरणे नाही. शिवरायांच्या  प्रेरणेने आणि भैरी भवानीच्या आशीर्वादाने गड सर करूनच उतरायचे असा आम्ही धारकर्यानि निश्चयच केला होता.

 उभ्या चढाईचा बेलाग दुर्गम प्रचीतीगड कुठल्याही मोसमात आपल्या शारिरीक क्षमतेची कस पाहणारा, सत्तर - ऐंशी अंश कोकणातील उभी चढण असलेल्या ह्या गडावर मे महिन्यात चढून जणू काही आम्ही आमच्या शारिरीक व मानसिक क्षमतेची प्रचिती घेत होतो. 

सुरुवातीच्या पाऊण तासाच्या चढाई नंतर गडाच्या जवळ जसेजसे जात होतो तशी चढण तीव्र होत होती आणि आमची  चालण्याची गती मंद होऊन दहा मिनीटाच्या चढाई नंतर दहा मिनिटे बसणे असा चालण्याचा शिकस्ता झाला होता. स्पोर्ट्स सायन्सच्या अनुसार पाच टक्के वॉटर लॉस तुमची २५ टक्के एनर्जी लॉस करते. इथे तर शरीरातून न थांबणाऱ्या घामाच्या धाराच धारा वाहात होत्या.

वाटेत आम्ही दोन कलिंगडं कापून खाल्ली, तरी एनर्जी लेवलचा पारा काही करून वरती जायला तयार नव्हता. एखादे दहा बारा हजार फुटाचे हिमशिखर चढतो आहे तसा आभास होत होता. एक एक पाऊल ही टाकणे आता जड जात होते.

 दुपारी अडीच्या रखरखीत उन्हातून गडाच्या दिशेने केलेली वाटचाल रात्री आठच्या सुमारास पोर्णिमेच्या शीतल चंद्रप्रकाशात गडमाथा गाठून समाप्ती झाली. साधारणता  गडमाथा सर करायला चार तास लागतात, कोकणातील मे  महिन्यातील गरमी आणि दमटपणामुळे आम्हाला सहा तास लागले होते. गड मथा सर केल्यानंतर गुहा सदृष्य टाक्यांच्या बाजूला सर्वांनी आडवे होऊन विश्रांती घेतली.

अर्ध्या तासानंतर लाकुड फाटा आणि पाण्याची व्यवस्था करुन आपापल्या परीने सगळे जण जेवणाच्या तयारीला लागले.  भाईंनी झणझणीत पावट्याची आमटी आणि भात केला. पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात सर्वांनी भाकरी सह आमटी आणि भातावर ताव मारला. जेवणाच्या कार्यक्रमा शिवाय पोर्णिमेच्या प्रकाशामुळे कुत्रिम प्रकाशाची गरज लागली नव्हती.
जेवण झाल्यावर पठारावरील उंबराच्या झाडाजवळ झोपायला गेलो. भन्नाट वारा सुटला होता दिवसभर कडक उनातून प्रवास केल्यामुळे आता अलाकदायक वाटत होते. जसजशी रात्र वाढत होती, वाऱ्याचा जोर ही तस तसा वाढत चालला होता. ज्यांनी ज्यांनी स्लीपिंग बॅग आणली होती, ते निवांत झोपी गेले होते. ज्यांनी स्लीपिंग बॅग आणली नव्हती त्यांची झोप मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने उडवली होती, त्यात मीही होतो. आंगावरची चादर उडून जाऊन वारा अंगाला चांगलाच झोंबत होता. आणि उंबराचे झाड मोठ मोठ्याने हेलकावे घेत होते.
  
या पूर्वी चार वेळा प्रचीतीगडचा अनुभव असलेल्या भाईंच्या मते आज हवा नेहमी पेक्षा कमीच होती. इकडे येताना त्याची तयारी करुनच याव लागते. येथे टेंट पण हवेमुळे उभे राहत नाही. चंद्र प्रकाशात गडावर थोडा फेर फटका मारून आम्ही निद्रा देवीच्या आधीन झालो.

सकाळी सर्वजण फ्रेश होऊन गडमाथ्यावर फेरफटका मारायला गेले. चहा आणि रात्रीची उरलेली आमटी व भाकरीचा सर्वांनी पोटभर नास्ता करून भैरी भवानी देवीच्या  दर्शनाला गेलो. मंदिराचा परिसर साफ करुन मनोभावे देवीचा आशीर्वाद घेऊन सव्वा आठच्या दरम्यान गड उतारा होण्यास सुर्वात केली. कालच्या अनुभवामुळे उन्हाच्या आधी गड उतार होणे क्रमप्राप्त होते. अडीच ते तीन तासाच्या प्रवासात वाटेतील करवंदांवर ताव मारत मारत आम्ही शृंगारपूरात दाखल झालो.

प्रचितगड कोणी केव्हा बांधला इतिहासात ह्याचा नोंदी सापडत नाही. येथिल गुहा सदृष खांब टाक्यावरुन हा गड सातवाहन किंवा शिलाहार काळादरम्यान बांधला असावा. कोकणात जेव्हा आदिलशाही प्रस्तापित झाली, तेव्हा सुर्व्यांच्या आधिपत्याखाली प्रचितगड होता. शृंगारपूर सुर्व्यांकडून १६६१ साली छत्रपती शिवाजी महराजांनी जिंकून स्वराज्यात सामील केले तेव्हा प्रचितगड स्वराज्यात दाखल झाला. 

सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सह्य रागेंच्या माथ्यावर ३२०५ फुटांवरील काथळ कड्यावर वसलेला हा गिरीदुर्ग कोकणातून घाटावर जाणाऱ्या रेडे घाटावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला असावा. प्रशासकीय दृष्टीने प्रचितीगड सांगली जिल्ह्यातून असला तरी चांदोली आणि कोयना अभयारण्यातील व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमुळे ट्रेकर्सना फक्त कोकणातील वाटेतून जाता येते. शृंगारपूरहू जाणाऱ्या वाटेचा बहुतेक सर्वजण उपयोग करतात. प्रचितीगडाच्या एका डोंगर धारेवरून नायरी गावातून ही वाट जाते, पण ती जास्त वेळ घेणारी आहे .
 
कोयना चांदोली सयुक्त व्याघ्र प्रकल्प होण्या अगोदर प्रचितगडाला जाण्यासाठी घाटावरुन पाथरपुंज, भैरवगड, चांदोली मार्गे वाटा होत्या. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमुळे ह्या वाटा सामान्य नागरीकांस बंद झाल्या. आता या वाटांचे एकमेव उरलेले जाणकार प्रचितीगड चे गाइड म्हणून काम करणारे "दीपक म्हस्के" हे आम्हाला शृंगारपूरमध्ये भेटले होते.
त्यांना वेळ नसल्यामुळे आमच्या बरोबर ते येऊ शकले नाहीत. त्यांच्या माहिती प्रमाणे शृंगारपूरहून सह्यरांग ओलांडून ते सहा तासात पाटणला जात. त्यांना भैरवगड तसेच चांदोलीतील  पाठरपुंज निवाळे कडच्या गावांची खडान खडा माहिती असुन  तेथील गावातील लोक त्यांना ओळखतात. तीकडचे लोकही  पूर्वी नायरी गावात बाजाराला येत असत. दोन्हीकडच्या लोकांची सरास येजा सुरु असे.

शृंगारपूर गावातून उत्तर दक्षिण पसरलेल्या प्रचितगडावर  गावातून वाहाणार्‍या ओढ्याच्या बाजूने जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याने गावातली वस्ती संपेपर्यंत चालत गेल्यावर पायवाट लागते. पायवाटेने अर्धातास दाट जंगलातून चालल्यानंतर एक ओढा आडवा येतो. येथे वाट चुकण्याची शक्यता असल्यामूळे पहिल्या वेळी गडावर जाणाऱ्यांनी कमीत कमी इथपर्यंत वाट्याड्या घ्यावाच. ओढा ओलांडून पलिकडे गेल्यावर गावाच्या आणि किल्ल्याच्या मधे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. डोंगराची दाट झाडीतली उभी चढण चढून आपण छोट्या पठारावर येतो. पठारावरुन चालल्यावर पुन्हा खडाचढ लागतो तो चढून गेल्यावर आपण सुकलेल्या धबधब्याजवळ पोहोचतो.

पुढच्या टप्प्यात ठिकठिकाणी ८ शिड्या बसवलेल्या आहेत. त्या शिड्या चढ-उतार करताना छोटे छोटे दगड निसटुन खाली येतात त्यामुळे सांभाळून चढावे लागते. शिड्यांचा टप्पा पार केल्यावर आपण गडाच्या बाजूच्या दक्षिण टोकाजवळ पोहोचतो. या दक्षिण टोकावरुनही गडावर जाता येते, पण ह्या वाटेने उभ्या कातळ कड्यावर प्रस्थारोहण करावे लागत असल्यामुळे प्रस्थारोहणातील निष्णात लोक त्या वाटेचा उपयोग करतात. दुसरी वाट येथून गडाच्या दक्षिण टोकाखालुन उत्तर टोकाकडील दरवाजा खालील शिडीपर्यंत आडवी चढत जाणारी वाट, याच वाटेचा उपयोग जास्त केला जातो. या वाटेवर तीव्र उतार असल्याने खूप जपून चढावे आणि उतरावे  लागते. 
ही घसार्‍याची वाट संपल्यावर आपण उत्तराभिमुख दरवाजा खालील शिडीपाशी पोहोचतो. येथे मोठ्या शिडीच्या पायऱ्या आणि लोखंडी कठडा तुटलेला आहे. त्यामुळे पायऱ्यावर पाय न ठेवता खालील बिंबवर जपून पाय ठेवत शिडी चढावी लागते. शिडी चढुन गेल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.


गडावरील दरवाजाखाली लावलेल्या शिडीवरुन चढल्यावर आपण उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशद्वाराने गडात प्रवेश करतो.  उजव्या बाजूला एक बुरूज असून गडाच्या डाव्या बाजूला पाण्याचे मोठे टाके आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाक्याच्या बाजुने गडाच्या दक्षिणेला जाणाऱ्या वाटेने वर चढत गेल्यावर पत्र्‍याच्या शेडमध्ये बांधलेल्या भैरी भवानीच्या देवळापाशी आपण येतो. रत्नागिरी पट्यातील बहुतेक कुळांची, भैरी भवानी कुलस्वामिनी असल्याने ह्या पट्यातील बहुतेक किल्यावर तिचे मंदिर आढळते. तसेच सुर्व्यांचीही कुलस्वामिनी असल्याने देवीच्या निमित्ताने प्रचितीगडावर आजूबाजूच्या   पंचक्रोशीतील लोकांचा वावर असतो.

 देवळात तीन मुर्त्या आहेत. त्याशिवाय देवळाच्या चौथऱ्या खालील झाडाखाली आणखी एक मूर्ती आहे. मंदिरातील पहिली मोठी मुर्ती भैरोबाची असावी, बाजूच्या दोन मुर्तीवर स्त्री शृंगार केला असल्याने त्या देवीच्या आहेत. मधली मूर्ती गडदेवता भैरी भवानीची आहे तर, दुसरी मूर्ती अन्य स्त्री देवतेची असावी. गडावरील इतरत्र विखुरलेल्या पाच तोफा मंदिराच्या परीसरात आणून ठेवल्या आहेत .  

मंदिर पाहून पुढे गेल्यावर कारवीच्या झाडीत लपलेले घरांचे चौथरे पाहायला मिळतात. या चौथऱ्या मधून जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर पायऱ्या लागतात. पायऱ्यांनी खाली उतरल्यावर उजव्या व डाव्या दोन्ही बाजूला कातळात खोदलेल्या गुहा सदृश्य खांब टाकं पाहायला मिळतात. या टाक्यात उत्तरायला पायऱ्या खोदल्या आहेत. टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे. उजव्या बाजूला आणखी दोन टाक्या आहेत तिसर मोठे असावे आता ते बुजले आहे.          
टाकं पाहून पुढे गेल्यावर दरीच्या बाजूला तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष पाहायला मिळातात. या भागात गडमाथा बऱ्यापैकी रुंद असून गडावरील एकमेव मोठे उंबराचे झाड येथे आहे. त्या उंबराच्या समोरील दक्षिण पठारावर एक प्रशस्त पाण्याचे टाकं असून, टाक्याच्या पुढे छप्पर नसलेल्या पुरातन दगडी वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.
वाड्याला वळसा घालून पुढे गेल्यावर चिंचोळ्या पठारावरून  गडाच्या वानर टेकडीजवळील दक्षिण टोकाजवळ पोचतो. गडाच्या ह्या चिंचोळ्या पठारावरून पूर्वेला सह्याद्रीच्या आकाशाचा ठाव घेणारी शिखरे आणि काळजाचा ठोका  चुकवणाऱ्या खोल दऱ्यांचे दर्शन घडते. सह्याद्रीच्या रौद्ररुपाचे खऱ्या अर्थाने दर्शन आपणस येथे घडून येते. पश्चिम बाजूस कोकणातील शृंगारपूर आणि शास्त्री नदीच्या खोऱ्याचे सौंदर्य मांडलेले दिसते. अशा तरेने गडमाथा दीड-दोन तासांत पाहून होतो.

शृंगारपुर गावात पोचल्यावर घामामुळे चिकचीकीत झालेल्या  अंगाला आंघोळीची गरज होती, पण शृंगारपूरामध्ये पिण्याच्या पाण्याचाच अभाव असल्याने आंघोळीसाठी पाणी मिळणे मुश्किलच होते.

 गावातील लोकांनी सांगितल्या प्रमाणे गावाबाहेर असलेल्या कोरड्या नदी पात्रातील एका पाण्याच्या डोहाकडे गेलो, तिथे मनसोक्त आंघोळ केली. तेथून आम्ही सुर्व्यांनी बांधलेल्या मंदिरात महाप्रसाद घेतला. कसबा संगमेश्वरला जाऊन संभाजी महराजांचं स्मारक आणि कर्णेश्वराच्या मंदिराला भेट द्यायची होती. गाडी लहान असल्याने आम्ही सर्वजण एका गाडीत बसणार नव्हतो म्हणून आम्हा तिघा मुंबईकरांना संगमेश्वरला पुढे पाठवले. आम्हाला संगमेश्वर एस्-टी स्टॅंडला सोडून कोल्हापूर कडील सहकाऱ्यांना नेण्यासाठी गाडी परत येणार होती, त्यामुळे कर्णेश्वरमंदिरला एकप्रकारे धावती भेट द्यावी लागणार होती. 
कर्णेश्वरमंदिर शृंगारपूर पासून चौदा तर संगमेश्वर बस डेपो पासून चार किलोमीटरवर असलेल्या कसबा संगमेश्वरमध्ये आहे. संगमेश्वर हे ऐतिहासिक गाव आहे.


संगमेश्वरचे प्राचीन नाव नावडी. नावडी ही व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध असून पूर्वीचा व्यापारउदीम नावडी बंदराद्वारे चालत असे. मात्र कालौघात नदीत गाळ साठत गेल्याने जहाज व्यवसाय बंद झाला. सध्या तर बंदर म्हणून असलेले संगमेश्वरचे अस्तित्वच नष्ट झाले आहे . 
संगमेश्वर खाडीपट्टा जहाज बांधणीच्या कारागिरांसाठी प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारातील पहिली नौका ‘संगमिरी’ची बांधणी संगमेश्वरमधूनच झाली होती. संगमेश्वरी म्हणून ओळखले जाणारे पहिले जहाज कालौघात संगमिरी संबोधले जाऊ लागल्याचा दाखला ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे देत असतात. 


कसबा-संगमेश्वर येथील सरदेसाईंच्या वाडयात छत्रपती संभाजी महाराज मुक्कामास थांबले होते. या सरदेसाई वाडयात अजरेजी यादव आणि गिजरेजी यादव यांच्या  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून चालू असलेल्या कराड व औंध येथील वतनाच्या भांडणाचा न्यायनिवाड्या करण्यासाठी थांबले होते.       

फंदफितुरीमुळे मुकर्रबखान या मोगल सरदाराचे मुघल सैन्य तिथपर्यंत पोहोचले. त्यांनी वाडयाला वेढा घातला. संभाजी राजे व त्यांच्या मावळ्यानी बराच काळ मुघल सैन्याशी सामना केला.

काही चकमकीही घडल्या. मुकर्रब खानचा मुलगा इखलास खानशी झालेल्या चकमकीत ३ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती संभाजी राजे आणि कवी कलश लढता लढता पकडले गेले.  त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी पन्हाळा येथून सरनोबत म्हाळोजी घोरपडे धावून गेले. मात्र दुर्दैवाने त्यांना लढाईत वीरमरण प्राप्त झाले. म्हळोजीराजे घोरपडे हे इतिहास प्रसिद्ध मराठा सेनानी संताजी घोरपडेंचे वडील. म्हाळोजिंची समाधी कसबा संगमेश्वर पासून दहा तर शृंगारपूर पासून साडेपाच किलोमीटर वरील  कारभाटले गावी आहे.

छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर मुघल सैन्याने त्या वाडयाला आग लावली. त्या वाडयाचा मागील भाग जळून गेला. पुढील भाग शाबूत आहे. त्या भागात आज सरदेसाईंचे वंशज राहतात. वाडयाच्या मागील बाजूस मोडतोड असलेली अर्धवट पडक्या स्थितीतील तीन शिवमंदिरे भग्नावस्थेत आहेत. वाड्याजवळ संभाजीमहाराजांनचे स्मारक आहे. आम्ही गेलो तेव्हा त्या स्मारकाची पुनर्बांधणी सुरू होती. 

आमच्या ड्रायव्हरला आम्हाला सोडून कोल्हापूरच्या साथीदारांना शृंगारपूर मधून पिक-अप करून कोल्हापूरला घेऊन जायचे होते. त्यामुळे तो परिसर व्यवस्थित न्याहाळता आला नाही.

संभाजी महाराज स्मारका जवळून एक रस्ता गावात जातो त्या रस्त्याने थोडावेळ चालत गेल्यावर उजव्या बाजूला सुंदर दगडी बांधकामचे पुरातन मंदिर दिसते हेच ते चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर.

गुजरातचा चालुक्य राजा कर्ण त्या ठिकाणी इसवी सन १०६४ च्या सुमारास राज्य करत होता. तो कदंब राजांचा जावई होता. त्याने त्या काळात दहा हजार सुवर्णमुद्रा खर्च करून तेथे शिवमंदिर बांधले. ते त्याच्या नावाने 'कर्णेश्वर शिवमंदिर' म्हणून ओळखले जाऊ लागले. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या या मंदिराची रचना भूमीज शैलीतील आहे. सुमारे चारशे चौरस मीटर क्षेत्रात काळ्या पाषाणात कोरीव काम केलेले असे हे मंदिर कसब्याचे प्राचीन महत्त्व दर्शवते.

कर्णराजाने कर्णेश्वराच्या पूजाअर्चेच्या वेगवेगळ्या कामांसाठी सात गावे दिली होती. कर्णराजाने कर्णेश्वर मंदिराच्या निमित्ताने त्यावेळी तीनशे साठ प्रासाद म्हणजे मंदिरे बांधली होती. 

कर्णेश्वर मंदिरात आतील बाजूच्या दगडात देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आढळतात. मंदिरावर जे चार कळस आहेत ते खालच्या बाजूने झुंबरासारखे कोरण्यात आले आहेत. 


हे पूर्वाभिमुख मंदिर २६ मीटर लांब व २३ मीटर रुंद आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर प्रचंड मोठा सभामंडप व त्यापुढील गाभारा असून त्यात श्री कर्णेश्वराची पिंड व पार्वतीची मूर्ती आहे. हे संपूर्ण मंदिर दीड मीटर उंचीच्या चौथऱ्यावर उभारलं आहे. मंदिराला सोळा कोन व पाच घुमटांचे शिखर असून पाचव्या घुमटाचं टोक तळापासून २५ मीटर उंचीवर आहे. या पाच घुमटांशिवाय इतरही ३३ छोटे घुमट इथे आहेत 
महाद्वार, मुख्य मंडप, नंदीमंडप आणि भिंतींवर कोरलेल्या अष्टभैरव, द्वारपाल, शंकर, देव-दानव, यक्ष, किन्नर, नृत्यांगना यांच्या प्राचीन प्रतिमा बरोबर विविध देवतांच्या मूर्त्यां  कोरलेल्या आहेत आणि शक्यतो राजस्थान शिवाय कुठेही न सापडणारी ब्रम्हदेवाची मूर्ती सभामंडपात आपल्याला पाहावयास मिळते, हेच इथले वैशिष्ट्य म्हणावे लागेल
काळ्या पाषाणात कोरलेल्या प्रमाणबध्द मुर्त्या व नाजूक नक्षी कामाची कलाकुसर गतकालीन शिल्पवैभव पाहुन आपण मंत्रमुग्ध होऊन जातो.

कर्णेश्वर मंदिर, जेथे अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांचा संगम होतो तिथे आहे. नदीचा पुल ओलांडून संगम पात्रात पलीकडे गेल्यावर संगमेश्वरराचे छोटे देखणे शिवमंदिर  दृष्टीस पडते. हे मंदिर कर्णेश्वर मंदिराच्या निर्मिती वेळी बांधले असून मंदिराची निर्मिती भूमीज शैलीतील आहे. हे मंदिर संगम पात्राच्या तटाला खेटुन बांधले असल्याने ह्याचा उपयोग धार्मिक कर्मकांडासाठी त्या काळी होत असावा असा माझा कयास आहे. आता सरकारी प्रयत्नाने नदीतील गाळ उपसून नदीला गत वैभव प्राप्त करून देण्याचे काम सुरू होते. जेणे करून हे प्राचीन बंदर पुनर्जीवित होईल. 

संगमेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही जडपावली मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालो.

Post a Comment

0 Comments