गणपतीगडद: कातळात कोरलेलं प्राचीन लेणंसंकुल
गणपतीगडद: कातळात कोरलेलं प्राचीन लेणंसंकुल
ऑगस्टचा पहिला आठवडा... आणि गणपतीगडदच्या मोहिमेवर निघायचा बेत अखेर ठरला! पण हा योग जुळून यायला वर्षानुवर्षांचा काळ जावा लागला होता. दरवेळी काही ना काही विघ्न यायचं आणि ठरवलेला बेत आयत्या वेळी उधळून लावायचा. नशिबाचा हा खेळ इतका अजब होता की, दर खेपेला कुठली तरी नवीच अडचण समोर ठाकायची. याही वेळी तीच पुनरावृत्ती झाली. दोन-दोन आठवडे पूर्ण तयारी करून बॅग पॅक करून ठेवली, आणि बरोबर निघण्याच्याच क्षणी रवी अचानक आजारी पडला! तोवर झालेला सगळा उत्साह क्षणात मातीमोला झाला आणि पुन्हा एकदा मोहिमेवर विरजण पडलं.
पण या शनिवारी आम्ही निश्चय पक्का केला—काहीही होवो, या रविवारी गणपतीगडद गाठायचाच! लतेश तात्काळ तयार झाला, आणि आम्ही ट्रेकची अंतिम आखणी करून ग्रुपवर मेसेज टाकला. तितक्यात एक अनपेक्षित वळण आलं—रवीचा मेसेज धडकला, "मी येतोय!"
खरं तर मला कसलीच अपेक्षा नव्हती. लागोपाठ दर रविवारी त्याचे बाहेर दौरे चालू असल्याने त्याला या प्रवासाची साथ देणं जमेल की नाही, याबद्दल मनात शंका होती. पण त्याचा हा मेसेज म्हणजे आमच्यासाठी जणू पर्वणीच ठरली!
रवीच्या येण्याने गणितेच बदलली. एरवी गोरेगाव स्टेशन ते दादर, तिथून ट्रेनने कल्याण, मग मुरबाड, पुढचा टप्पा धसई आणि अखेर सोनावळे... असा तब्बल सहा टप्प्यांचा खडतर प्रवास! वारंवार वाहने बदलण्याची आणि वेळ घालवण्याची जी मोठी कसरत करावी लागणार होती, ती एका झटक्यात टळली.
सकाळी सव्वापाच-साडेपाचचा सुमार. धुक्याची अस्पष्ट झालर पांघरलेल्या शांततेत मी आणि लतेश रवीच्या इमारतीखाली पोहोचलो. तिथे त्याचा 'शुभ्र-धवल रथ' (गाडी) आमचीच वाट पाहत सज्ज उभा होता. आणि मग... सर्व अडथळ्यांची शृंखला मोडून काढत, आम्हा तिघांची स्वारी गोरेगावच्या वेशीवरून थेट गणपतीगडदच्या दिशेने सुसाट वेगाने निघाली!
कल्याण-मुरबाड महामार्गावरून प्रवास करत आम्ही मुरबाडच्या वेशीवर येऊन पोहोचलो. मनात एक विचार डोकावला—मुरबाडवरून मुख्य रस्ता सोडून सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या आतील शांत व निसर्गरम्य धसईच्या मार्गाने जावं. पण पावसाचा जोर तुफान होता आणि त्या ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था नक्की कशी असेल, याचा काहीच अंदाज येत नव्हता. धोके पत्करण्यापेक्षा सुरक्षित मार्ग निवडलेला बरा, हा विचार करून आम्ही कल्याण-अहमदनगर या मुख्य महामार्गानेच पुढे सरकण्याचा निर्णय घेतला.
टोकावडे गावात पोहोचल्यावर एका चांगल्या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो. तिथे पोटपूजा करून पुढील प्रवासासाठी ताकद मिळवली. टोकावडे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर एक फाटा उजवीकडे धसईच्या दिशेने वळतो. तिथून नऊ किलोमीटर अंतरावर सोनावळे गाव आहे. त्याच रस्त्याने पुढे जात आम्ही अखेर सोनावळे गावात पोहोचलो.
सोनावळे गावात शिरताच एका घरासमोर आम्ही चौकशीसाठी गाडी थांबवली. योगायोगाने ते गृहस्थ पर्यटकांच्या जेवणाची आणि वाटाड्याची सोय करणारेच निघाले. त्यांनी आम्हाला पुढची दिशा दाखवत सांगितले, "इथून ही एक वाट गणपतीगडदला जाते, पण तुम्ही पुढच्या वाडीतून जा. आधीच काही गाड्या पुढे गेल्या आहेत, त्यांच्या पाठोपाठ जा... तिथे पार्किंग मिळेल आणि आमचा वाटाड्याही पुढेच आहे, त्यामुळे वाट चुकायची मुळीच शक्यता नाही. माझा नंबर घेऊन जा आणि जेवण पाहिजे असल्यास निघताना फक्त फोन करा."
त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. मध्ये काही ठिकाणी रस्ता खराब होता; एका नाल्यापाशी फोटो काढण्यासाठी गाडी उभी केली. पण काही अंतर चालल्यावर रस्ता पुन्हा चांगला दिसला, म्हणून गाडी पुढे नेली. 'पुढे दोन-तीन गाड्या गेल्या आहेत, तर पार्किंगला जागा भेटेल की नाही?' याच काळजीपोटी आम्ही वाटेत दोन-तीन ठिकाणी गाडी लावायला जागा शोधू लागलो. अखेर एका ठिकाणी सुरक्षित वाटल्याने गाडी पार्क केली आणि तिथूनच पायी चालत वस्तीच्या दिशेने निघालो.
वस्ती ओलांडून पुढे जातो तोच काय... एका मोबाईल टॉवरजवळ भलीमोठी आणि प्रशस्त पार्किंगची जागा समोर दिसली! तिथे आधीच तीन-चार गाड्या ऐटीत उभ्या होत्या. ती हवेशीर आणि ऐसपैस जागा पाहून "उगीचच लांब गाडी पार्क करून उगाच पायपीट करत आलो!" असं वाटून मनातल्या मनात हसू आलं. त्या गाड्यांमधील पर्यटक आधीच गणपतीगडदच्या दिशेने रवाना झाले होते. तिथे गाड्यांमध्ये बसलेल्या ड्रायव्हर्सकडे रस्त्याची खात्री करून आम्ही त्यांनी दाखवलेल्या वाटेने चालू लागलो.
थोडे पुढे चालत गेल्यावर एका ओढ्यापाशी पोहोचलो. तिथून दोन वेगवेगळ्या वाटा फुटत होत्या—एक वाट थेट ओढा ओलांडून पलीकडे जात होती, तर दुसरी ओढ्याच्या कडेने जात होती. तिथे असणारे गेट दाखवत लतेश म्हणाला, "सरळ वाटेनेच जाऊया!" आम्ही सरळ वाट धरून पुढे गेलो खरे, पण पुढे गेल्यावर आधी गेलेल्या ग्रुपच्या पाऊलखुणा कुठेच दिसेनात. वाट चुकल्याचा अंदाज येताच आम्ही पुन्हा माघारी फिरलो आणि ओढ्यापाशी आलो.
यावेळेस आम्ही त्या गेटच्या बाजूने जाणारी वाट पकडली. जवळ गेल्यावर लक्षात आले की ते फार्म हाऊसचे नसून वन खात्याचे (Forest Department) गेट होते! आतून एक छान, प्रशस्त पायवाट थेट गणपतीगडदच्या दिशेने जात होती आणि गेटवर वन खात्याचा माहिती फलक दिमाखात झळकत होता.
गणपतीगडदच्या प्रशस्त पठारावरील वाटेने आम्ही चालत होतो. सह्याद्रीची उत्तुंग शिखरे ढगांमध्ये पार दडून गेली होती, पण त्या उंच कड्यांवरून थेट झेप घेणारे पांढरेशुभ्र जलप्रपात मात्र सर्वत्र लक्ष वेधून घेत होते. त्यातच गणपतीगडदचा तो प्रसिद्ध धबधबा आणि त्याच्या शेजारी असलेल्या प्राचीन लेण्या दुरूनच दर्शन देत होत्या, त्यामुळे आपण अगदी योग्य वाटेवर आहोत याची पूर्ण खात्री झाली.
पठारावरून पुढे जाणारी वाट झाडीजुडपांतून पुढे सरकली आणि समोर एक मोठा ओहळ आडवा आला. तो पाहाताच पाण्यात उतरून मनसोक्त जलक्रीडा करण्याची तीव्र इच्छा झाली, पण "येताना आपण निवांत पाण्यात भिजू, आधी मुख्य धध्येय पूर्ण करू!" असे ठरवून आम्ही तो ओहळ ओलांडला.
ओहळ पार केल्यानंतर एक उभी चढण लागते. ती चढून वर आलो की पुन्हा एक पठारी भाग लागतो आणि तिथून लेण्या अगदी स्पष्ट दिसू लागतात. लेण्या दृष्टिक्षेपात आल्या तरी या घनदाट जंगलवाटेत थोडं सांभाळूनच चालावे लागते, कारण इथे वाट चुकण्याची दाट शक्यता आहे. या वाटेला सरळ रेषेत दुसऱ्या बाजूने दुसरी एक वाट येऊन मिळते. आमच्या आधी गेलेला एक ग्रुप थेट सरळ गेल्यामुळे रस्ता चुकला होता. सरळ न जाता कड्याच्या बाजूने येणाऱ्या वाटेनेच पुढे चालत राहावे लागते.
ही कड्याच्या जवळून जाणारी वाट थेट एका उभ्या चढणीकडे घेऊन जाते. मुसळधार पावसामुळे ही वाट अत्यंत ओलसर आणि निसरडी बनली होती. इथेच खऱ्या अर्थाने नवख्या ट्रेकर्सचा कस लागतो! ही वाट तशी धोकादायक नसली, तरी पाऊस आणि चिखलामुळे निसरडी झाल्याने नक्कीच आव्हानात्मक बनली होती.
वाटेत मुंबईच्या मिठीबाई कॉलेजचा एक मोठा ग्रुप आला असल्यामुळे जरा 'ट्रॅफिक जाम' झाले होते. आम्ही काहींना चढाईसाठी हात देऊन मदत केली आणि लेण्यांच्या दिशेने पुढे सरकू लागलो. अशा अवघड आणि निसरड्या वाटेवरही आमचे फोटो काढणे उत्साहात चालूच होते!
ती उभी चढण संपवून वर आल्यावर एका भल्यामोठ्या कातळ-खडकावरून वाट आडवी जाते आणि थेट लेण्यांमध्ये प्रवेश करते. या कातळावरून पाण्याचा एक लहानसा प्रवाह वाहत होता. तिथे पोहोचताच आम्ही फोटो काढण्यासोबतच त्या छोट्या धबधब्यात भिजायची हौस भागवून घेतली. हा छोटा कातळ रस्ता मात्र जरा जपूनच पार करावा लागतो; कारण वाहते पाणी आणि त्यावर शेवाळ यामुळे वाट निसरडी झाली होती.
ती पार केल्यावर आपण एका लांब आयताकृती लेण्यात पोहोचतो. यात चार कप्पे आहेत, ज्यांना आपण चार स्वतंत्र लेणी-समूह म्हणू शकतो. पहिल्या लेण्याजवळ एका खांबाचा अवशेष दिसतो, ज्यामध्ये एक छिद्र आढळते. या लेण्याजवळून थोडासा अंतर्वक्र चंद्रकोरीकडे झुकलेला कडा, त्यात कोरलेली लेणी, कड्याला लागूनच जाणारी वाट, कड्यावरून लेण्यांवर कोसळणारा धबधबा आणि खालील कोकणाचा हिरवागार निसर्ग पाहता इथे आल्याचा आनंद द्विगुणित होतो.
या चार लेण्यांमध्ये बाकी पाहण्यासारखे फारसे काही नव्हते आणि कॉलेजच्या ग्रुपची तिथे गर्दी जमली होती. त्यामुळे तिथे जास्त वेळ न घालवता आम्ही पुढील लेण्यांच्या दिशेने गेलो. पुढे गेल्यावर कातळाखाली खोदलेले एक आयताकृती पाण्याचे टाके आढळले. बाजूने कडा कोरली होती आणि कड्याजवळचा भाग सपाट करून आडव्या ओळीत चौकोनी सात छिद्रे खोदली होती; त्याकाळी लाकडी वासे टाकून हे टाके झाकले जात असावे. आता मात्र ते कोरडे होते. त्याच्यापुढे कातळात कोरलेले आणखी एक आयताकृती टाके आहे, तेही कोरडेच होते.
त्याला लागूनच एक लेणे आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक छोटा चौथरा असून, काळाच्या ओघात त्याच्या कातळात कोरलेल्या भिंती तुटलेल्या आहेत. त्याच्या बाजूला असलेल्या लेण्याच्या दरवाजाला चौकट खोदलेली असून आत उजव्या आणि डाव्या बाजूस अर्धा फूट उंचीच्या बसण्यासाठी बहुधा पट्टा कोरलेल्या आहेत.
या लेण्याच्या वरती मुख्य प्रशस्त गणपती लेणे आहे. तिथे जाण्यासाठी पुढे पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि पायऱ्यांच्या बाजूलाही काही लेण्या आहेत. गणेश लेण्यात आधीच गर्दी दिसत होती आणि मागे तीस-चाळीस जणांचा ग्रुप येत आहे हे माहीत असल्यामुळे, खालील लेणी नंतर पाहू आणि आधी गणेश लेणे पाहून घेऊ, असे ठरवून आम्ही पायऱ्या चढू लागलो.
पायऱ्या चढून गेल्यावर लेण्यात दगडी चौकट कोरलेले प्रवेशद्वार लागते. चौकटीवर वेलबुट्टी कोरलेली असून चौकटीच्या मधोमध गणेशमूर्ती कोरलेली आहे. याच गणेशमूर्तीमुळे याला 'गणपतीगडद' म्हणतात (गणपती: आराध्य दैवत भगवान गणेश + गडद: बोलीभाषेतील अर्थ डोंगरातील नैसर्गिक गुहा, कपार किंवा भुयार).
खालील लेण्यांवरून शिडी चढून गेल्यावर एक प्रशस्त दुमजली लेणी समूह आढळतो. गणेशद्वारातून प्रवेश करताच अखंड दगडात कोरलेले दोन भव्य खांब दृष्टीस पडतात. हे लेणे आकाराने मोठे आणि सलग आहे. पण माझे लक्ष मुख्यत्वे त्या दोन भव्य खांबांनी वेधून घेतले. खांबांवर नक्षीकाम असून चारही बाजूंना भारवाहक यक्ष आणि यक्षिणी कोरलेले आहेत. खांबांमधील नक्षीकाम आता नष्ट झाले आहे. खांबांच्या पायाशी काही नक्षी आणि मूर्ती आहेत, पण त्या पुसट झाल्या आहेत आणि त्यावर रंग मारल्यामुळे त्या ओळखणे आणखी कठीण जाते. एक उभी स्त्री-मूर्ती (महिषासुरमर्दिनी असावी) आणि एक धनुर्धारी व्यक्ती वरच्या दिशेने बाण मारत असल्याचे शिल्प दिसते. त्या बाणाच्या विरुद्ध दिशेने एक प्राणी पळताना दाखवला आहे आणि खाली एक मनुष्य-शिल्प पडलेले आहे. त्या प्राण्याचे आणि मनुष्याचे डोके मला एकच वाटले.
हा खांब पाहून झाल्यावर मी दुसऱ्या खांबाकडे गेलो. दुसऱ्या खांबाचीही तीच अवस्था होती. तिथे सुखासनात बसलेली एक देवता दाखवली आहे. चारही बाजूंना नक्षी, दोन मनुष्य-आकृत्या आणि वर सोंड वर केलेले हत्ती दिसतात (जे ओळखता येणे कठीण झाले आहे). हे बहुधा 'गजांतलक्ष्मी'चे शिल्प असावे. त्यावर मानवी आकृत्या आणि पुढे कीर्तिमुख शिल्प साकारले आहे.
या खांबावरील यक्ष-शिल्प वेगळे आणि विचार करायला भाग पाडणारे आहे. पहिल्या खांबावरील यक्ष-यक्षिणींना दोन हात होते, तर या खांबावरील यक्षाला चार हात दाखवले आहेत—दोन हात खांब पेलणारे आणि दोन मांडीवर ठेवलेले. यक्षाच्या मिशा दुसऱ्या खांबासारख्याच झुपकेदार कोरलेल्या आहेत. या खांबाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रसिद्ध स्वरूप म्हणजे, इथे यक्ष आपले जननेंद्रिय स्वतःच्या मुखात घेताना दाखवला आहे (Self-fellating figure).
दोन खांबांच्या समोर एक उघडे (ओपन) दालन आहे. त्याच्या बाजूला दोन खांब असून दोन्ही बाजूंना बंदिस्त दरवाजे असलेल्या लेण्या आहेत. ओपन दालनात तीन वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या छोट्या गणेशमूर्ती पूजेसाठी एका ओळीत ठेवल्या आहेत. या मूर्तींचे स्वरूप आणि जागा पाहून त्या कोणीतरी नंतर आणून ठेवल्या असाव्यात असे वाटते. तिथे एक मोठा चौकोन कोरलेला दिसला. पुढे काही लेणे असावे म्हणून पाहायला गेलो, तर आतमध्ये १-२ फूट रुंद आणि ३-४ फूट खोल कातळ खोदलेले आढळले. बहुधा इथे आणखी एखादे लेणे कोरायचे असावे, जे काही कारणास्तव अपूर्ण राहिले असावे.
मधले दालन पाहून बाजूची दालने पाहायला गेलो. डाव्या बाजूच्या लेणी-दालनाजवळ गेलो असता, तिथे प्रवेशद्वारासाठी दगडी चौकट कोरलेली दिसली. दगडी चौकटीवर छोटी गणेशमूर्ती किंवा फुल कोरले असावे जे आता स्पष्ट ओळखता येत नाही; पण उंबरठ्याच्या समोरील दर्शनी भागात दोन्ही बाजूंना शंकरपाळीच्या आकाराची भौमितिक आकृती काढून त्यात फुल कोरले आहे, तर उंबरठ्यावर मोठा सहस्रदल कमल कोरलेला आहे. समोरील भिंत आणि दरवाजा हे एकावर एक भलेमोठे पाषाण रचून बनवले आहेत. एवढ्या मोठ्या आयाताकृती अखंड शिळा आणून बसवणे आणि त्यात पुन्हा दरवाजा खोदणे, हे अत्यंत जिकिरीचे आणि कसलेल्या कारागिरांचेच काम असणार! अचूक मापात खडक खोदून त्यांना योग्य आकार देणे आणि प्रचंड वजनाचे दगड कोणतीही फटी (गॅप) न ठेवता सुबकपणे बसवणे हे साध्या माणसाचे काम नाही.
ते पाहून झाल्यावर आम्ही दुसरे लेणी-दालन पाहायला गेलो. या लेणी-दालनाला भलीमोठी दगडी चौकट कोरलेली असून, बाजूने आयाताकृती पाषाण रचून भिंत बांधून ही लेणी बंदिस्त केली आहे. दरवाजाच्या चौकटीवरच्या पट्टीत एक लहान चौकोनी जागा बनवली आहे; बहुधा इथे गणपती किंवा एखाद्या देवतेची मूर्ती ठेवण्याचे प्रयोजन असावे. उंबरठ्याच्या समोर कमळाच्या पाकळ्यांचा आकार कोरला आहे. उंबरठ्याच्या दर्शनी भागाच्या मधोमध बहुधा कीर्तिमुख असावे, पण ते आता झिजल्यामुळे स्पष्ट दिसत नाही. त्याच्या दोन्ही बाजूंना दोन कमळे कोरलेली आहेत. मी एका सहप्रवाशाला सोबत घेऊन मोबाईलच्या प्रकाशात दालन पाहायला गेलो, असता उजव्या बाजूला खिडकीवजा भिंत कोरलेली दिसली. तिथे जवळ गेलो असता एक चौकोनी, १-२ फूट खोल टाक्यांसारखा कातळ खोदलेला आढळला.
दुसरे दालन पाहून बाहेर आलो. डाव्या बाजूला एक अर्धवट खोदलेला चौकोनी भाग दिसला. लेण्याचा व्हरांडा प्रशस्त आहे. त्यावर खेळासाठीचा पट कोरलेला आहे (असाच पट जवळच असलेल्या गोरखगडावरही कोरलेला आहे). तसेच काही गोल खड्डे कोरलेले दिसतात, जे बहुधा काही कुटण्यासाठी असावेत.
लेणीच्या कड्याच्या बाजूला, द्वाराच्या दोन्ही बाजूंना कमरे एवढे सज्ज कटगडे (कठडे) कातळात तासून काढलेले आहेत. तिथे बसून लेण्यावरून पडणारा जलप्रपात आणि समोरची हिरवीगार दरी पाहणे हा एक नयनरम्य अनुभव असतो.
लेणी पाहून खाली उतरलो. लेण्याच्या दगडी पायऱ्या लागूनच एक छोटे लेणे होते; तिथे बाजूला रॅपलिंगचे साहित्य ठेवले होते आणि कड्यावरून दरीच्या दिशेने रॅपलिंग चालू होते. त्याच्यापुढे आणखी एक छोटे लेणे होते, जे आतून पाहताना अर्धवट खोदलेले दिसत होते. त्याला लागूनच कातळात आयताकृती पाण्याचे टाके कोरलेले होते—ज्याचा अर्धा भाग आत आणि अर्धा भाग उघड्यावर होता. कातळात ओळीने छिद्रे पाडलेली होती, ज्यांत बहुधा लाकडी वासे टाकून ते टाके झाकले जात असावे; आता मात्र ते रिकामे होते. त्यापुढे आणखी दोन अपूर्ण राहिलेली लेणी होती आणि त्यांच्यापुढे एक मोठे, लांबट, बुजलेले पाण्याचे टाके होते. सर्वात शेवटी एक मोठे लेणे होते, ज्याच्या समोरील भिंतीचे कामही अर्धवट राहिले होते.
बाकीच्या लेण्यांमध्ये गर्दी असल्यामुळे आम्ही इथे थोडा वेळ विश्रांती घ्यायचे ठरवले. इथून निसर्गाचे आणि सर्व लेण्यांचे सुंदर दर्शन होत होते. आज 'फ्रेंडशिप डे' आणि 'संकष्टी'च्या दिवशी मित्रांबरोबर श्री गणेशाचे दर्शन होण्याचा एक छान योग आला होता. सोबतीला असणारा रिमझिम पाऊस आमच्या भटकंतीला आणखी समृद्ध करत होता. लेण्यांचे संपूर्ण दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत ओढ्यात पोहण्याचा आनंद घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालो.
लेण्यांचा इतिहास व भौगोलिक आढावा
* भौगोलिक स्थान: हे ठिकाण पुणे आणि ठाणे जिल्ह्यांना विभक्त करणाऱ्या डोंगररांगेवर स्थित आहे. एका बाजूला कोकणातील ठाणे जिल्हा आणि वरच्या बाजूला पुणे जिल्हा (घाटमाथा) लागतो.
* पायथ्याची गावे: सोनावळे आणि पळू ही पायथ्याची गावे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मोडतात.
* प्राचीन व्यापारी मार्ग: प्राचीन काळी 'कल्याण - मुरबाड - वैशाखरे - नाणेघाट' असा मुख्य व्यापारी मार्ग होता. छोट्या गलबतांतून कल्याण बंदरात उतरणारा माल या व्यापारी मार्गाने घाटावरील बाजारपेठांमध्ये जात असे. या मार्गाला सह्याद्री डोंगररांगेतील सोनावळे व पळू या गावांजवळून जोडणाऱ्या घाटवाटा मिळतात. गणपतीगडदच्या वरती 'दुर्ग-ढाकोबा' ही दोन जोड-शिखरे आहेत; ज्यांच्या जवळून घाटवाटा खाली गणपतीगडदच्या पायथ्याच्या गावांत उतरतात.
* घाटवाटा: दुर्ग आणि ढाकोबा यांच्यामधील दरीमध्ये गणपतीगडद वसलेले आहे. ढाकोबावरून 'दऱ्या (आंबोली) घाटवाट' पळूमध्ये उतरते; तर दुर्गवरून अत्यंत दुर्गम व निर्जन असणारी 'खुटेदार घाटवाट' रामपूर गावात उतरते. (१२ वर्षांपूर्वी मी ही वाट केली होती). ढकोबाबरोबर दोन तासांचे अतिरिक्त नियोजन करून गणपतीगडदची जोड-भटकंती करता येते.
* मार्ग: कल्याणहून मुरबाडमार्गे आतील रस्त्याने धसईवरून येता येते. कल्याण किंवा माळशेजवरून राष्ट्रीय महामार्गाने येत असल्यास टोकावडेवरून सोनावळे गाठता येते.
जवळील विविध ठिकाणांवरून गणपती गडद अंतर
कल्याण ते गणपती गडद:
अंतर: सुमारे ६५ किमी (वेळ: १ तास ५५ मिनिटे)
मुरबाड ते गणपती गडद:
अंतर: सुमारे ४२ किमी (वेळ: १ तास)
माळशेज घाट ते गणपती गडद:
अंतर: सुमारे ३६.५ किमी (वेळ: ५५ मिनिटे)
टोकावडे ते गणपती गडद:
अंतर: सुमारे १०.५ किमी (वेळ: २० मिनिटे)
धसई ते गणपती गडद:
अंतर: सुमारे ८ किमी (वेळ: १८ मिनिटे)
* महत्त्वाच्या टीपा:
* गणपतीगडदची वाट सोपी असली तरी पावसाळ्यात मध्यम स्वरूपाची होते. सोबत पिण्याचे पाणी नक्की बाळगावे, कारण भर पावसातही येथील पाण्याची टाकी कोरडी असतात.
* गावात आधी कल्पना दिल्यास नाश्ता व जेवणाची सोय होऊ शकते.
* स्थानिक वाटाड्या व जेवणाची सोय: पवार (मो. ९३०७०९४४४५)
ऐतिहासिक व वास्तुकलेचे विश्लेषण
ही संपूर्ण लेणी पाहता यात काहीतरी अपूर्णता जाणवते. हाती घेतलेल्या कामाचा आराखडा खूप मोठा दिसतो; परंतु जागेची चुकीची निवड, आर्थिक रसदीचा अभाव किंवा राजकीय सत्तापालट अशा कारणांमुळे हे काम अर्धवट सोडले असावे. खांबांवरील नक्षी, यक्ष-शिल्पे आणि कोरीव कामातील कारागिरांच्या कौशल्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. दोन खांब वगळता इतर कुठेही काम पूर्ण झालेले दिसत नाही. खांबांची बांधणी आणि शैली उत्तम आहे; मात्र आता ते जीर्ण झाल्यामुळे मूळ बारकावे नष्ट झाले आहेत.
राजकीय व आर्थिक आश्रयापेक्षा मला असे वाटते की, इथे पाण्याची पुरेशी सोय न झाल्यामुळे हे काम थांबले असावे. कारण भर पावसातही येथील टाक्यांमध्ये पाणी साचत नसून ती कोरडीच दिसतात. मुख्य गुंफेवर चढून जाणाऱ्या पायऱ्या आणि तिथे कोरलेला खेळाचा पट यावरून इथे एकेकाळी लोकांची मोठी वर्दळ असावी. असाच खेळाचा पट जवळच असलेल्या गोरखगडाच्या गुंफेतही पाहायला मिळतो.
एकूणच येथील मूर्तींवरून हे एक मोठे हिंदू लेणे असावे. अखंड दगडात खोदून त्यावर हिंदू देवता कोरल्या असल्यामुळे, इथे हिंदू लेणी खोदण्याचा प्रयत्न झाला असावा यात शंका नाही. निश्चित इतिहास उपलब्ध नसला तरी हे बांधकाम साधारण ९व्या शतका नंतरचे असावे असा अंदाज बांधता येतो.
यक्ष शिल्पाचे वैशिष्ट्य (Autofellatio / Self-fellating figure):
खांबावरील यक्ष-शिल्पाने आपले जननेंद्रिय मुखात घेतलेले दाखवले आहे. कला-इतिहासाच्या भाषेत याला Autofellatio किंवा Self-fellating figure म्हणतात. युरोपमधील काही वास्तूंमध्ये अशी शिल्पे आढळतात; परंतु भारतातील संदर्भांचा विचार केला असता:
१. कात्रेश्वर मंदिर (कातर-खटाव, जि. सातारा, महाराष्ट्र)
२. लक्ष्मीदेवी मंदिर (दोड्डगडवल्ली, जि. हासन, कर्नाटक)
* काळ: साधारण १२वे शतक (चालुक्य-यादव संक्रमण काळ).
३. मीनाक्षी अम्मन मंदिर (मदुराई, तमिळनाडू): इथे मनुष्याचे नव्हे, तर सिंह/याली सदृश प्राण्याचे स्वतःच्या जननेंद्रियाकडे तोंड असलेले शिल्प पाहायला मिळते (जे इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे).
टीप: खटाव आणि लक्ष्मीदेवी मंदिरातील या विशिष्ट शिल्पांचे फोटो इंटरनेटवर सहज उपलब्ध नाहीत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मंदिरांच्या पुराव्यानुसार (१२वे ते १३वे शतक) या कालखंडाचा संदर्भ घेतला, तर गणपतीगडद येथील लेणीही साधारण १२व्या शतकाच्या आसपास किंवा त्यानंतर खोदली गेली असावीत असा अंदाज वर्तवता येतो.
मझा
"माझा निष्कर्ष पुढील पुराव्यांशी जुळणारा आहे."
महाराष्ट्रातील लेण्यांचा निर्मितीकाळ आणि गणपतीगडदची शोकांतिका
महाराष्ट्रातील प्राचीन लेण्यांचा इतिहास पाहिला, तर एका भव्य लेणी समूहाची निर्मिती होण्यासाठी काही दशकांपासून ते १०० ते १५० वर्षांचा प्रदीर्घ काळ (म्हणजेच २ ते ३ पिढ्या) लागायचा. प्राचीन कारागीर डोंगराच्या वरच्या भागाकडून खाली (Top-to-Bottom) कातळ कोरत येत असत.
अजिंठा लेण्या (इ.स.पूर्व २ रे शतक ते ६ वे शतक): अजिंठा येथील लेण्या एका दिवसात बनलेल्या नसून, सातवाहन आणि वाकाटक काळात जवळपास ६०० वर्षांच्या कालखंडात वेगवेगळ्या टप्प्यांत कोरल्या गेल्या.
वेरूळचे कैलास मंदिर व लेणी समूह (इ.स. ६ वे ते १० वे शतक): राष्ट्रकूट राजा कृष्ण (प्रथम) यांच्या काळात सुरू झालेले कैलास मंदिर आणि संपूर्ण वेरूळ लेणी संकुलाची उभारणी होण्यासाठी तब्बल ४०० ते ५०० वर्षे लागली.
कान्हेरी लेण्या - मुंबई (इ.स.पूर्व १ ले शतक ते १० वे शतक): १०९ लेण्यांचा हा भव्य समूह पूर्ण होण्यासाठी जवळपास १,००० वर्षांचा प्रदीर्घ काळ आणि विविध राजवटींचा राजाश्रय लाभला.
तुघलक आक्रमणे अन् थांबलेला इतिहास:
अजिंठा, वेरूळ किंवा कान्हेरी या लेण्यांना शतकानुशतके अखंड राजाश्रय, राजकीय स्थैर्य आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचे दान (Guild Funding) सतत मिळत राहिले; म्हणून त्या पिढ्यानपिढ्या विकसित होत राहिल्या.
याउलट, गणपतीगडद येथे १२व्या-१३व्या शतकात यादवांच्या उत्तरकाळात लेण्या कोरायला सुरुवात तर झाली, पण १४व्या शतकाच्या सुरुवातीला अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुघलक यांच्या सुलतानी आक्रमणांमुळे महाराष्ट्रातील राजकीय स्थैर्य पुरते कोलमडले. स्थानिक हिंदू राजवटी नष्ट झाल्याने पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या या कलाप्रकल्पांची आर्थिक रसद आणि राजाश्रय एका रात्रीत तुटला.
अजिंठा-वेरूळप्रमाणे ज्या लेण्यांचे काम पुढील १००-१५० वर्षे चालून एका भव्य लेण्यात रूपांतरित व्हायला हवे होते, ते गणपतीगडदचे काम तुघलक आक्रमणांच्या कालखंडात अवघ्या पहिल्याच टप्प्यात अर्ध्यावर सोडून द्यावे लागले तर नसेल
Comments
Post a Comment