LATEST BLOGS

करमरकर शिल्प संग्रहालय

करमरकर शिल्प संग्रहालय 


---

कनकेश्वर मंदिरातील नितांत शांतता, कला, स्थापत्य आणि भक्ती यांचा संगम अनुभवून आम्ही पुढील प्रवासासाठी करमरकर शिल्प संग्रहालयाकडे निघालो.

कनकेश्वर मंदिरापासून हे शिल्प संग्रहालय सुमारे १२ किमी अंतरावर आहे. अलिबाग रोडवर येऊन रेवसच्या दिशेने सुमारे ७ किमी प्रवास केल्यानंतर डाव्या बाजूने जाणाऱ्या आवास रस्त्याने पुढे गेल्यावर आवास फाट्यावरून ससावणे गावात पोहोचता येते. याच ससावणे गावात, प्रसिद्ध शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर (नानासाहेब करमरकर) यांच्या जन्मगावी, त्यांच्या स्वतःच्या घरात हे शिल्प संग्रहालय उभारण्यात आले आहे. येथे सुमारे १५० हून अधिक शिल्पकृती प्रदर्शित आहेत.

करमरकर शिल्प संग्रहालय अलिबागपासून सुमारे १८ किमी, रेवस जेट्टीपासून १२ किमी आणि मांडवा जेट्टीपासून अवघ्या साडेचार किलोमीटर अंतरावर आहे.

ससावणे गावात पोहोचताच ‘करमरकर शिल्प संग्रहालय’ अशी पाटी दिसते. तिच्या जवळच कौलारू छपराचे, दुमजली बंगलोवजा घर नजरेस पडते. घराच्या कंपाउंडमध्ये प्रवेश करताच बागेत मांडलेले शिल्पवैभव आपले लक्ष वेधून घेते.
प्रवेशद्वाराशी गुडघे छातीजवळ घेत बसलेल्या एका ग्रामीण गृहस्थाचे शिल्प आहे—जणू पान सुपारीचा  बटावा काडून “प्रवास कसा झाला? पत्ता व्यवस्थित सापडला ना?” अशी कोकणी ढंगात आपुलकीने चौकशी करेल अस वाटते. त्या पुढे अनुवटीखाली काठी टेकून उभ्या असलेल्या गुराखी मुलाचे शिल्प आहे. बहुधा गुरे चुकून कुणाच्या तरी शेतात गेली असावीत, बिचाऱ्यची अशा चिंतेत तो दिसतो.
थोडे पुढे तीन लहान मुली एका चिमुकल्या बाळाला उचलून खेळवत आहेत. बाळ त्यांना न झेपणारे असले, तरीही उचलून खेळवण्याचा त्यांचा हट्ट आणि चेहऱ्यावरील भाव अतिशय नेमकेपणाने टिपलेले आहेत. त्याच्याच पुढे अंगड-टोपली घालून बाळाशी खेळवणाऱ्या आईचे शिल्प आहे—स्मितहास्य, वात्सल्य आणि कौतुक यांचा सुंदर संगम या शिल्पातून जाणवतो.
बागेच्या एका कोपऱ्यात हातात गडू घेऊन विचारमग्न बसलेली स्त्री, शिल्प आहे,घराच्या भिंतीजवळ कमरेवर बाळ घेऊन उभी असलेली आई—जिच्या कुशीत शांत झोपलेले बाळ —हे दृश्य शिल्पातून जिवंत भासते.


घराच्या दक्षिण बाजूस माडीवर जाण्यासाठी दरवाजा आणि शिडी आहे. दरवाज्याजवळ डोक्यावर छोटे गाठोडे आणि हातात कळशी घेऊन जाणाऱ्या स्त्रीचे शिल्प आहे.बहुतेक घर धन्यासाठी शेतात न्याहारी घेऊन जात असावी.
 दरवाजातून आत प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजांना  भवानी माता तलवार अर्पण करतानाचे अत्यंत देखणे शिल्प नजरेस पडते. शिडीच्या बाजूला हातात काठी घेऊन उभा असलेला, बहुधा धनगर समाजातील मुलाचे शिल्प आहे.

शिडीने वर चढल्यावर वरांड्यात शिल्पवैभव मांडलेले दिसते. अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, श्वान, मांजर, माकड, तान्ह्या बाळाला दूध पाजणारी माता, तसेच त्या काळातील प्रतिष्ठित व्यक्ती—अशा विविध शिल्पांतून भावविश्व उलगडत जाते.
त्यात विशेष लक्ष वेधून घेणारी दोन शिल्पे म्हणजे करमरकरांच्या मुलीचे, ती लहान असताना निरागसपणे हाताची घडी करून मांडीघालून बसलेले घडवलेले शिल्प आणि त्यांच्या नोकराच्या रांगणाऱ्या बाळाचे—इतके जिवंत आणि गोंडस की बाळाला अलगद उचलावेसे वाटते.
आतील दालनात प्रवेश करताच उजव्या बाजूच्या कोपऱ्यात टिळक, आगरकर यांच्यासह त्या काळातील संस्थानिकांचे छोटे पुतळे ठेवलेले दिसतात. डाव्या बाजूला करमरकरांच्या विध्यार्थीनी घडवलेला शिल्पकार करमरकरांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अर्धाकृती पुतळे मांडलेले आहेत.
या दालनात त्या काळातील समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक, उद्योगपती यांची शिल्पे पाहायला मिळतात. कुत्र्यासोबत  असलेली मुलगी, हात डोक्याच्या मागे घेऊन बसलेला मुलगा—त्याच्या शरीरातील स्नायूं चेहऱ्या वरील भाव अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित केलेले आहेत. याच दालनात रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजन दास, महात्मा गांधी, पी.सी. रे यांची व्यक्तिशिल्पेही आहेत.

या दालनातील दोन शिल्पे विशेष लक्ष वेधून घेतात. पहिले म्हणजे ‘शंखध्वनी’—शंख फुंकणाऱ्या स्त्रीचे शिल्प, जे ग्रीक शिल्पशैलीची आठवण करून देते. इ.स. १९२४ साली कलकत्त्यातील ईडन गार्डनमध्ये ‘सोसायटी ऑफ आर्टिस्ट्स’च्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात ही कलाकृती प्रदर्शित झाली आणि  त्याच बरोबर ह्या शिल्पाने करमरकरांच्या  यशस्वी कारकिर्दीला ही.
दुसरे शिल्प म्हणजे ‘मस्त्यगंधा’—एका हातात माशांची टोपली आणि दुसऱ्या हातात त्यातून उचललेला मासा, त्याच्याकडे टक लावून पाहणारी स्त्री. तिच्या हातातील दागिने, गळ्यातील माळ, साडीच्या चुण्या आणि शरीरावरील बारकावे विलक्षण कौशल्याने साकारलेले आहेत.

दालनातील शिल्पवैभव पाहून आम्ही बागेच्या उत्तर दिशेकडे आलो. तेथे ठेवलेले म्हशीचे शिल्प इतके जिवंत वाटते की आपण पुढे गेल्यावर ती उठून उभी राहील, असे क्षणभर वाटावे. तिच्या बाजूलाच अल्सेशियन जातीच्या कुत्र्याचे शिल्प आहे—जणू संपूर्ण शिल्पवैभवाचे रक्षण करत बसला आहे.

घराच्या मागील बाजूस ‘मामा’ नावाचे अर्धाकृती शिल्प आहे—बहुधा ते करमरकरांचे मामा असावेत. तसेच एका छोट्या घराच्या पडवीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा आहे.
करमरकर शिल्प संग्रहालयातील बागेतील शिल्पे निशुल्क पाहता येतात. मात्र घराच्या आत असलेली शिल्पे पाहण्यासाठी प्रती व्यक्ती १० रुपये शुल्क आकारले जाते, तसेच छायाचित्रणासाठी १० रुपये स्वतंत्र शुल्क आहे. एवढ्या अत्यंत नाममात्र दरात हे समृद्ध शिल्पवैभव मनमुराद अनुभवता येते.

हे सर्व शिल्प वैभव पाहून भटकंतीच्या निमित्ताने येथे आलेल्याचे सार्थक झाले असे वाटले. कनकेश्वर मंदिरातील मध्ययुगीन काळातील भारतीय कारागिरांची  शिल्प वैभव आणि त्याच परिसरात आधुनिक भारतातील शिल्पकारांनी पाश्चिमात्य शैलीत घडवलेली शिल्पे पाहण्याचा योग या भटकंतीत आला. सर्व शिल्प वैभव डोळ्यांत साठवून आम्ही अलिबागच्या दिशेने कुलाबा किल्ला पाहण्यासाठी निघालो.

Comments

Popular posts from this blog

मुंबईतील दुर्लक्षित आदिवासी आणि त्यांची समृद्ध वारली चित्रकला परंपरा

देवदार गुहा आणि मंदाकिनी डोंगर | Devdar Caves and Mandakini Hill | भ्रमर

सहकुटुंब भटकंती आनंददायी करणारा छोटेखाणी भिवगड | भ्रमर