भटकंती माळशेजघाट आणि परिसराची | Wanderings of Malshejghat and surroundings | भ्रमर
लॉक डाऊन संपून हळूहळू सर्व पुर्वपदावर होत असल्याचा फायदा घेऊन मुंबई जवळील निसर्गाच्या सान्निध्यातील एखादी प्राचीन घाट वाट किंवा छोट्याश्या गडाची भटकंती करून रिफ्रेश व्हावंसं वाटत होतं. त्यासाठी निश्चित जागा ठरत नव्हती. शनिवारी सकाळी सुरु झालेला अहुपेघाट किंवा सोंडाई किल्ल्याच्या भटकंतीचा प्लॅन संध्याकाळपर्यंत माळशेज घाटाच्या भटकंतीवर येउन ठेपला. बरेच दिवस चालण्याचा सराव नसणे आणि ऑक्टोबर हीट हे प्लॅन बदलण्याचे मुळ करण होते . नेहमी प्रमाणे रात्रीपर्यंत भटकंतीला येणाऱ्या भिडुंची गळती होऊन आता रवी, संदेश आणि मी असे फक्त तीघेच उरलो होतो. रविवारी सकाळी साडेपाच्या सुमारास आमचं तिघांचं त्रिकूट गोरेगावहून कल्याण - नगर रोडने माळशेजच्या दिशेने निघाले. माळशेज घाट परिसर बाराही महिने पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. खास करून पावसाळ्यात मात्र घाटाचा नजारा काही औरच असतो. कल्याण - नगर रस्त्यावरील महत्वाचं ठिकाण म्हणजे मुरबाड हे तालुक्याचे गाव. माळशेज घाटाच्या चढाईची सुरुवात ह्याच तालुक्यातून होते. भीमाशंकर पासून आजोबापर्वता पर्यंतच्या डोंगररांगेतील गडकिल्ले, घाटवाटा, प्राचीन मंदिरे, तसे...