“कनकेश्वर : निसर्ग–भक्ती–स्थापत्याचा संगम”

“कनकेश्वर : निसर्ग–भक्ती–स्थापत्याचा संगम”

डिसेंबरची २१ तारीक, रविवार.
मुंबई गोरेगावमध्ये सकाळी पाच वाजता हवेत हलकासा गारवा जाणवत होता. अशा प्रसन्न वातावरणात भाऊच्या धक्क्याच्या दिशेने लतेश आणि मी आमच्या ॲक्टिवावरून निघालो.
प्लॅन साधाच होता—भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जायचं, तिथून सकाळी ८ च्या सुमारास समुद्राची ओहोटी साधून अलिबागचा किल्ला पाहायचा, नंतर कनकेश्वर मंदिर आणि करमरकर स्टॅच्यू म्युझियम बघायचं, आणि शेवटच्या फेरीबोटीने पुन्हा मुंबई गाठायची.
सकाळी पाच चाळीसला आम्ही भाऊच्या धक्क्याजवळ पोहोचलो. परिसरात मासे विक्रेत्यांची लगबग सुरू झाली होती. त्यातून वाट काढत आम्ही रेवसला जाणाऱ्या जेट्टीवरील तिकीट काउंटरपर्यंत पोहोचलो. तिथे चौकशी केली असता कळले की रेवसला जाणारी पहिली फेरी सकाळी ६.३० वाजता असते. आजूबाजूच्या सहप्रवाशांकडे अधिक चौकशी केली असता असेही समजले की वेळ ६.३० असली, तरी प्रत्यक्षात बोट निघायला पावणे सात वाजतात.
हवामानानुसार बोटींचे वेळापत्रक आणि परतीची शेवटची फेरी बदलत असते. बोटीचे तिकीट १०० रुपये असून ते आधी काउंटरवर घ्यावे लागते. त्यानंतर पोलिसांकडून दुचाकीचे कागद तपासले जातात आणि बोट लागल्यानंतर दुचाकी बोटीत चढवली जाते. दुचाकी चढवण्या–उतरवण्याचे २०० रुपये बोटीतील कर्मचाऱ्यांना द्यावे लागतात.
आमचे संपूर्ण भटकंतीचे नियोजन ‘मुंबई इंडिकेटर’ ॲपवर मिळालेल्या  माहितीनुसार केले होते  .  पहिली फेरीबोट —सहा वाजता निघेल, साडेसातला रेवस जेट्टीला पोहोचू, सकाळी ट्रॅफिक नसल्याने आठपर्यंत अलिबागला गाठू, आणि सकाळी आठला येणाऱ्या ओहोटीच्या वेळेत किल्ला पाहून होईल.
पण आता समोर आलेल्या वास्तवामुळे आमच्या नियोजनाला सुरुवातीलाच सुरुंग लागला होता. कारण अलिबागचा कुलाबा किल्ला पाहणे हा पूर्णपणे ओहोटी–भरतीच्या वेळेवर अवलंबून असतो.नियोजन फसल्यानंतर थोडं मन शांत करण्यासाठी मी जेट्टीवर इकडे-तिकडे फेरफटका मारत होतो. डोक्यात सतत विचारचक्र सुरू होतं—पुढचा प्लॅन काय करायचा? शेवटी “आधी कनकेश्वर मंदिर करून घेऊ, पुढचं नंतर पाहू” असा विचार करून पुढील भटकंतीचं नियोजन मनात ठरवू लागलो.

भारतीय प्रथेनुसार नियोजित वेळे पेक्षा बोट तब्बल १५ मिनिटे उशिरा—पावणे सातला—जेट्टीला लागली. प्रवासी आणि दुचाकी बोटीत चढवण्यात आल्या आणि आमचा रेवसच्या दिशेने समुद्रप्रवास सुरू झाला.
पूर्व क्षितिजावर अरुणोदयाची लाली पसरू लागली होती. मुंबई एक बेट असल्याने  समुद्रातून होणाऱ्या सूर्योदय पाहण्याचं भाग्य लाभत होतं. त्या अप्रतिम निसर्गपटाला जमेल तसं मोबाईल कॅमेऱ्यात आणि डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न सुरू होता.

बोटीच्या सोबतीला परदेशी पाहुण्यांची साथ लाभत होती. सीगल पक्षी युरोप मधील थंडी टाळून उष्ण कटिबंधीय प्रदेशात स्थलांतर करून येथे आले होते. प्रवाशांनी फेकलेला खाऊ ते कधी समुद्रावर झेप घेऊन, तर कधी हवेत उडत-उडत पकडत होते. त्यांच्या लयबद्ध हवाई कवायती बोटीबरोबरच सुरू होत्या.

साडेआठ वाजले होते. सूर्यदेव आता क्षितिजावरून वर आले होते आणि त्यांची गोंडस लाली हळूहळू तापलेल्या पांढऱ्या गोळ्यात रूपांतरित झाली होती. डाव्या बाजूला द्रोणागिरी आणि करंजा जेट्टी अस्पष्टपणे दिसत होत्या, तर उजव्या बाजूला रेवस जेट्टी खूणावत होती.
नऊच्या सुमारास आमची बोट रेवस जेट्टीला लागली. प्रवासी उतरल्यावर दुचाकी उतरवण्यास सुरुवात झाली. आमची ॲक्टिवा खाली उतरताच आम्ही ती घेऊन थेट जेट्टीबाहेर पडलो.
रेवस जेट्टीच्या बाहेर येताच आम्ही सर्वप्रथम तिकीट काउंटरवर जाऊन परतीच्या शेवटच्या फेरीबाबत खात्री करून घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी पाचची एक फेरी आणि त्यानंतर थेट सातची फेरी होती. सातची फेरी ही शेवटची असल्याने, किमान साडेसहाला तरी जेट्टीवर परत येण्याच नियोजन करायचं, असं आम्ही ठरवलं.
माझ्या अनुभवाने सांगायचं झालं, तर साइटवर किंवा कर्मचाऱ्यांनी जरी प्रवास दीडतास सांगितला तरी प्रत्यक्षात बोट रेवसला पोहोचायला आणि दुचाकी उतरवून बाहेर पडायला आरामात दोन तास लागतात.
जवळजवळ दहा वाजता अलिबागला पोहोचलो तरी त्यानंतर किल्ला पाहायला किमान दोनतास पाहिजे होते. मात्र तोपर्यंत ओहोटी संपत आली असती. त्यामुळे किल्ला पाहून पुन्हा किनाऱ्यावर येण्याचा मेळ बसत नसल्याने आम्ही आधी कनकेश्वर मंदिर पाहण्याचा निर्णय घेतला.
येथील हवेत मुंबईपेक्षा अधिक गारवा जाणवत होता. त्यातच स्वच्छ, शुद्ध हवा असल्यामुळे वातावरण अधिकच आल्हाददायक वाटत होतं. रस्त्याच्या दुतर्फा नारळी–पोफळीच्या बागा, कौलारू घरे—कोकणी पद्धतीचं नैसर्गिक सौंदर्य मन मोहून घेत होतं. सुरुवातीला गुगल बाबाचा थोडासा चकवा लागला, पण नंतर आम्ही पुन्हा अलिबाग–रेवस मार्गावर आलो.

रेवसनंतर अंदाजे १५ किलोमीटर अंतरावर थळ येथील ‘आरसीएफ’ कारखान्याचा खासगी रेल्वेमार्ग रस्ता ओलांडतो. ही खूण लक्षात ठेवून पुढे डावीकडे वळणाऱ्या रस्त्याकडे लक्ष द्यायचं. याच ठिकाणी रेवस पासून अंदाजे १५ किलोमीटरवरील चोंढी गावाच्या फाट्यावर उजवीकडील रस्ता मापगावकडे जातो.
 मापगाव हे कनकेश्वर डोंगराच्या पायथ्याचं गाव आहे. याचोंढी गावाच्या फाट्यापासून अवघ्या तीन ते साडेतीन किलोमीटरवर मापगावात कनकेश्वरमंदिराच्या पायऱ्या सुरू होतात.
मापगावातील ग्रामपंचायत आणि शाळेजवळ  येताच,कनकेश्वर मंदिराकडे जाणारा पायऱ्याचा रस्ता स्पष्टपणे दिसू लागतो. ‘आरसीएफ’ कारखान्याचा खासगी रेल्वेमार्ग पार केल्यावर आपण वाहनतळावर पोहोचतो. स्वागत कमानीजवळ गाडी उभी करून आम्ही पायऱ्या चढण्यास सुरुवात केली.

स्वागत कमानीजवळ दगडात कोरून कनकेश्वर मंदिराची उंची आणि एकूण पायऱ्यांची संख्या लिहिलेली आहे. त्यानुसार स्वागत कमानीपासून साडेसहाशे पायऱ्या मंदिरापर्यंत जातात. कनकेश्वर मंदिराची उंची डोंगराच्या पायथ्यापासून सुमारे ९०० फूट असून समुद्रसपाटीपासून ती साधारण १२७५ फूट आहे.
पायऱ्यांवरून मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होताना वाटेत झाडीमध्ये  पादुका कोरलेल्या गोसाव्यांच्या समाधी दिसतात. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या वाटेवर ठिकठिकाणी भाविकांना विश्रांतीसाठी थांबे बांधले आहेत. तसेच उरलेल्या पायऱ्या आणि चालायचे अंतर फूटांमध्ये दगडात कोरलेले आहे.

पायऱ्यांवरून वर चढताना पश्चिम दिशेकडे पाहिल्यास रेवसच्या खाडीपासून ते अलिबागपर्यंत पसरलेला दहा–पंधरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, आणि नारळी–पोफळीच्या बागांचा सुंदर निसर्गपट नजरेसमोर उभा राहतो. सिंधुसागरात विराजमान असलेले स्वराज्याचे खंदे रक्षक—कुलाबा, खांदेरी आणि उंदेरी हे जलदुर्गही दिसतात. थोडीशी धुरकट हवा असल्यामुळे ते अस्पष्ट दिसत होते.
पायऱ्यांच्या वाटेतच फेरीबोटीमध्ये आमची ओळख झालेली मामा–भाच्याची जोडी पुन्हा भेटली—गुरुनाथ वरवडेकर आणि त्यांचे भाचे महेंद्र चव्हाण. तेही अलिबाग फिरण्यासाठी आले होते. ‘दो से भले चार’ या विचाराने आम्ही एकत्र भटकंती करण्याचा निर्णय घेतला आणि आमचा चौघांचा सहप्रवास सुरू झाला.

काही अंतर पार केल्यावर पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार, दाट झाडी आपल्याला थेट मंदिरापर्यंत साथ देते. त्यामुळे वाटेत गारवा आणि सावली लाभते आणि भर उन्हातही ही चढण सुसह्य वाटते.
वाटेत पायऱ्यांच्या मधोमध ‘नागोबाचा टप्पा’ लागतो. येथे एक छोटस घुमटीवजा नागोबा मंदिर आहे. आत नागाची मूर्ती आहे. दर्शन घेऊन आम्ही पुढील वाटेला लागलो. जसजसे वर चढत जातो, तसतशी झाडी अधिक दाट होत जाते आणि कनकेश्वर दर्शनाची आतुरता वाढत जाते.
खडी चढाई संपल्यानंतर वरती पालेश्वर शिवमंदिर दिसते. चौकोनी भिंती आणि वर घुमट अशी रचना असलेले हे मंदिर बांधणीवरून उत्तर मराठा काळातील किंवा त्यानंतरचे असावे असे वाटते. मंदिरात शिवपिंडी असून येथे फुलांऐवजी झाडांचा पाला अर्पण केला जातो.
पालेश्वर मंदिराच्या थोडं पुढे गेल्यावर स्वागत कमानी दृष्टीस पडते. या ठिकाणी चढाई संपते. स्वागत कमानीतून प्रवेश करताच ब्रह्मकुंड दिसते आणि त्याच्या शेजारी मारुती मंदिर आहे. प्रवेशद्वारातून आत येऊन आम्ही ब्रह्मकुंडात उतरून हात-पाय धुऊन शुचिर्भूत झालो आणि कनकेश्वराच्या दर्शनासाठी सज्ज झालो.
ब्रह्मकुंड ही चिरेबंदी चौकोनी पुष्करणी आहे. पश्चिम बाजूस दोन प्रवेशद्वार असून उर्वरित तीन बाजूंना प्रत्येकी एक कमानीदार प्रवेशद्वार आहे. चारही बाजूंनी खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पुष्करणीच्या बाहेरील भिंतीजवळ भग्न अवस्थेतील एक पुरातन मारुतीची मूर्ती ठेवलेली आहे. ती पाहून आम्ही बाजूला असलेल्या मारुती मंदिरात दर्शनासाठी गेलो.

मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करून भिंतीचिरेबंदी करून मार्बल लावलेले दिसते. अजूनही काही काम सुरू असावे असे वाटते. मात्र आतली मूर्ती जुनी आहे. आतापर्यंत पाहिलेल्या हनुमान मूर्तींपेक्षा ही मूर्ती वेगळी वाटते—तोंड उघडलेले, ओठांवर झुपकेदार मिशी, जवळजवळ मानवी चेहरा भासावा अशी रचना. एका हातात गदा, तर दुसराहात आशीर्वादाच्या मुद्रेत आहे. कानात कुंडले, पायात वाळे असून एका पायाखाली पणवती साडेसाती किंवा लंकिनी राक्षसीला चिरडल्याचे  निदर्शनास येते 

मारुती मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुन्हा कनकेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो. जवळपास एक तासाच्या चढाईनंतर समोर सुंदर कनकेश्वर मंदिराचा कळस दिसू लागला. मंदिराच्या आधी बलराम–कृष्ण मंदिर आहे. हे मंदिर अलीकडच्या काळात बांधलेले दिसते. आत बलराम आणि श्रीकृष्ण यांच्या लहान संगमरवरी मूर्ती आहेत.
बलराम आणि श्रीकृष्ण यांचे दर्शन घेऊन आम्ही कनकेश्वर मंदिराकडे गेलो. परिसरात फुलविक्रेते आणि काही घरगुती हॉटेल्स आहेत.हिरव्या-गार राईच्या पाचूमध्ये जणू एखादा मोती शोभावा तसे कनकेश्वर मंदिर उभे आहे, आणि त्याच्या पूर्वेकडे सुंदर अशी पुष्करणी आहे.
पुष्करणीजवळून आम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे गेलो. प्रवेशद्वारा समोरील प्रांगणात तुळशी वृंदावन आणि दगडी दीपमाळ उभी आहे.
हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन सिंह आणि दोन द्वारपाल शिल्प आहेत. 
द्वारातून आत प्रवेश करताच भव्य सभामंडपात पोहोचतो. सभामंडपाच्या छतावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. हा सभामंडप अलीकडेच बांधलेला दिसतो; मात्र मूळ मंदिर आणि गर्भगृह नागर शैलीतील असून ते साधारण नवव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान बांधलेले असावे असे वाटते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर नंदी विराजमान आहे.

गर्भगृहाच्या दारावर शिव–पार्वतीच्या मुर्त्या आहेत. गर्भगृहाच्या द्वारचौकडी वर गणेशपट्टी असून संपूर्ण चौकडीवर अत्यंत नाजूक आणि देखणे नक्षीकाम केलेले आहे. द्वारपाल, द्वारशाखा यांवरही सखोल कोरीव काम आढळते. द्वारशाखांपैकी सर्वात आतील शाखेवर पुष्पमाला धारण केलेले गंधर्व, मधल्या शाखेवर वादकांचा मेळा, तर बाहेरील शाखेवर विविध देवप्रतिमा कोरलेल्या आहेत. दोन्ही बाजूंना द्वारपाल उभे असून त्याखाली देवप्रतिमा आणि चामरधारी सेवक दाखवले आहेत. तळाशी दोन्ही बाजूंना कीर्तिमुख, तर प्रवेशद्वाराच्या माथ्यावर पुष्पमाला, यक्ष–गंधर्वांचे दोन थर आणि मध्यभागी गणेशपट्टी असा हा संपूर्ण प्रवेशद्वाराचा भव्य देखावा आहे.

या प्रवेशद्वाराच्या सौंदर्यात काही काळ रमून, चार पायऱ्या उतरून  गर्भगृहात  प्रवेश केल्यावर शिवलिंग दिसते. त्या शिवलिंगावर चांदीच्या मुखवट्यात कनकेश्वर विराजमान आहे. शिवलिंगासमोर पाषाणात कोरलेली स्त्रीदेवतेची मूर्ती आहे—बहुधा गंगा किंवा पार्वती असावी. पार्वती देवीच्या हातात सहसा शस्त्र किंवा त्रिशूळ दाखवले जातात; येथे ते नसल्यामुळे मला ती गंगेची मूर्ती असावी असे वाटले. तिच्या वरच्या बाजूस चतुर्भुज, दोन्ही हातात कमळ धारण केलेली महालक्ष्मीची मूर्ती आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात काही काळ शांतपणे घालवल्यानंतर आम्ही प्रदक्षिणेसाठी बाहेर पडलो. समोरच एक अत्यंत सुंदर दृश्य दिसले—शेषनागावर पृथ्वी दाखवलेली असून शेषनागाच्या मुखातून नळ जोडून कल्पक पाणपोई तयार करण्यात आली आहे. त्या वाहत्या पाण्यात गोमाता चक्क हवेत मान उंचावून पाणी पिताना दिसत होती; ते दृश्य पाहून क्षणभर मन थांबून गेलं.

मी उत्तर बाजूने मंदिर परिसर पाहण्यासाठी निघालो. समोर माकड मंदिराच्या छतावर बसून केळ्यावर ताव मारत होत. उजव्या बाजूला एक छोटे शिवमंदिर होते. मंदिरासमोर लहानसा नंदी आणि गर्भगृहात छोटी शिवपिंडी होती. मंदिराच्या भिंतीवर दान दिलेल्या व्यक्तींची नावे कोरलेली दिसत होती.
 मंदिराच्या प्रांगणात आणखीही काही छोटी देवालये आहेत.
मूळ मंदिरावरील कलाकृती बारकाईने पाहून झाल्यावर आजूबाजूच्या या छोट्या देवालयांना भेट देण्याचे आम्ही ठरवले.

आम्ही उत्तर दिशेने मंदिर पाहण्यास सुरुवात केली. उत्तर बाजूस पायथ्याशी दोन हत्तींची शिल्प दिसले.हत्ती शिल्पाच्या वर चतुर्थभुज देवीचे शिल्प आहे ते मला प्रथम लक्ष्मीचे शिल्प वाटले  . हे शिल्प लक्ष्मीचे नसून ललिता त्रिपुरसुंदरीचे असावे असे वाटते. ललिता त्रिपुरसुंदरी हे आदिपराशक्तीचे मूळ रूप मानले जाते आणि पार्वती हे तिचेच रूप समजले जाते.
ललितादेवीच्या वरच्या हातांत पाश (दोरी) आणि अंकुश असतो. खालच्या दोन हातांपैकी एक हात वरद मुद्रा किंवा इक्षुकोदंड (उसाचे धनुष्य) आणि दुसऱ्या हातात पंचबाण दाखवले जातात. काही ठिकाणी तिच्या हातात कमंडलूही दिसतो. चार भुजा, हातात कमंडलू आणि पायाखाली हत्ती—या वैशिष्ट्यांवरून हे शिल्प ललिता त्रिपुरसुंदरीचे असावे असे वाटते.

या शिल्पाच्या वर अष्टभुजाधारी चामुंडा देवीचे शिल्प कोरलेले आहे. देवीची शरीरयष्टी अत्यंत कृश, हाडांचा सापळा स्पष्ट दिसेल अशी आणि शुष्क दाखवलेली आहे. त्वचेखालच्या बरगड्या ठळकपणे कोरलेल्या आहेत. चामुंडा शिल्पाचे एक महत्त्वाचे  वैशिष्ट्य म्हणजे तिच्या खपाटीला गेलेल्या पोटावर कोरलेला विंचू. छातीवर लाल रंग लावल्यामुळे काही तपशील झाकले गेले आहेत. देवीच्या पायाखाली ‘शव’ (मृतदेह) दाखवलेला असून त्यामुळे तिला ‘प्रेतवाहिनी’ असेही म्हटले जाते. हे जगाच्या नश्वरतेचे आणि अहंकाराच्या विनाशाचे प्रतीक मानले जाते.
चंड आणि मुंड या असुरांचा वध केल्यामुळे तिला चामुंडा हे नाव पडले असून ती सप्तमातृकांपैकी एक उग्र देवता आहे.
शिखराच्या मध्यावर ‘उमा-महेश्वर’ शिल्प आहे. यात भगवान शिव ललित मुद्रेत असून देवी पार्वती त्यांच्या डाव्या मांडीवर बसलेली आहे.

 पश्चिम दिशेला शिखरावर नृत्य करणाऱ्या गणेशाचे अत्यंत सुंदर शिल्प कोरलेले आहे.  नृत्यगणेशाच्या वर भैरवाचे शिल्प असून त्याच्या वर सर्वांचा लाडका, मुरली वाजवणारा मुरलीधर श्रीकृष्ण कोरलेला आहे.

शिखर आणि मंदिर यांच्या मधील भारवाहक पट्टीवर काही वेगळीच शिल्पे आढळली. त्यातील एक शिल्प ध्यानस्थ साधूचे आहे. मात्र उत्तर दिशेवरील काही शिल्पे विचार करायला लावणारी आहेत. त्यापैकी एक मिथुन शिल्प आहे. त्यानंतरचे शिल्प एका स्त्रीच्या योनीतून नाग बाहेर येताना दाखवते—हे शिल्प विशेष गूढ वाटले. यामागे नेमका काय अर्थ अभिप्रेत असावा, हा प्रश्न पडतो.
हे शिल्प तंत्र आणि निसर्गोपासनेचे प्रतीक असावे असे वाटते. योगशास्त्रानुसार कुंडलिनी शक्तीजागृतीत ‘मूलाधार चक्र’ हे योनीस्थानी मानले जाते आणि तेथे सुप्त असलेली ऊर्जा ‘नागा’च्या रूपात दर्शवली जाते.
 योनीतून नाग बाहेर येणे म्हणजे मूलाधार चक्रातून आध्यात्मिक ऊर्जेचा उदय—असा अर्थ लावता येईल. मात्र कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती एक-एक चक्र पार करत शेवटी सहस्रार चक्रापर्यंत जाते, त्यामुळे हा अर्थ थोडासा संदिग्ध वाटतो.

दुसरा संभाव्य अर्थ ‘लज्जा गौरी’शी संबंधित असू शकतो. सुफलता आणि सृजनशीलतेचे प्रतीक म्हणून स्त्रीच्या योनीतून नाग बाहेर येणे हे प्रजनन आणि निर्मितीचे चिन्ह मानले जाते. नाग पृथ्वीच्या सुपीकतेचा आणि पुनर्जन्माचा प्रतीक आहे. स्त्री (प्रकृती) आणि नाग (शक्ती) यांचे मिलन सृष्टीनिर्मितीचे द्योतक ठरते. 
उकडू बसण्याची स्थिती ही ‘प्रसूती स्थिती’ मानली जाते—नैसर्गिक जन्म देण्याची आणि पृथ्वीशी थेट संपर्क साधण्याची अवस्था. स्तन आणि उदरभाग ठळक कोरलेले असल्यामुळे हे शिल्प लज्जा गौरीशी संबंधित असण्याची शक्यता अधिक वाटते.

त्याच्या पुढील शिल्पातही लज्जा गौरीसदृश मूर्ती दिसते—जणू मूल जन्माला घालत असल्याचा संकेत मिळतो. दोन मांड्यांमधील भागात काहीतरी दाखवलेले आहे; मात्र सपाट छाती आणि पोटामुळे ती मूर्ती तितकीशी लज्जागौरी असेल स्पष्ट वाटत नाही. या शिल्पातील एका हातात कमळ आहे, तर दुसरा हात जानंग्याच्या खाली ठेवलेला आहे.

पुढील शिल्पात एक व्यक्ती दोन्ही हात छातीवर ठेवून बसलेली दिसते. त्यानंतरच्या शिल्पात पिणाक—भगवान शिवाचे आवडते वाद्य—वाजवणारा शिवगण असावा असे वाटते. त्याच्या पुढे बासरी वाजवणारा श्रीकृष्ण कोरलेला आहे. या पट्टीतील पुढील शिल्पे विविध साधनांशी संबंधित आहेत. त्यातील एका शिल्पात स्त्री खंजीर धारण केलेली आहे. सर्वात शेवटी वीणा सदृश वाद्य वाजवणारा गंधर्व असावा असे शिल्प दिसते.

संपूर्ण मंदिराच्या आधारपाटीखालील पट्टीवर वानरांची शिल्पे कोरलेली आहेत. मात्र काळाच्या ओघात ऊन-पावसाच्या माऱ्यामुळे ती जीर्ण झाल्याने त्यांची ओळख पटणे थोडे अवघड होते.
यानंतर आम्ही दक्षिण दिशेच्या मुख्य शिल्पांकडे वळलो. मंदिराच्या पायथ्याखाली दोन हत्ती कोरलेले असून त्या शिल्पाच्यावर नंदीवर ललित आसनात बसलेली माहेश्वरी देवीचे शिल्प आहे —सप्तमातृकांपैकी एक असलेल्या देवीच्या एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात नाग, एक हात वरद मुद्रेत असून चौथ्या हातात काही वस्तू असाव्यात असे वाटते.
या शिल्पाच्या वर षड्भुजाधारी शिवनृत्याचे नटराज मुद्रेतील   शिल्प आहे. पायाजवळ एका बाजूला नंदी, तर दुसऱ्या बाजूला शिवगण मृदंग वाजवत असल्याचे दाखवले आहे.


पश्चिम दिशेने गेल्यावर ललित मुद्रेत बसलेली चतुर्भुज देवी दिसते. चारही हातांत वस्तू आहेत; मात्र त्या स्पष्ट न ओळखता आल्याने देवीचे नेमके रूप निश्चित करता येत नाही.
या शिल्पाच्या वर षड्भुजाधारी शिवाचे ‘अंधकासुरवध’ रूप कोरलेले आहे. शिवाच्या विविध हातांत डमरू, खड्ग आणि कपाल आहे. दोन हातांनी त्यांनी मोठा त्रिशूळ धरलेला असून त्याच्या टोकावर अंधकासुराला अधांतरी टोचलेले दाखवले आहे. शिवाचा एक पाय जमिनीवर तर दुसरा त्यांच्या वाहनावर—नंदीवर—उभा आहे.
शिखरावर ‘उमा-महेश्वर’ शिल्प आहे. यात भगवान शिव ललित मुद्रेत असून देवी पार्वती त्यांच्या डाव्या मांडीवर बसलेली आहे. पार्वती प्रेमभावाने शिवांकडे पाहताना दाखवली आहे. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाला दाढी-मिशी दाखवलेल्या आहेत आणि पायाजवळ नंदीऐवजी मोर कोरलेला आहे. संपूर्ण मंदिरात शिव-पार्वतीची एकत्रित शिल्पे फारशी दिसत नाहीत; त्यामुळे हे शिल्प विशेष लक्ष वेधून घेतं.
पश्चिम शिखराच्या खाली एक गूढ शिल्प आहे. त्या मूर्तीचा एक पाय सरळ उभा असून दुसरा पाय गुडघ्याजवळ वाकवलेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून एका हातात डमरू स्पष्ट दिसतो. डोक्यावर मुकुट असून चेहरा शांत, कोमल आणि किंचित स्त्रीसुलभ वाटतो. मात्र हे शिल्प नक्की कोणाचे आहे, हे ओळखता आले नाही.

 पश्चिम  शिखराच्या मध्यभागी ललित मुद्रेत बसलेली चतुर्भुज देवी आहे. एका हातात ढाल, एका हातात खड्ग, एका हातात पाश आणि एक हात वरद मुद्रेत —असे हे दुर्गेचे स्वरूप असावे असे वाटते. 
शिखराच्या वरच्या बाजूस छातीशी खंजीर धरलेली देवीची मूर्ती आहे. एक पाय जमिनीवर आणि दुसरा एका बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर ठेवलेला आहे.
पश्चिम शिखराच्या जवळ, द्वाराच्या वर भव्य शरभ शिल्प कोरलेले आहे.
मंदिराच्या पूर्व बाजूस शिखरावर चढणारी एक मानवी आकृती कोरलेली आहे. हे शिल्प विशेष लक्षवेधी आहे. मूळ दगडातूनच त्या आकृतीच्या पायाभोवती वाळा कोरलेला असून तो जणू काही शिल्प तयार झाल्यावर कुणीतरी प्रत्यक्ष घातल्यासारखा भासतो. कानातील कुंडले, कमरपट्टा—सर्व अलंकार अतिशय सूक्ष्मतेने कोरलेले आहेत. वर अधांतरी दाखवलेली भव्य मूर्ती आणि संपूर्ण रचनेतील संतुलन पाहून त्या कलाकाराचे कसब थक्क करून सोडते.
 कनकेश्वर मंदिरावरील शिल्प  दर्शन करून झाल्यावर आम्ही मंदिराच्या उत्तर बाजूस असलेल्या रामेश्वर शिवमंदिरात गेलो. हे मंदिर आकाराने छोटे असून त्याची बांधणी मराठा काळातील असावी असे वाटते, कारण मंदिराचा वरचा भाग मशीदसदृश दिसतो. मराठा काळानंतर अशा प्रकारची मंदिररचना अनेक ठिकाणी आढळते.
रामेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन आम्ही पूर्व बाजूला असलेल्या दगडी बांधकाम केलेल्या आणखी एका छोट्या शिवमंदिराकडे गेलो. या मंदिरासमोर लहानसा नंदी असून आत छोटं शिवलिंग आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भग्न अवस्थेतील एक मूर्ती ठेवलेली आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून तिचे दोन हात तुटलेले आहेत आणि बाजूला सिंह कोरलेला आहे. ही भवानी मातेची मूर्ती असावी असे वाटते. हरिहरेश्वरच्या समुद्रघळीच्या पायथ्याखाली ठेवलेल्या भवानीमातेच्या मूर्तीशी या मूर्तीचे विलक्षण साम्य जाणवते. दोन्ही मूर्ती भग्न अवस्थेत असून त्यांच्यातील फरक ओळखणे कठीण वाटते.

कनकेश्वर मंदिर पाहताना रामसिद्धिविनायकाचे दर्शन राहून गेले होते, हे लतेशने माझ्या लक्षात आणून दिले. त्यानंतर आम्ही सिद्धिविनायक मंदिराकडे गेलो. सिद्धिविनायक मंदिरासमोर विष्णू मंदिर आहे. येथील मंदिर आणि मूर्ती मराठा काळातील असाव्यात असे वाटते. चतुर्भुज विष्णूची मूर्ती असून त्यांच्या पायाजवळ दोन लहान जय–विजय कोरलेले आहेत.

उत्तर दिशेस छोटे भैरव मंदिर आहे. या मंदिरात भैरवाची लहान पाषाणमूर्ती असून तिच्यावर पितळेचा मुखवटा चढवलेला आहे. मंदिराबाहेर वीरस्मृती शिळा, गणेशमूर्ती आणि आणखी दोन भग्न अवस्थेतील मूर्ती ठेवलेल्या आहेत.
भैरव मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही रामसिद्धिविनायक मंदिरात गेलो. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून फार प्राचीन नसावे; काही वर्षांपूर्वीच बांधलेले दिसते. मंदिरात सिद्धिविनायकाची आणि त्यांच्या बाजूला ऋद्धी–सिद्धीच्या मूर्ती आहेत. सर्व मूर्ती संगमरवरी पाषाणात घडवलेल्या आहेत.
 रामसिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा कनकेश्वर मंदिराच्या प्रांगणात आलो. मंदिरातील नितांत शांतता, कला, स्थापत्य आणि भक्ती यांचा संगम अनुभवून आम्ही पुढील प्रवासासाठी करमरकर शिल्प संग्रहालयाकडे निघालो.
"माझ्या मते, मंदिराचा अनुभव आपल्याला तीन पातळ्यांवर घेता येतो... जेव्हा आपण गाभाऱ्यात नतमस्तक होऊन मूर्तीचे दर्शन घेतो, तेव्हा मनात 'भक्तीभावाचा' सागर ओसंडून वाहतो. दर्शनानंतर जेव्हा आपण मंदिराच्या प्रांगणात काही क्षण शांत, अंतर्मुख होऊन बसतो, तेव्हा 'मनशांतीचा' एक निवांत आध्यात्मिक अनुभव मिळतो. आणि जेव्हा आपण मंदिरावर कोरलेल्या कलाकृती, त्यातील नक्षीकाम आणि भव्य स्थापत्यशैली बारकाईने न्याहाळतो, तेव्हा नकळतपणे ते मंदिर उभारणाऱ्या कसबी कारागिरांच्या आणि शिल्पकारांच्या कर्तृत्वाला आपण मनापासून दाद देत असतो—त्यांच्या गौरवाचा तो एक मूक सोहळा असतो.
​कोकणातील पवित्र कनकेश्वर मंदिराच्या वास्तूत आम्हांला या तिन्ही अनुभूतींचा अगदी हुबेहूब प्रत्यय आला!"

कनकेश्वर मंदिर : भौगोलिक, धार्मिक व ऐतिहासिक माहिती

भौगोलिक स्थान
अष्टागर परिसरात, अलिबाग–रेवस मार्गाजवळ घनदाट राईत कनकेश्वर डोंगराच्या माथ्यावर हे रम्य व शांत देवस्थान वसलेले आहे. कनकेश्वर मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे १२०० फूट उंचीवर आहे. हे देवस्थान अलिबागपासून सुमारे १३ किमी, रेवस फेरी जेट्टीपासून १८ किमी आणि मांडवा फेरी जेट्टीपासून सुमारे १४ किमी अंतरावर आहे.
कनकेश्वर मंदिराला जाण्यासाठी मापगाव हे मुख्य पायथ्याचे गाव असून तेथून सुमारे ७५० पायऱ्यांची चढण आहे. याशिवाय झिराड आणि बहिरोळे या गावांतूनही डोंगरावर जाणाऱ्या पाऊलवाटा आहेत. डोंगर चढून मंदिरात पोहोचण्यासाठी साधारण पाऊण ते एक तास लागतो. श्रावण सोमवार, कार्तिक पौर्णिमा आणि शिवरात्री वगळता मंदिर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले असते. मंदिर परिसरात राहण्याची व जेवणाची माफक दरात सोय उपलब्ध आहे.

ऐतिहासिक माहिती
हे मंदिर मूळतः नागर शैलीतील भूमिज उपशैलीत बांधलेले शैव  मंदिर आहे. भूमिज शैली १०व्या ते १३व्या शतकात माळवा आणि दख्खनच्या पठारावर—विशेषतः शिलाहार आणि यादव काळात—अत्यंत लोकप्रिय होती.
कोकण पट्ट्यावर ९व्या ते १३व्या शतकापर्यंत शिलाहार घराण्याचे राज्य होते. शिलाहार राजांनी बांधलेल्या इतर मंदिरांशी कनकेश्वर मंदिराच्या शैलीचे स्पष्ट साधर्म्य आढळते. १३व्या शतकात हा भाग यादव राजा रामदेवराय यांच्या अधिपत्याखाली आला आणि त्यांच्या काळात या मंदिराला राजाश्रय मिळाल्याची नोंद आढळते.
महाराष्ट्रातील मंदिरांवरील कामशिल्पांचा काळ प्रामुख्याने शिलाहार व यादव काळातील (१०वे ते १३वे शतक) असल्याचे संशोधक मानतात. कनकेश्वर मंदिरावरील कामशिल्पे याचीच साक्ष देतात. या सर्व पुराव्यांवरून कनकेश्वर मंदिराचे बांधकाम १०व्या ते १३व्या शतकात झाले असावे, असे मानले जाते.

मराठा कालीन ऐतिहासिक नोंदी 
कनकेश्वर हे आंग्रे घराण्याचे कुलदैवत मानले जाते. आंग्र्यांनी या देवस्थानासाठी पायथ्याशी असलेले सागाव नावाचे खेडे दत्तक दिले होते. रघुजी आंग्रे यांचे दिवाण गोविंद रेवादास दलाल यांनी इसवी सन १७७४ च्या सुमारास कनकेश्वर मंदिराची पुष्करणी आणि मापगावपासून मंदिरापर्यंतच्या पायऱ्यांचे बांधकाम स्वखर्चाने केल्याची नोंद आढळते.

कनकेश्वर मंदिराची आख्यायिका
एका आख्यायिकेनुसार कनकासूर नावाच्या राक्षसाने महादेवाची कठोर तपश्चर्या केली आणि वर म्हणूच. न त्यांच्याशी द्वंद्व करण्याची संधी मागितली. हे द्वंद्व अनिर्णित राहिले. प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला वर मागण्यास सांगितले. कनकासुराने डोंगरावर शंकरासोबत वास्तव्य करण्याची इच्छा व्यक्त केली. शंकराने त्याला पालथे पडण्यास सांगून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्या यज्ञात कनकासूर भस्मसात होऊन मुक्त झाला आणि हे स्थान ‘कनकेश्वर’ म्हणून प्रसिद्ध झाले, अशी ही आख्यायिका सांगितली जाते.

Post a Comment

0 Comments