अलिबागातील कुलाबा किल्ला भटकंती अनुभव
अलिबागातील कुलाबा किल्ला भटकंती अनुभव
करमकर शिल्प संग्रहालयातील शिल्प वैभव पाहून भटकंतीच्या निमित्ताने येथे आल्याचे सार्थक झाले असे वाटले. कनकेश्वर मंदिरात भारतीय मध्ययुगीन काळातील कारागिरांचे शिल्प वैभव पाहिले आणि त्याच परिसरात आधुनिक भारतातील शिल्पकारांनी पाश्चात्य शैलीत घडवलेली शिल्पे पाहण्याचा योग या भटकंतीत आला. सर्व शिल्प वैभव डोळ्यांत साठवून आम्ही अलिबागच्या दिशेने कुलाबा किल्ला पाहण्यासाठी निघालो.
दुपारचे २ वाजले होते. ओहोटीची वेळ ४ ची होती आणि अलिबाग १८ किलोमीटर दूर होते. अलिबागला पोहोचून जेवण करून किल्ल्यावर जायला आमच्या हातात फक्त दोन तास होते. आमची चौकडी सासवणे गावावरून अलिबागच्या दिशेने निघाली.
अलिबागमधील एका हॉटेलमध्ये पोटपूजेसाठी थांबलो.जेवण संपेपर्यंत पावणे चार वाजले होते. हॉटेलपासून अलिबाग चौपाटी फक्त ९०० मीटरवर होती. चार वाजता चौपाटीवर पोहोचून गाडी पार्किंगमध्ये लावून आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो.
अलिबाग चौपाटीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. पश्चिम दिशेला समुद्रात कुलाबा किल्ला आणि सर्जेकोट ही दुर्गद्वयी दर्शन देत होती. हे दोन्ही किल्ले मिश्रदुर्ग प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हे किल्ले चारही बाजूंनी पाण्याने वेढले जातात आणि जलदुर्ग बनतात; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते आणि ते भुईकोट बनतात.
किनाऱ्यापासून कुलाबा किल्ला सुमारे २ किलोमीटर अंतरावर आहे. ओहोटीच्या वेळी चालत जाता येते किंवा टांगा घेऊनही जाता येते. त्यामुळे किल्ल्यावर येताना ओहोटी-भरतीची वेळ पाहून नियोजन करावे लागते. चार वाजता पूर्ण ओहोटी लागली होती, आम्ही चालत किल्ल्याच्या दिशेने निघालो.
किल्ल्यावर प्रवेशासाठी २० रुपये शुल्क आकारले जाते. इथली पद्धत थोडी वेगळी आहे – QR कोड स्कॅन करून थेट साइटवर शुल्क भरावे लागते. त्यात आमचा वेळ गेला, कारण नेटवर्क नसल्याने वॉलेटमधून पैसे ट्रान्सफर होत नव्हते. शेवटी तेथील एका स्थानिक व्यक्तीच्या मोबाईलद्वारे नोंदणी करून आम्ही शुल्क भरले.
प्रवेशद्वाराचा लाकडी दरवाजा आजही शाबूत आहे. दरवाजावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत. दरवाजातून आत गेल्यावर आपण दुसऱ्या दरवाजाकडे जातो, आता त्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडताच आपण किल्ल्यात प्रवेश करतो. समोर पुरातत्व खात्याने किल्ल्याची माहिती लिहिलेला फलक आहे. त्याच्या पुढे गुलवती देवीचे (महिषासुरमर्दिनीची मूर्ती असलेले) मंदिर आहे.
प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भवानी मातेचे मंदिर आहे.
किल्ल्याची माहिती वाचून आम्ही भवानी मातेच्या मंदिराकडे गेलो. मंदिरासमोर तुळशी वृंदावन आहे. पूर्वी हे मंदिर कौलारू असावे; आता त्यावर पत्रे लावले आहेत.
गाभाऱ्यात दोन तांदळ्या मूर्ती आहेत – एकीला दोन डोळे कोरले आहेत, तर दुसरीला भवानी मातेचा पितळी मुखवटा लावलेला आहे. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला इतर देवतांचे टाक ठेवलेले आहेत. एकंदरीत हे मंदिर जुन्या कोकणातील ग्रामदेवतेच्या मंदिरासारखे वाटते.
मंदिर पाहून झाल्यावर समोर बुर्जावर जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. त्या चढून आम्ही किल्ल्याच्या तटबंदीवर गेलो. बुर्जावरून अलिबाग शहर दिसत होते. त्या बुर्जावर अलिबाग शहराच्या दिशेने दोन तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिरासमोरील बुर्जावरून महादरवाजावरील बुर्जाकडे गेलो. त्या बुर्जावरून किल्ल्यात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवता येते.
आम्ही उत्तर दिशेने तटबंदीवरून संपूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्याचे ठरवले. महादरवाजापुढील तटबंदीवरील बुर्जावर ध्वजस्तंभ उभारलेला होता.
किल्ल्याच्या पूर्व-उत्तर कोपऱ्यातील बुर्जावर दोन मोठ्या तोफा उत्तर दिशेने ठेवलेल्या आहेत. तोफांसमोर उंदेरी आणि त्याच्या बाजूचा स्वराज्यातील खांदेरी किल्ला तसेच थळचा समुद्रकिनारा दिसतो. पूर्वेस अलिबाग शहर आणि कुलाब्याचा पडकोट असलेला सर्जेकोट दिसू शकतो, पण बुर्जाजवळील उंच झाडीमुळे सध्या ते दिसत नव्हते.
शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, ‘‘किल्ल्याजवळ डोंगर (पर्वत) असल्यास तो सुरुंग लावून फोडावा किंवा शक्य नसल्यास त्या डोंगरावरही किल्ला बांधावा.’’ यामुळे मुख्य किल्ल्याला संरक्षण मिळते; अन्यथा शत्रू मोक्याच्या जागेवर मोर्चे लावून किल्ला जिंकू शकतो. या आज्ञेनुसारच बहुतेक संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याजवळील खडकावर सर्जेकोट बांधला आणि त्याला कुलाब्याशी जोडणारा दगडी सेतू बांधला.
खांदेरी बेटावर शिवाजी महाराजांनी १६७९ साली मुंबईतील इंग्रज आणि सिद्दीवर वचक ठेवण्यासाठी किल्ला बांधला होता; पण जवळच्या उंदेरी बेटाकडे दुर्लक्ष झाल्याने सिद्दीने त्याचा ताबा घेऊन किल्ला बांधला आणि मराठ्यांना कायमची डोकेदुखी झाली. कदाचित या घटनेतून बोध घेऊनच सर्जेकोट बांधला गेला.
तोफा पाहून झाल्यावर उत्तर तटबंदीवरून पश्चिम दिशेकडे गेलो.
तटबंदीवरून किल्ल्याचे अवशेष स्पष्ट दिसत होते. पश्चिम तटबंदीवरील यशवंत दरवाजा (दरिया दरवाजा) वरील बुर्जावर पोहोचलो. त्या बुर्जावरून पश्चिमेकडील खडकाळ बाजूस हनुमान मंदिर दिसते. तेथे मराठा काळात गोदी होती, जिथे नौका बांधणी आणि दुरुस्तीचे काम चालायचे. या बुर्जावरून किल्ल्याच्या आतील भागात तसेच पश्चिम, उत्तर आणि दक्षिण बाजूच्या समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवता येते.
दरिया दरवाजावरून पुढे दक्षिण तटबंदीवर गेलो. तेथून किल्ल्यातील पुष्करणी, एक शौचकूप, तटबंदीतील खोली, घुमटी आणि तुळशी वृंदावन समाधी दिसते.
किल्ल्यात हाजी कमलुद्दीन शाह यांचा दर्गाही आहे. तटबंदीवरून प्रदक्षिणा पूर्ण करून भवानी देवीसमोरील तटबंदीकडे आलो. तेथून चालत येणारे आणि टांग्यावरून येणारे पर्यटक दिसत होते. तटबंदीवरील दोन तोफांचे पुन्हा दर्शन घेऊन आम्ही संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण केली.
प्रदक्षिणा संपल्यावर तटबंदीवरून खाली उतरून सिद्धिविनायक मंदिर, दरिया दरवाजा आणि पुष्करणी पाहण्यासाठी निघालो. सिद्धिविनायक मंदिराकडे जाताना वाटेत कान्होजी आंग्रे यांच्या वाड्याचे आणि इतर गडावरील लोकांच्या घरांचे भग्न अवशेष दिसत होते. उजव्या बाजूला पुष्करणी होती; तिथे गर्दी असल्याने प्रथम सिद्धिविनायक मंदिराकडे गेलो
. १७५९ साली राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. गणेशमूर्ती संगमरवराची असून बाजूला रिद्धी-सिद्धी दाखवल्या आहेत. मूर्ती उजव्या सोंडेची असून उंची दीड फूट आहे. येथे गणेश पंचायतन आहे – गणपतीसह सूर्य, देवी, शिव आणि विष्णू यांच्या मूर्ती आहेत.
मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर सुंदर नक्षीकाम आहे. वरच्या भागात कृष्ण आणि देवी कोरलेली आहेत; खाली दोन द्वारपाल आहेत. संपूर्ण चौकटीवर वेलबुट्टी, फुले आणि भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत.
मंदिर आतून जितके सुंदर आहे तितकेच बाहेरूनही. शिखरावर विविध मूर्ती आणि नक्षीकाम आहे. मंदिराबाहेर तुळशी वृंदावन सुंदर दगडी नक्षीकामाने सजलेले आहे. मंदिर परिसरात देवचाफ्याच्या फुलांनी वातावरण सुगंधित झाले होते.
तुळशी वृंदावनाकडून शंकर मंदिरात गेलो. तेथे शिवपिंड आहे आणि समोर विरस्मृतीशिळा ठेवलेली आहे. नंतर हनुमान मंदिरात गेलो. तेथे द्रोणागिरी पर्वत उचललेल्या हनुमानाची मूर्ती आहे; पायाखाली साडेसाती/पाणवती चिरडलेली दाखवली आहे.
वेळ कमी असल्याने आम्ही उर्वरित किल्ला जलदगतीने पाहत होतो. फक्त अर्धा तास उरला होता आणि परतीच्या फेरीबोटीचे नियोजन करायचे होते. मंदिराकडून पुष्करणीकडे गेलो.
पुष्करणीचा प्रवेशद्वार मंदिरासारखा आहे; त्यावर श्रीगणेशाची मूर्ती कोरलेली आहे. आत गेल्यावर भव्य चौकोनी दगडी पुष्करणी दिसते. चारही बाजूंना दगडी भिंत आहे.
पुष्करणी पाहून किल्ल्याच्या दक्षिण टोकाला असलेला यशवंत दरवाजा पाहायला गेलो. दरवाजापूर्वी एक घुमटी आहे. आत गेल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी दिवड्या आहेत. यशवंत दरवाजाचा लाकडी दरवाजाही आजही शाबूत आहे.
समुद्राकडील दगडी चौवकडी वरील आडव्या पट्टी वर रिद्धी-सिद्धीसह गणपती, मगर, कमळे, वेलबुट्टी कोरलेली आहेत. दगडी चौवकटीच्या उभ्या पट्टीवर गरुड आणि मारुती कोरलेले आहेत. किल्ल्याच्या तटा जवळ गोदीचे अवशेष आहेत; तेथे नवीन जहाजे बांधली व जुनी दुरुस्त केली जात असत. म्हणून याला गोदी दरवाजाही म्हणतात.
यशवंत दरवाजा पाहून महादरवाजाकडे परतलो. वाटेत महिषासुरमर्दिनीची मूर्ती पाहिली आणि किल्ल्याबाहेर पडलो.
बाहेरील परिसरात सर्जेकोट दिसत होता, पण वेळेअभावी तेथे जाणे शक्य नव्हते. आमच्याकडे फक्त एक तास उरला होता; ७ ची शेवटची फेरी होती आणि घड्याळात सहा वाजले होते.
गुगल मॅपवर रेवस फेरी बोट जेट्टी टाकल्यास एक तास लागेल असे दिसत होते. गाडी पार्किंगमधून काढणे, अलिबागच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडणे यात वीस-पंचवीस मिनिटे जाणार होती. हे सर्व गणित मांडता फेरी मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे बायरोड मुंबईला जायचे ठरले.
सूर्य मावळतीला लागला होता. त्याच्या लालिमेने संपूर्ण क्षितिज उजळून निघाले होते. किल्ल्यावरील मावळता सूर्य एखाद्या अंगठीतील हिऱ्यासारखा दिसत होता. हे दृश्य न्याहाळून आम्ही कान्होजी आंग्रे स्मारक पाहायला गेलो.
खेदाची गोष्ट म्हणजे तेथे चौकशी केल्यावर तीन-चार जणांना कान्होजी आंग्रे स्मारक किंवा स्वतः कान्होजी आंग्रे कोण हे माहिती नव्हते. तेथे काम करणारे परप्रांतीय दुकानदार, रिक्षावाले आणि दुर्दैवाने एक मराठी मुलगाही होता.
अलिबाग परिसर पर्यटनस्थळ बनला आहे; सेल्फी, समुद्रस्नान आणि मौजमजा यापलीकडे येथील ऐतिहासिक महत्त्व लोकांना माहिती नाही हे खेदजनक आहे. ज्या कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या पराक्रमाने हा परिसर जागतिक पटलावर नेला, त्यांचेच नाव माहित नसणे ही त्यांच्या शौर्याची मोठी उपेक्षा आहे.
स्मारक दुरुस्तीसाठी बंद असल्याने बाहेरूनच पाहून आम्ही अलिबागची भटकंती संपवली आणि मुंबईच्या दिशेने निघालो.
कुलाबा किल्ला (कोलाबा फोर्ट)इतिहास
हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ समुद्रात असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. त्याचा इतिहास थोडक्यात खालीलप्रमाणे:
बांधकाम आणि सुरुवात:
अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गद्वयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे.
शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना मुख्यतः १६५४ मध्ये कल्याणजवळील पहिल्या जहाजापासून सुरू केली.
मुख्य कारणे:: पोर्तुगीज (जे पश्चिम किनारपट्टीचा व्यापार एकाधिकार करत होते), डच फ्रेंच इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी आणि जनजिराचे सिद्दी यांच्या नौदल शक्तींना रोखणे. मुगल साम्राज्याने नौदलाकडे दुर्लक्ष केले होते, युरोपियन प्रभाव सागरी किनारपट्टीवर होता
१६व्या आणि १७व्या शतकात पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवर (भारतीय महासागर आणि अरबी समुद्रात) प्रचंड वर्चस्व प्रस्थापित केले होते, आणि त्यांनी 'कार्टाज' (cartaz) नावाची एक परवानगी प्रणाली राबवली. या प्रणालीअंतर्गत, व्यापार किंवा हज यात्रेसाठी जाणाऱ्या जहाजांना पोर्तुगीजांकडून परवानगी (कार्टाज) विकत घ्यावी लागत असे, जी एक प्रकारची कर किंवा संरक्षण शुल्क होती. या परवानगीशिवाय जहाजे पकडली जात किंवा लुटली जात असत.
मुघल साम्राज्याच्या जहाजांनाही ही प्रणाली लागू होती. अकबर, जहांगीर, शाहजहान यांसारखे मुघल बादशहा आणि त्यांचे जहाज मालक (उदा. जहांगीरची आई मरियम-उझ-झमानी) यांना त्यांच्या व्यापारी किंवा हज जहाजांसाठी कार्टाज विकत घ्यावे लागत असे. हे शुल्क नाममात्र असले तरी, जहाजांना पोर्तुगीज बंदरांवर (जसे गोवा, मलाक्का, ओरमुझ) जाऊन अतिरिक्त कर भरावा लागत असे. काही वस्तू (जसे मिरची, घोडे, मीठ, सल्फर) पोर्तुगीजांच्या एकाधिकारात होत्या, आणि त्यांचा व्यापार इतरांना बंद होता.
शिवाजी महाराजांचं मुख्य उद्दिष्ट कोकण किनारपट्टीवर स्वराज्याचे सागरी वर्चस्व प्रस्थापित करणे
इंग्रज, पोर्तुगीज,फ्रेंच डच सिद्दी यांच्यावर नजर ठेवणे नौदल शक्तींना रोखणे
मराठा आरमारासाठी जयगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग कुलाबाकिल्ला येथे मुख्य नौदल तळ उभारण्यास सुरवात करून नवीन जलदुर्गाची निर्मिती करण्यास सुरुवात केली.
मराठ्यांच्या आरमारी कुलाबा खडकळाल बेटावरील चौकीवर
शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये या किल्ल्याच्या बांधकामाचे नियोजन केले आणि प्रत्यक्षात १६८० च्या सुमारास याचे बरसे मुख्य काम काम पूर्ण झाले.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर (३ एप्रिल १६८०) त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी जून १६८१ मध्ये उर्वरित कुलाबा किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. हा किल्ला मराठा नौदलाचा प्रमुख तळ म्हणून विकसित झाला आणि दार्या सारंग मैनक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश जहाजांवर हल्ले करण्यासाठी वापरला गेला
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात, १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे यांची मराठा आरमाराचे 'सरखेल' (प्रमुख) म्हणून नियुक्ती झाली कान्होजी आंग्रे यांनी कुलाबा किल्ल्याला आपले मुख्य केंद्र आणि आरमाराचे मुख्यालय बनवल आणि बलाढ्य युरोपियन आरमारवर त्यांची दहशत बसायला लागली. आता मराठा आरमाराची ताकद एवढी वाढली होती की आता युरोपियन जाहाजाना मराठ्यांच्या परवानगी आणि कर दिल्याशिवाय शिवाय समुद्रात जहाज हाकता येत नव्हते होते.
कानोजी आंग्रे यांना समुद्रातील शिवाजी म्हणून ओळखू लागले होते हे तसा उल्लेख करू लागले होते. आतापर्यंत आपल्या समुद्रात फिरण्यासाठी सातासमुद्रा पलीकडून आलेल्या पोर्तुगीजाना आपण कर देतो होतो आणि ते आता आपल्यालच देशात आपल्या समुद्रकिनारी तटावर कर घेतो म्हूणन आंग्र्यांना चाचे ( लुटारू) म्हणत होते. हे अजब दोगला पन है भाई!
कान्होजी आंग्रे यांचा पराक्रम: कान्होजींनी या किल्ल्यावरून ब्रिटिश, पोर्तुगीज आणि इतर युरोपियन जहाजांवर अनेक हल्ले केले. सर्वात मोठा पराक्रम १७ नोव्हेंबर १७२१ मध्ये दिसला, जेव्हा ब्रिटिश आणि पोर्तुगीजांच्या संयुक्त फौजांनी (६,००० पोर्तुगीज सैनिक आणि ३ ब्रिटिश जहाजे) किल्ल्यावर हल्ला केला.
कमोडोर मॅथ्यूजच्या नेतृत्वाखालील हा हल्ला पूर्णपणे अयशस्वी झाला, आणि मराठ्यांनी किल्ल्याचे यशस्वी रक्षण केले. ब्रिटिशांनी पोर्तुगीजांना दोष दिला. कान्होजींच्या नेतृत्वात हा किल्ला मराठा नौदलाची ताकद बनला. त्यांचा मृत्यू ४ जुलै १७२९ रोजी याच किल्ल्यावर झाला.
त्यांच्या मुलाचा पराक्रम (सेकोजी/मनाजी/तुलाजी आंग्रे):
कान्होजींचे पुत्र सेकोजी आंग्रे (१७२९-१७३३) यांनी वडिलांच्या निधनानंतर किल्ल्याचे नेतृत्व केले आणि मराठा नौदलाची परंपरा चालू ठेवली, पण कुलाबावर विशिष्ट युद्धाचा उल्लेख नाही.
नंतर आंग्रे घराण्यात विभागणी झाली: मनाजी आंग्रे यांनी कुलाबा किल्ल्याचे नियंत्रण घेतले (१७३३ पासून), तर तुलाजी आंग्रे विजयदुर्गावर आधारित होते. मनाजींनी पेशव्यांच्या मदतीने कुलाबाचे रक्षण केले आणि ब्रिटिशांशी संबंध राखले. १७४० मध्ये पेशवा बालाजी बाजीराव यांनी मनाजींना मदत करून किल्ला सुरक्षित केला.
तुलाजी आंग्रे यांचा पराक्रम: तुलाजींनी विजयदुर्गावरून ब्रिटिश जहाजे काबीज केली (उदा. चार्लोट जहाज), पण कुलाबाशी त्यांचा थेट संबंध नव्हता. १७५५-५६ मध्ये पेशवा आणि ब्रिटिशांनी तुलाजींवर हल्ला करून विजयदुर्ग जिंकला आणि त्यांना कैद केले. कुलाबा मात्र मनाजींच्या वंशजांकडे राहिला.
इंग्रजांच्या ताब्यात कधी आणि कसा गेला:
आंग्रे घराणे कुलाबा राज्याचे (कोलाबा स्टेट) शासक होते आणि १९ व्या शतकात ब्रिटिशांचे मांडलिक बनले. १८४० मध्ये मनाजी आंग्रे यांच्या वंशातील शेवटचा वारसदार (रघोजी आंग्रे III) वारस नसल्याने मरण पावला, त्यामुळे ब्रिटिशांनी 'डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स' सारख्या धोरणाने राज्य जप्त केले. १८४२ मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्यातील लाकडी संरचना विकल्या आणि दगड अलिबागच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरले. १८४३ पर्यंत पूर्णपणे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. त्यानंतर तो कोलाबा एजन्सीचा भाग बनला.
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याची बांधणी व रचना
किल्ला मोठ्या दगडी चिर्यांपासून बांधलेला असून दगडांमध्ये चुना न वापरता रचना केलेली आहे.समुद्राच्या लाटा भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांतील फटीत शिरून लाटांचा तडाखा कमी होतो – ही अत्यंत शास्त्रीय व दुर्गबांधणीतील वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे.
🔹 मुख्य प्रवेशद्वार,महादरवाजा
दरवाजा पूर्व ताटबंदित आहे प्रवेशद्वारा संरक्षणासाठी दुसरे प्रवेशद्वार होते; सध्या त्याचे अवशेष दिसतात.डाव्या बाजूच्या बुरुजावर तोफा व ध्वजस्तंभ आहे.
किल्ल्याच्या दक्षिण टोकाला असलेला हा दरवाजा धाकटा / दर्या / यशवंत दरवाजा आहे
🔹 बुरुज व तटबंदी
किल्ल्याला एकूण १७ बुरुज आहेत
चारही कोपऱ्यांवर ४पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३, दक्षिणेला १
बुरुजांची नावे : पिंजरा, नगारखाना, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखाना, दारुखाना
तटबंदीत खोल्या, शौचकूप, जिने, फांजी (तटावरील मार्ग) आढळतात.
🔹 मंदिर समूह
प्रवेशानंतर डावीकडे भवानी मातेचे मंदिर
समोर पद्मावती देवीचे व गुलवती देवीचे (महिषासूरमर्दिनी) छोटे मंदिर, राघोजी आंग्रे यांनी बांधलेले सिद्धिविनायक मंदिर
मंदिर परिसरात मारुती व शंकर मंदिर, कोरीव तुळशी वृंदावने
समोर गोड्या पाण्याची पुष्कर्णी
🔹 वाडे, पागा व घुमट
डाव्या बाजूला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष आहेत
आंग्रे घराण्याच्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.
🔹 समाध्या व धार्मिक स्थळे
तटबंदी जवळ पावल कोरलेली समाधी
पुढे दोन तुळशी वृंदावने (समाध्या)
दक्षिणेकडील दरवाजाजवळ
कान्होजी आंग्रे यांची घुमटी
🔹 हनुमान मंदिर व गोदी
दर्या दरवाजाबाहेर हनुमान मंदिर
पुढे गोदी (जहाज बांधणी व दुरुस्ती केंद्र)
– येथे नवीन जहाजे बांधली जात व जुनी दुरुस्त केली जात.
🔹 तोफा व ब्रिटिश काळातील अवशेष
बुरुजावर लाकडी गाड्यावर बसवलेल्या २ तोफा
तोफांवर कोरलेला मजकूर :
कुलाबा किल्ल्यावर जाण्याचे मार्ग
समुद्रमार्गे (सर्वात जलद): गेटवे ऑफ इंडिया किंवा 'भाऊचा धक्का' (M2M Ferries) येथून मांडवासाठी आणी रेवस साठी बोट/ फेरी मिळते. मांडवा - रेवस. वरुन बस किंवा रिक्षानी तुम्ही अलिबागला येऊ शकता. अलिबाग बीच ते मांडावा जेट्टी 21किमी,अलिबाग ते रेवस जेट्टी 25 किमी.
रस्तेमार्गे: मुंबई-गोवा हायवेवरून पेणमार्गे अलिबागला साधारण ३-४ तासांत पोहोचता येते. जवळच रेल्वे स्टेशन पनवेल
अलिबाग किनाऱ्यावरून किल्ल्यापर्यंत:
ओहोटी (Low Tide) असेल तर तुम्ही चालत किंवा घोडागाडीने किल्ल्यापर्यंत जाऊ शकता.
३. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आणि नियम:
वेळ: सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:३० (किल्ल्याची वेळ).
भरती-ओहोटीचे महत्त्व (अतिशय महत्त्वाचे): कुलाबा किल्ल्याला भेट देण्यापूर्वी भरती-ओहोटीच्या वेळा (Tide Timings) तपासणे अनिवार्य आहे. भरती असताना पाणी जास्त असल्याने किल्ल्याकडे जाता येत नाही. फक्त ओहोटीच्या वेळीच रस्ता उघडा होतो.
सीझन: पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) समुद्रात जाणे धोकादायक असल्याने पर्यटकांसाठी किल्ला अनेकदा बंद असतो. ऑक्टोबर ते मार्च हा काळ पर्यटनासाठी सर्वोत्तम
Comments
Post a Comment