LATEST BLOGS

श्रद्धास्थान: सफाळेचे प्राचीन 'मेघराज मंदिर'

श्रद्धास्थान: सफाळेचे प्राचीन 'मेघराज मंदिर'
​जून महिना अर्धा उलटला, तरी पावसाचा कुठे पत्ताच नव्हता. आम्ही नेहमीप्रमाणे कट्ट्यावर बसलो होतो. तेव्हा प्रथमेश म्हणाला, "रविवारी माझी नाईट शिफ्ट आहे, पण सकाळी कुठे तरी जाऊन येऊया. फार कंटाळा आलाय." बऱ्याच विचारमंथनानंतर आम्ही सफाळे जवळील टेकडीवर असलेल्या 'मेघराज मंदिरा'ला भेट द्यायचे ठरवले.
​दुसऱ्या दिवशी विलासचा फोन आला, "अरे मला संडेला सुट्टी आहे, आपण मस्त फुल डे ट्रिप करूया." मी त्याला सांगितले की प्रथमेशला नाईट शिफ्ट असल्यामुळे आपल्याला दुपारीच निघावे लागेल. अखेर रविवारी दुपारी जाण्याचे निश्चित झाले. आता एका अ‍ॅक्टिव्हावर तिघांना जाणे शक्य नव्हते, त्यामुळे गाडीचा प्रश्न निर्माण झाला. आम्ही लतेशला विचारले, पण वेळेअभावी त्याने नकार दिला. त्यामुळे सफाळेचा बेत रद्द करून मुंबईतच कुठे तरी फिरूया, असे मत बनले.
​अनपेक्षित सुरुवात आणि रो-रो बोटीची हुलकावणी
​रविवार उजाडला, पण प्रथमेश रात्रपाळीमुळे इतका थकला होता की तो दुपारी उठूच शकला नाही. आम्ही अडीच वाजेपर्यंत त्याची वाट पाहिली. शेवटी मी आणि विलासने ठरवले, 'चल, आपणच दोघे जाऊया.' गाडी काढली, पेट्रोल पंपवर टाकी फुल केली आणि दुपारी तीनच्या सुमारास आम्ही हायवेच्या दिशेने निघालो. कुठे जायचे हे अजूनही निश्चित नव्हते, पण वेळ निघून चालली होती. अखेर आम्ही ठरवले की, कमी वेळ असला तरी आधी ठरलेल्या सफाळ्याच्या 'मेघराज मंदिरा'चाच प्रयत्न करायचा. जून महिन्यात पाऊस नसेल तर सूर्य मावळायला सात-पावणेसात होतात, हा उशिरा होणारा सूर्यास्त आमच्यासाठी जमेची बाजू होती.
​दीड तासाच्या प्रवासाअंती आम्ही विरारवरून सफाळ्याला जाणाऱ्या मारंबळपाडा जेट्टीवर पोहोचलो, ज्याला स्थानिक लोक 'नारंगी/नरिंगी जेट्टी' म्हणतात. घड्याळात बरोबर साडेचार वाजले होते. पण आमचे दुर्दैव असे की, नेमके त्याच वेळी 'रो-रो बोटीचे' दरवाजे बंद होत होते. त्यांनी आम्हाला बोटीत घेतले नाही. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यासारखे आम्ही फक्त बघत राहिलो; कारण आमच्या हातात काहीच नव्हते. आता पाऊण तास वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते, कारण दुसरी बोट सव्वापाच वाजता येणार होती.
​जलसार गावाकडे प्रवास आणि रस्ता शोधण्याची धडपड
​आम्ही जेट्टीवर पुढील बोटीची वाट पाहत बसलो. समोरच जलसार जेट्टी दिसत होती आणि त्या गावातील तो डोंगर, ज्याच्या शिखरावर आमचे टार्गेट म्हणजेच 'मेघराज मंदिर' दिमाखात उभे होते. सव्वापाच वाजता रो-रो बोट आली. लोकांनी पटापट आपापल्या गाड्या बोटीत भरल्या आणि जलसार जेट्टीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. अखेर आमचा जीव भांड्यात पडला. अवघ्या १५ मिनिटांच्या प्रवासानंतर, ५:३५ वाजता आम्ही जलसार जेट्टीवर उतरलो.
​गाडी बोटीतून बाहेर काढून आम्ही जलसार गावाच्या दिशेने निघालो. जेट्टीपासून मंदिराची पायवाट साधारण साडेचार किलोमीटर अंतरावर आहे. जलसार जेट्टीवरून सफाळ्याला जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून २.९ किमी अंतरावर गावात जाणारा एक फाटा आहे, तिथून पुढे दीड किलोमीटरवर मेघराज मंदिराच्या डोंगराचा पायथा लागतो.
​गावात रस्त्याची चौकशी करत आम्ही पुढे चाललो होतो. वाटेत एका छोट्या दुकानापाशी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची चौकशी केली, पण तिथे बिस्किट आणि कुरकुरेशिवाय काहीच नव्हते. दुकानदाराने आम्हाला घरातून पाणी भरून देण्याची तयारी दर्शवली. मग आम्ही आमच्या जवळील बाटलीतील पाणी पिऊन ती खाली केली आणि त्यांच्याकडून ताजे पाणी भरून घेतले. सोबतच जलसार मंदिराविषयी चौकशी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गावात राहणारे अनेक लोक कधी मंदिरात गेलेच नव्हते, आणि जे गेले होते ते कित्येक वर्षांपूर्वी किंवा लहानपणी गेले होते. दुकानातून खाण्यासाठी बिस्किटांचे पुडे घेतले आणि पुढे निघालो. एका ठिकाणी विचारले असता त्यांनी सांगितले, "पुढे बुलेट ट्रेनच्या टनेलचा (बोगद्याचा) रस्ता तयार होत आहे, तो ओलांडून पुढे जा."
​टनेलचा रस्ता पार केल्यानंतर एक छोटी टपरी दिसली, तिथे पुन्हा वाटेची चौकशी केली. टपरीच्या मालकिणीने सांगितले की, टपरीसमोरील कच्च्या रस्त्यावरून गेल्यास पायथ्यापर्यंत अ‍ॅक्टिव्हा सहज जाईल. आम्ही त्या खडबडीत रस्त्यावरून गाडी पुढे नेली. एका ठिकाणी बांधकामाच्या खडीचा मोठा ढीग दिसला. आम्ही तिथे गाडी उभी केली आणि रस्ता शोधू लागलो. खडीच्या ढिगाऱ्याजवळून डोंगराच्या दिशेने दगडी पायऱ्यांचे काम सुरू असलेले दिसले; ती खडी त्याच कामासाठी आणली होती. डोंगराच्या दिशेने १००-२०० मीटरपर्यंत अर्धवट पायऱ्यांचे बांधकाम झाले होते. भविष्यात ही पायऱ्यांची वाट थेट मेघराज मंदिराकडे जाणार हे निश्चित होते.
​डोंगराची चढण: तीन तीव्र टप्पे
​आम्ही अ‍ॅक्टिव्हा तिथेच पार्क केली आणि बांधत असलेल्या पायऱ्यांच्या दिशेने चालू लागलो. डोंगर चढायला बरोबर संध्याकाळी ५:५० वाजता सुरुवात केली. पायऱ्यांचे बांधकाम संपताच कच्ची पायवाट सुरू झाली. डोंगराच्या शिखराकडे जाणारी ही वाट धरून आमची चढण सुरू झाली. पायथ्यापासून वर पाहताना आमचे लक्ष्य असलेले छोटेसे मेघराज मंदिर आम्हांला खुणावत होते.
​ही पायवाट अतिशय तीव्र चढणीची आणि सुक्या मातीमुळे निसरडी होती. तरीही १० मिनिटांत आम्ही बुलेट ट्रेन टनेलच्या माथ्यावर पोहोचलो. हा डोंगराचा पहिला टप्पा होता. येथून पुन्हा दुसरी तीव्र चढणीची वाट सुरू झाली. हा टप्पा खूप घसरणीचा आणि उताराचा असल्यामुळे, चढणाऱ्यांच्या आधारासाठी तिथे एक लोखंडी वायर (तार) टाकलेली दिसली. हा दुसरा टप्पाही आम्ही १० मिनिटांत पार केला. तिसरा टप्पा लहान होता, पण पहिल्या दोन्ही टप्प्यांपेक्षा जास्त खड्या चढणीचा होता.
​इथून मंदिर नजरेच्या टप्प्यात आल्यावर पुढील प्रवास व्यवस्थित पूर्ण होणार याची खात्री पटली. विलास वर येईपर्यंत मी त्याची वाट पाहिली आणि तो आल्यावर तिसरा टप्पा पार करून आम्ही डोंगराच्या शिखरावरील मंदिरापाशी पोहोचलो. शिखरावर आम्ही बरोबर ६:२० वाजता पोहोचलो. पायथ्यापासून शिखर गाठायला २५ ते ३० मिनिटे लागतात. हा डोंगर साधारण तीन तीव्र, निसरड्या आणि दमछाक करणाऱ्या टप्प्यांमध्ये चढावा लागतो.
​मेघराज मंदिराचा इतिहास आणि वैशिष्ट्ये
​सूर्यास्त सात ते साडेसातच्या दरम्यान होणार असल्यामुळे आमच्याकडे पाऊण ते एक तास हाताशी होता. आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो. हे मंदिर संपूर्णपणे दगड आणि चुन्याचा वापर करून बांधलेले आहे. मंदिरामध्ये 'मेघराज देव' आणि 'इंद्रदेव' अशा दोन मूर्ती लाकडावर कोरलेल्या आहेत. मंदिर छोटे असून, उंच आणि निर्जन टेकडीवर असल्याने जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून मंदिराला लोखंडी ग्रीलचा दरवाजा लावण्यात आला आहे. 'दरवाजाची कडी उघडून मंदिरात प्रवेश करावा आणि आत जाताच दरवाजा बंद करावा' अशी तिथे व्यवस्था आहे. आम्ही कडी उघडून आत प्रवेश केला.
​दोन्ही मूर्ती पालघरमधील खास आदिवासी शैलीत लाकडात कोरलेल्या आहेत. भारतीय हिंदू मान्यतेनुसार, मेघ (पर्जन्य/पाऊस) नियंत्रित करणारा देव म्हणजे देवांचा राजा इंद्र. येथे इंद्रदेवाची मूर्ती सात सोंडींच्या ऐरावतावर, अंबारीत मांडी घालून बसलेल्या अवस्थेत कोरलेली आहे. ऐरावत अतिशय डौलदार दिसतो. मूर्तीच्या बाजूला कमानी असून त्यावर सूर्य-चंद्र आणि वरच्या भागात फुले कोरली आहेत. पाऊस पाडणारा मेघ त्यांचा राजा म्हणून 'मेघराज देव' एका उमद्या घोड्यावर स्वार झालेले दिसतात आणि त्यांच्या डोक्यावर छत्र आहे. या मूर्तीच्या कमानीवरही फुले कोरलेली आहेत.
​हे देवस्थान अतिशय प्राचीन आहे. स्थानिक शेतकरी आणि आदिवासींचे जीवन संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने त्यांच्यासाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे; म्हणूनच पालघर परिसरात मेघराज आणि इंद्र देवतेची पूजा केली जाते. विशेष म्हणजे, मेघराज आणि इंद्र देवतेची मंदिरे महाराष्ट्रात इतर कुठेही सहसा आढळत नाहीत. देशभरात एखादे दुसरे इंद्रदेवाचे मंदिर असू शकते, पण पालघरमध्ये या जलसार गावाव्यतिरिक्त 'चाहाड' गावात एक मेघराज मंदिर आहे, तसेच पावसाला समर्पित असलेले काळदुर्ग गडावर 'मेघोबा' नावाचे मंदिर आहे (जे सध्या भग्न अवस्थेत आहे). स्थानिक लोककथांनुसार, उत्तर कोकणात जेव्हा मान्सूनचा पाऊस येतो, तेव्हा तो सर्वप्रथम काळदुर्ग गडावरील मेघोबाच्या स्थानावर पडतो. गेल्या वर्षी मी काळदुर्गला गेलो होतो, पण दाट धुक्यामुळे वाट सापडली नाही आणि दर्शन राहिले होते, याची आठवण झाली.
​स्थानिक लोक या मंदिराचा इतिहास ५०० वर्षे जुना असल्याचे सांगतात, पण मला तिथे तेवढे जुने बांधकाम दिसले नाही. मेघराज देवाचे श्रद्धास्थान जुने असले, तरी येथील मंदिराची शैली घुमटाकार आहे. वसईच्या मोहिमेनंतर येथे मराठ्यांचे राज्य आल्यामुळे, उत्तर-पेशवाईच्या काळात या छोट्या मंदिराचे बांधकाम झाले असावे, असा अंदाज बांधता येतो.
​श्रद्धा, दंतकथा आणि बुलेट ट्रेनचे संकट
​मंदिरात दर्शन घेऊन आम्ही बाहेरचा परिसर पाहू लागलो. मेघराजाच्या कृपेने आकाशात काळे ढग जमा झाले होते. पावसाने हलकेसे शितोडे मारले; याला मेघराजाचा प्रसाद समजावा की कोरड्या जूननंतर चांगला पाऊस पडेल याचे आश्वासन, देव जाणे! पण यामुळे आमची वारी सार्थकी लागल्यासारखे वाटले.
​या देवस्थानाबद्दल लोकांची मोठी श्रद्धा आहे. दरवर्षी जून महिन्यात चांगला पाऊस पडावा म्हणून येथे होम-हवन आणि पूजा केली जाते. एका आख्यायिकेनुसार, जलसार हे वरुण देवाच्या (पावसाच्या देवाच्या) मामाचे गाव आहे आणि वरुण देव दरवर्षी येथे भेट देतात. डोंगरावरील कुंड पाण्याने पूर्ण भरल्यानंतर, अवघ्या तीन दिवसांत मान्सूनला सुरुवात होते, असा स्थानिकांचा ठाम विश्वास आहे. हे कुंड म्हणजेच मंदिराच्या जवळ दोन दगडांच्या मध्ये खोलवर असलेला एक बोगदा आहे, ज्यामध्ये बारमाही पिण्याचे पाणी असते. याला स्थानिक लोक पवित्र जल मानतात आणि जेट्टीवरील सहप्रवाशाने आम्हाला तिथून पाणी घेऊन येण्यास सांगितले होते. मी ते ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला, पण कपाटीत (खडकांच्या फटीत) असल्यामुळे मला ते सापडले नाही. स्थानिकांच्या मार्गदर्शनाशिवाय ते शोधणे खरोखरच कठीण आहे.
​डोंगरावरील या मंदिरात येण्यासाठी विराथन बुद्रुक, टेंभीखोडावे, जलसार आणि किरईपाडा अशा विविध मार्गांनी डोंगराळ पायवाटा आहेत. २०१५-१६ मध्ये या मंदिराला पर्यटन व तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. मात्र, ग्रामस्थ आणि वन खाते यांच्यातील वादामुळे पायऱ्यांच्या कामाला विलंब होत आहे.
​दुसरीकडे, मेघराज मंदिर असलेल्या या डोंगराच्या अगदी खालून 'बुलेट ट्रेन'च्या बोगद्याचे (Tunnel) काम सुरू आहे. मुंबईहून सुटणारी बुलेट ट्रेन थेट या मंदिराच्या खालून जाणार आहे. या बोगद्याच्या कामामुळे गावातील घरांना तडे गेल्याच्या बातम्या आम्ही टीव्हीवर पाहिल्या होत्या. बोगद्याच्या कामामुळे त्यांच्या श्रद्धास्थानाला म्हणजेच मंदिराला क्षती पोहचत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
​माथ्यावरील शांतता आणि निसर्गरम्य सूर्यास्त
​सध्या मंदिराच्या डोंगरमाथ्यावर आणि परिसरात आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हते. पर्यटन दर्जा मिळाल्यानंतर आजूबाजूच्या गावातील भाविक किंवा काही मोजके ट्रेकर्सच इथे येतात. डोंगर लहान असला तरी चढण खडी आणि निसरडी असल्यामुळे इथे येणाऱ्यांची संख्या कमी आहे.
​पण ही शांतता काही दिवसांत हरवून जाईल, अशी भीती वाटते. इथे पायऱ्यांचे काम पूर्ण झाल्यावर हौशे, नवशे, गवशे पर्यटकांची गर्दी वाढेल. गेल्या वर्षी सुरू झालेली विरार आणि सफाळ्याला जोडणारी 'रो-रो सेवा' या पर्यटन वाढीला कारणीभूत ठरेल. लोक आता सुट्ट्यांच्या दिवशी गाड्या बोटीत टाकून सफाळ्याच्या परिसरात मोठ्या संख्येने येत आहेत. जसे पर्यटक विरारच्या जीवदानी देवीला येतात, तसेच ते या मंदिरातही येतील. मंदिराचा माथा छोटा असल्याने सुट्ट्यांच्या दिवशी इथे प्रचंड ताण येऊ शकतो; कारण रो-रोमधून उतरल्यावर अवघ्या ५ किमीवर मंदिराचा पायथा सुरू होतो. म्हणूनच, हे ठिकाण व्यावसायिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यापूर्वीच ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींनी इथे भेट देऊन ही शांतता आणि सूर्यास्त अनुभवला पाहिजे.
​मंदिराचा माथा लहान असल्याने परिसर फिरण्यासाठी १० ते १५ मिनिटे पुरेशी आहेत. पण मला तिथली शांतता आणि समुद्रात होणारा सूर्यास्त अनुभवायचा होता, म्हणून आम्ही आणखी पाऊण तास थांबण्याचा निर्णय घेतला.
​माथ्यावरून आजूबाजूचा नजराणा पाहताना, दक्षिण दिशेला जीवदानी देवीचा डोंगर आणि पायथ्याशी वसलेले विरार शहर दिसते. वैतरणा नदीच्या मुखाशी असलेले 'झाऊ बेट' आणि खाडीतील कांदळवनाच्या (Mangroves) बेटांचे विहंगम दृश्य इथून मनाला भुरळ पाडते. वैतरणा नदीच्या एका तीरावर आधुनिक शहर आणि दुसऱ्या तीरावर शांत ग्रामीण भाग एकाच वेळी पाहता येतो. उत्तरेला सफाळे परिसरातील टूमदार गावे आणि उत्तर-दक्षिण डोंगराला छेदून जाणारे बुलेट ट्रेनचे काम दिसते. हा डोंगरमाथा जर थोडा मोठा आणि प्रशस्त असता, तर मोक्याची जागा म्हणून जीवदानी गडासारखी इथेही एखाद्या किल्ल्याची निर्मिती झाली असती, हे निश्चित!
​पश्चिम बाजूला अथांग पसरलेला सिंधूसागर (अरबी समुद्र) आणि त्यात मावळणाऱ्या सूर्याचे ते मनोहरी दृश्य पाहणे हा एक अद्भूत अनुभव होता. केवळ हा सूर्यास्त पाहण्यासाठीच इथे खास वेळ काढून यावे. क्षितिजावर ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदेवाचा ढगांमागे लपाछपीचा खेळ सुरू होता. सूर्य पूर्णपणे क्षितिजाच्या आड जाईपर्यंत आम्ही तिथेच थांबलो होतो. ढगांमध्ये बदलणारे रंग आणि त्याचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब पाहून मन प्रसन्न झाले.
​सूर्यास्त पाहून झाल्यावर आम्ही डोंगर उतरू लागलो. समोर जीवदानी डोंगर आणि विरार शहरातील चमचमणारे दिवे दिसत होते. डोंगर पायउतार होऊन आम्ही घराच्या दिशेने, म्हणजेच मुंबईला जाण्यासाठी जलसार जेट्टीकडे निघालो. एक अनियोजित पण अत्यंत तृप्त करणारी सफर अशी आमच्या मनावर कोरली गेली.

Comments

Popular posts from this blog

मुंबईतील दुर्लक्षित आदिवासी आणि त्यांची समृद्ध वारली चित्रकला परंपरा

देवदार गुहा आणि मंदाकिनी डोंगर | Devdar Caves and Mandakini Hill | भ्रमर

सहकुटुंब भटकंती आनंददायी करणारा छोटेखाणी भिवगड | भ्रमर